गडचिरोली जिल्ह्यात कुरमा प्रथा निर्मूलनासाठी ‘उडान’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:47 AM2018-11-01T00:47:14+5:302018-11-01T11:05:13+5:30

आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जागृती आणून कुरमा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘उडान’ हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे.

'Udayan' program for eradication of Karma customs | गडचिरोली जिल्ह्यात कुरमा प्रथा निर्मूलनासाठी ‘उडान’ कार्यक्रम

गडचिरोली जिल्ह्यात कुरमा प्रथा निर्मूलनासाठी ‘उडान’ कार्यक्रम

Next
ठळक मुद्देशाळकरी मुली-महिलांचे प्रबोधन : जिल्हाभरातील शिक्षिकांसह ‘उमेद’च्या कर्मचाऱ्यांचा राहणार सहभाग

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जागृती आणून कुरमा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘उडान’ हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. सद्यस्थितीत गावागावात असलेल्या कुरमाघरांना विरोध न करता पुढील पिढीत या प्रथेबद्दल प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आदीम काळापासून आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिला व किशोरवयीन मुलींना कुरमाघर गावाच्या एका कडेला असलेल्या विशिष्ट झोपडीत वास्तव्य करावे लागते. त्या ठिकाणी वीज, पाण्यासह कोणत्याही सुविधा नसतात. यामुळे अस्वच्छता राहून महिला विविध लैंगिक आजारांचा सामना करावा लागतो. गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग किंवा आजीवन वंधत्व यासारखेही आजार त्यांना जडतात. केंद्र शासनाने या जिल्ह्याचा आरोग्य व पोषण बाब निर्देशांक सुधारण्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. त्याअंतर्गत ‘मावा गडचिरोली’मधून जिल्ह्याच्या विकासाबाबत विविध उपाय व सल्ले नागरिकांमधून मागविले होते. त्यात कुरमाघराबद्दल अनेकांनी उपाय सुचविले. ही परंपरा एकाएकी बंद करण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी नागरिक ते सहन करणार नाही. त्यामुळे जनजागृतीतून पुढील पिढीचे मतपरिवर्तन करण्यासाठी ‘उडान’ हा कार्यक्रम आरोग्य व शिक्षण विभागाच्या सहकार्याने राबविला जात आहे.
एकूण सहा टप्प्यात राबविल्या जाणाºया या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील तीन शाळांमधील विद्यार्थिनीमधून कुरमा प्रथेबद्दल सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर यापूर्वी असा प्रकल्प राबविलेल्या सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यातून राज्यस्तरीत प्रशिक्षकांना बोलवून युनिसेफच्या मदतीने त्यांनी गेल्या २२ ते २६ आॅगस्टदरम्यान पाच दिवस सर्व तालुक्यात ११६३ जणांना प्रशिक्षण देऊन मास्टर ट्रेनर तयार केले. त्यात सर्व माध्यमिक खासगी, जि.प. व आश्रमशाळांमधील महिला शिक्षकांचा प्रशिक्षित करण्यात आले. त्यांच्यासोबत काही उमेदचे कर्मारी व आरोग्य कर्मचारीही प्रशिक्षित झाले. यानुसार ५० मुलींमागे एक मास्टर ट्रेनर तयार झाले. आता नोव्हेंबर महिन्यापासून ११ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींना विविध खेळ, संवादाच्या माध्यमातून कुरमा प्रथेसोबत मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, गैरसमजुती याबद्दल प्रबोधन केले जाईल.

मुली शिकवणार आईला
साधारणत: वयात येणाऱ्या मुलीला मासिक पाळीची माहिती आईकडून दिली जाते. त्यात आईवर ज्या परंपरांचा पगडा आहे तोच पगडा मुलीवर पडतो. मात्र ‘उडान’मधील प्रबोधनानंतर किशोरवयीन मुली काय योग्य, काय अयोग्य याबद्दल आपल्या आईला सांगून अपेक्षित तो बदल आपल्या घरात घडवून आणेल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाला आहे.

सर्वेक्षणातून मिळविणार माहिती
शाळकरी मुलींना आणि बचत गटांच्या महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, प्रबोधन झाल्यानंतर त्यांच्याकडून एका प्रश्नावलीच्या माध्यमातून काय बदल झाला हेसुद्धा जाणून घेतले जाईल. यासोबतच त्यांचे हिमोग्लोबिन, वजन, उंची यांचीही माहिती संकलित केली जाईल. त्यामुळे पुढील पिढीतील तरुणींचे आरोग्य अधिक सुदृढ होईल, असा विश्वास सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.जी.म्हशाखेत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: 'Udayan' program for eradication of Karma customs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य