थातुरमातूर काम करून १० लाख उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:58 PM2018-01-15T22:58:45+5:302018-01-15T22:59:42+5:30

जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाअंतर्गत तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम थातुरमातूर काम करून सदर काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले व संबंधित कंत्राटदाराने सदर कामाचे १० लाख रूपयांच्या देयकाची उचल केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

Thaturmatur took 10 lakhs by working | थातुरमातूर काम करून १० लाख उचलले

थातुरमातूर काम करून १० लाख उचलले

googlenewsNext
ठळक मुद्देढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम : धानोरा येथील जि.प. बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

आॅनलाईन लोकमत
धानोरा : जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाअंतर्गत तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे काम थातुरमातूर काम करून सदर काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले व संबंधित कंत्राटदाराने सदर कामाचे १० लाख रूपयांच्या देयकाची उचल केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या पेंढरी परिसरातील ढोरगट्टा-खरगी-पयडी या ग्रामीण मार्गाची दुरूस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी १६ लाख ६७ हजार रूपयांचा निधी प्रशासनाकडून मंजूर झाला. सदर रस्त्यावर ४० मिमीची बोल्डर व गिट्टी टाकून मजबुतीकरण करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केला होता. मात्र धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संगणमत करून सदर रस्त्याचे थातुरमातूर काम उरकून घेतले. संबंधित कंत्राटदाराच्या नावे १० लाख रूपयांचे देयक काढून ते त्याला अदा करण्यात आल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा शासनाचा मुख्य हेतू आहे. सदर हेतू पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर योजनेतून शासन निधीची तरतूद करीत आहे. मात्र संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदारांमध्ये मधूर संबंध असल्याने धानोरा तालुक्यात अनेक रस्त्यांचे अशाच प्रकारे थातुरमातूर काम करून शासकीय निधीची वासलात लावण्याचा सपाटा सुरू आहे. ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे थातुरमातूर काम करून १० लाख रूपयांचे देयक काढण्यात आले आहे. सदर देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर मार्गावर यापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. त्याच खडीकरणावर पुन्हा काही ब्रास मुरूम टाकून या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली.
सदर रस्त्याच्या दुरूस्ती कामात दर्जा नसल्याने लवकरच या मार्गाची दुरवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकामाकडे जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने थातुरमातूर काम करणाºया अनेक कंत्राटदारांचे चांगलेच फावले आहे. परिणामी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
जि.प.च्या सभेत मुद्दा उचलणार- दुल्लमवार
धानोरा तालुक्यातील ढोरगट्टा-खरगी-पयडी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्थानिक निधीतून मंजूर करण्यात आले. मात्र उपविभागाचे अभियंते व कंत्राटदारांनी संगणमत करून हे काम थातुरमातूर उरकून घेतले. संबंधित काम करवून घेणाऱ्या भ्रष्ट अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी आपण जि.प. च्या सभेत करणार आहोत. याशिवाय सदर मुद्दा आपण जि.प. प्रशासनाकडे लावून धरणार, अशी माहिती गट्टा-पेंढरी जि.प. क्षेत्राचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. सदर कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण जि.प. च्या सभेत आग्रहीपणे करणार आहोत, असेही ते म्हणाले. एक लाख रूपयांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ढोरगट्टा-खरगी-पयडी या रस्त्याच्या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) कार्यालयात उपलब्ध नाही. आपण सध्या गडचिरोली येथील जि.प. बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात आहो. येत्या दोन-तीन दिवसात धानोरा येथील कार्यालयात आल्यानंतर या कामाची संपूर्ण माहिती दिली जाईल.
- आर.डी. वाघाडे, प्रभारी उपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, धानोरा

Web Title: Thaturmatur took 10 lakhs by working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.