शिक्षकांवर विद्यार्थी प्रवेशाचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:14 PM2019-04-22T22:14:36+5:302019-04-22T22:15:40+5:30

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील गल्लीबोळात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून वर्गातील प्रवेशित विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बहुतांश शाळांचे शिक्षक शहरी व ग्रामीण भागात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी भर उन्हात फिरत आहेत.

Tenet of student admissions for teachers | शिक्षकांवर विद्यार्थी प्रवेशाचे टेन्शन

शिक्षकांवर विद्यार्थी प्रवेशाचे टेन्शन

Next
ठळक मुद्देभर उन्हात गावोगावी भेटीगाठी : प्रवेशित विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी धडपड; अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांचा दबाव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील गल्लीबोळात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून वर्गातील प्रवेशित विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बहुतांश शाळांचे शिक्षक शहरी व ग्रामीण भागात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी भर उन्हात फिरत आहेत.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सहा ते सात वर्षापूर्वी गाव तिथे शाळा ही संकल्पना अंमलात आणण्यात आली. परिणामी तीन ते चार गावे मिळून एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळेला सरसकट मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन वर्षाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कॉन्व्हेंटचे पेव फुटले. जिल्हा, तालुका मुख्यालयासह मोठमोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले.
शाळेत प्रवेशित विद्यार्थी मिळावे तसेच दाखले झालेले विद्यार्थी टिकावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शिक्षण संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध भौतिक सुविधा देण्यात आल्या. तसेच गुणवत्तेवर भर दिला जात असल्याचाही कांगावा करण्यात आला. हे सारे करूनही यंदा सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे दाखले सहजासहजी मिळत नसल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे टेंशन वाढले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्येही विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश दिला जात आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट व मोठ्या शाळांना कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळत नसल्याने येथील आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी विद्यार्थी प्रवेशासाठी शुल्क घेतले जात आहे.
गडचिरोली शहरासह तालुका मुख्यालयाच्या इंग्रजी माध्यमांच्या मोठ्या कॉन्व्हेंट व शाळांची प्रवेश फी आता भरमसाठ वाढविण्यात आली आहे. मात्र शिक्षण क्षेत्रात नामांकित म्हणून गणल्या जाणाºया शाळांनाही विद्यार्थी प्रवेशासाठी आता पोस्टर छापावे लागत आहेत.
आश्रमशाळांचे शिक्षक मुख्यालयी ठाण मांडून
आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, भामरागड व गडचिरोली हे तीन प्रकल्प असून या तिनही प्रकल्पांतर्गत जवळपास ४३ शासकीय आश्रमशाळा आहेत. तर ५० च्या आसपास खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित आश्रमशाळा आहेत. पूर्वी आश्रमशाळांना सहजासहजी विद्यार्थी मिळत होते. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून या आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठिण झाले आहे. परिणामी अनेक शासकीय आश्रमशाळेतील बरेच प्राथमिक वर्ग बंद पडले आहेत. सध्या शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहून सकाळी व सायंकाळच्या सुमारास परिसराच्या गावात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करीत आहेत.
शिक्षिकांवरही जबाबदारी
शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट व शाळांची संख्या प्रचंड वाढली आहे. दोन वर्षात काही नवीन कॉन्व्हेंटची भरही पडली आहे. या कॉन्व्हेंट व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षिकांवरही टाकण्यात आली आहे. कॉन्व्हेंटच्या शिक्षिका भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी फिरत आहेत.

Web Title: Tenet of student admissions for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.