एनए, परवानगी नाही, तरीही प्लॉट विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:38+5:30

जागा नियमबाह्यपणे वर्ग १ करून त्या जागेचे प्लॉट पाडून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली. प्लॉट विक्रीसाठी संबंधिताने तिथे होर्डिंगसुद्धा लावले. हा सर्व प्रकार शासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याच्या लक्षात आला नाही हे विशेष. एकीकडे खरपुंडीतील १७ नागरिक आपल्या जागेत वहीवाट करत असताना सुध्दा त्या जागा सरकारजमा करण्याचे आदेश निघाले. तर दुसरीकडे नियमबाह्य प्लाॅट विक्री करणाऱ्यावर काेणतीही कारवाई नाही.

NA, not allowed, still plot sale | एनए, परवानगी नाही, तरीही प्लॉट विक्री

एनए, परवानगी नाही, तरीही प्लॉट विक्री

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरालगतच्या खरपुंडी ग्रामपंचायतअंतर्गत सरकारने वहिवाट करून उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेली जमीन संबंधित लाभार्थींकडून नियमबाह्यपणे विकत घेऊन ती भोग वर्ग २ मधून वर्ग १ केली. त्यानंतर जमीन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्जही दिला. पण पुढील प्रक्रिया आणि परवानगी न घेताच त्या जमिनीचे सपाटीकरण करून प्लॉट्सची नियमबाह्यपणे विक्री करण्यासाठी जमीन सज्ज करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. 
या जमीन घोटाळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करा, अशी मागणी खरपुंडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे आणि गावकऱ्यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषद घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूखंड क्रमांक ५० मधील २.१० आरजी जमीन ही १९५८ मध्ये आनंदराव जागोबा शेंडे यांच्या कुटुंबाला शासनाकडून पट्ट्याची जमीन म्हणून दिली होती. या जमिनीत शेती करून उदरनिर्वाह करण्याचा त्यामागे उद्देश होता. ही जमीन फक्त शेतीसाठी असताना ती वर्ग १ मध्ये बदलून विक्री करण्यात आली. त्यामुळे ती जागा अनिल मधुकर धाईत आणि अश्विनी अनिल धाईत यांच्या नावाने झाली. शासनाच्या नियमाप्रमाणे पट्ट्यात मिळालेल्या जमिनीवर विशिष्ट कालावधीत वहिवाट न झाल्यास ही जागा शासनजमा करण्यात येते. मात्र तसे न करता ती जागा नियमबाह्यपणे वर्ग १ करून त्या जागेचे प्लॉट पाडून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली. प्लॉट विक्रीसाठी संबंधिताने तिथे होर्डिंगसुद्धा लावले. हा सर्व प्रकार शासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याच्या लक्षात आला नाही हे विशेष.
एकीकडे खरपुंडीतील १७ नागरिक आपल्या जागेत वहीवाट करत असताना सुध्दा त्या जागा सरकारजमा करण्याचे आदेश निघाले. तर दुसरीकडे नियमबाह्य प्लाॅट विक्री करणाऱ्यावर काेणतीही कारवाई नाही.
पत्रपरिषदेला सरपंच ज्योत्स्ना म्हशाखेत्री, उपसरपंच ऋषी नैताम, विजय खरवडे, तसेच ग्रामस्थ रामचंद्र ढोंगे, अनुरथ निलेकार, ज्योती कोमलवार, संतोष दुपारे, धनपाल कार, सुनीता पिपलशेट्टीवार, दिनेश आवरे, बाळू मेश्राम, वामनराव टिकले, रामभाऊ टिकले, भगवान बुरांडे आदी अनेक नागरिक उपस्थित होते.

अकृषक करण्याआधीच प्लॉट विक्रीसाठी सज्ज
जमीन अकृषक (एनए) करण्याबाबतचा जाहीरनामा तत्कालीन एसडीओ आशिष येरेकर यांनी दि. २१ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित करून त्या जमिनीवर कोणाचे काही आक्षेप असल्यास ते सादर करण्यासाठी १९ मे २०२२ पर्यंतची मुदत दिली होती. पण आक्षेप किंवा परवानगीची प्रतीक्षा न करता बेधडकपणे प्लॉट विक्रीसाठी सज्ज करण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेऊन त्या जागेवर आक्षेप नोंदविला.

ती वादग्रस्त जागा खेळण्यासाठी द्या
खरपुंडीतील भूखंड क्रमांक ५० ची जागा सातबारानुसार २.१० आरजी दाखविण्यात आली. मात्र ती जागा प्रत्यक्षात २.७० आरजीपेक्षा जास्त आहे. जागेचे याेग्य माेजमाप करून ती जागा शासनजमा करावी. तसेच खरपुंडीतील ग्रामपंचायत कार्यालयाला जागा नसल्यामुळे ती जागा ग्रामपंचायतसाठी तसेच  गावातील शाळेची इमारत लहान असल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडांगणासाठी द्यावी, अशी मागणी खरपुंडी येथील पदाधिकारी व गावकऱ्यांनी केली.

 

Web Title: NA, not allowed, still plot sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.