महामार्गावरील 'अतिक्रमण हटाव'ला राजकीय पदाधिकाऱ्यांनीच लावले ग्रहण? गडकरींच्या नावे फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 01:36 PM2022-06-02T13:36:56+5:302022-06-02T15:37:27+5:30

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Union Minister Nitin Gadkari's name misused, anti-encroachment drive stopped on highway | महामार्गावरील 'अतिक्रमण हटाव'ला राजकीय पदाधिकाऱ्यांनीच लावले ग्रहण? गडकरींच्या नावे फोन

महामार्गावरील 'अतिक्रमण हटाव'ला राजकीय पदाधिकाऱ्यांनीच लावले ग्रहण? गडकरींच्या नावे फोन

googlenewsNext

देसाईगंज (गडचिरोली) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतचे कच्चे व पक्के अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली होती. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज येथील अतिक्रमणधारकांना २० मे रोजी चार दिवसांच्या मुदतीची नोटीसही बजावली होती. मात्र काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून, अतिक्रमण हटाव मोहिमेला थांबविले असल्याची धक्कादायक माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचा सपाटा चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

साकोली-देसाईगंज-आरमोरी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थाई पट्टेधारकांसह लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनाधिकृत कब्जा हटविण्याबाबत उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी २० मे रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमही सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विकासात्मक कामांना विरोध का?

या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. मागील अनेक वर्षापासून अतिक्रमणामुळे अपघात होऊन बन्याच जणांनी आपला जीव गमवला आहे. जिल्ह्यातील नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी दळणवळणाला प्राधान्य दिले जात आहे. पण या विकासात्मक कामांना काही पदाधिकारी विरोध करीत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची ही भूमिका आश्चर्यात टाकणारी आहे.

Web Title: Union Minister Nitin Gadkari's name misused, anti-encroachment drive stopped on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.