धक्कादायक! गडचिरोलीतील शालेय विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 10:43 AM2018-02-06T10:43:10+5:302018-02-06T10:46:33+5:30

चॉकलेट खाण्याच्या वयात तंबाखू व खर्रा खाण्याच्या पडलेल्या सवयीने गडचिरोलीचे विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर आहेत.

Shocking ! The students of Gadchiroli school on the threshold of cancer | धक्कादायक! गडचिरोलीतील शालेय विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर

धक्कादायक! गडचिरोलीतील शालेय विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर

Next
ठळक मुद्दे१९५ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चॉकलेट खाण्याच्या वयात तंबाखू व खर्रा खाण्याच्या पडलेल्या सवयीने गडचिरोलीचे विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर आहेत. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने जानेवारी महिन्यात गडचिरोली येथील सहा आश्रमशाळांना भेट देऊन २१५० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पाचवी ते पदवीच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन आढळून आले. धक्कादायक म्हणजे यातील १९५ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील अनेक छोट्या-मोठ्या चौकातील पानठेल्यांवर व आता किराणा दुकानातही तंबाखूजन्य पदार्थ विशेषत: खर्रा सहज मिळतो. पूर्वी ‘पानां’साठी प्रसिद्ध असलेले पानठेले आता खर्रा, गुटख्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. या पानठेल्यांमधून दिवसभर खर्रा घोटणारी तरुणाई दिसून येते. अनेक पानठेल्यांमध्ये तर खर्रा घोटण्यासाठी आधुनिक यंत्रही बसविण्यात आले आहे. तोंडात खर्याचा बोकणा आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाऱ्याचे ‘परिणाम’ मात्र, आता दिसून येऊ लागले आहेत.
आदिवासी विकास विभागांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ‘सीएम फॅलो’ डॉ. साफवान पटेल यांनी ९ आॅक्टोबर २०१७ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भाकरोडी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली असता येथील २० मुलांमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आली होती.
यामुळे महाराष्ट्र शासन सचिवांनी आदिवासी विकासाच्या अपर आयुक्तांना नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय दंत रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चमूने अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्या मार्गदर्शनात २९ ते ३१ जानेवारी २०१८च्या दरम्यान गडचिरोली येथील सहा आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तपासणी केली. यात पहिली ते पदवीपर्यंतच्या २१५० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ६३ टक्के म्हणजे १३४३ विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन तर पाचवी ते पदवीपर्यंतच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबखूचे व्यसन असल्याची बाब उघडकीस आली. यातील १९५ विद्यार्थ्यांना मुख पूर्व कर्करोगाचे निदान झाले.

तंबाखू खाणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ३० टक्के
शासकीय दंत रुग्णालयाने गडचिरोली येथे केलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीत साधारण ७० टक्के मुलांमध्ये तर ३० टक्के मुलींमध्ये तंबाखूचे व्यसन आढळून आले. कमी वयात तंबाखूचे व्यसन जडल्याने हे विद्यार्थी मुख पूर्वकर्करोगाच्या वाटेवर आहेत. तातडीने उपचार न मिळाल्यास हे विद्यार्थी कर्करोगाच्या विळख्यात सापडण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे.

कमी वयात तंबाखूचे व्यसन धक्कादायकच
लहान वयात तंबाखूचे व्यसन हे धक्कादायकच आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यातील तपासणीतच १९५ विद्यार्थी मुखपूर्व कर्करोगाचे आढळून आले. यामुळे ८ फेब्रुवारीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या चार्माेशी, रांगी येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीकडे आमचे विशेष लागले आहे. मुख पूर्वकर्करोग साधारण दहा वर्षानंतर मुखाच्या कर्करोगात बदलतो. यामुळे वेळीच सामूहिक प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना खर्रा, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे आवश्यक आहे.
-डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Shocking ! The students of Gadchiroli school on the threshold of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.