ठळक मुद्देदोन बंदुकांसह साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली. मृत नक्षलवाद्याची ओळख अद्याप पटली नसली तरी तो जहाल नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गडचिरोली पोलीस कोपर्शी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. शोधमोहिमेदरम्यान शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या गोळीने मरण पावलेल्या एका पुरूष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. सोबतच एक एसएलआर रायफल, एक एअर रायफल, ब्लास्टिंगचे साहित्य, नक्षलीलिखित पुस्तके, मोबाईल फोन व एक खेचर तसेच मोठ्या प्रमाणात इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.
यावर्षी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत नऊ नक्षलवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान जंगलातून जप्त केलेल्या नक्षल साहित्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींसंदर्भात मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.