वसतिगृहात निकृष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:09 AM2017-11-20T00:09:32+5:302017-11-20T00:09:44+5:30

समाज कल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी उपोषण आंदोलन केले.

Dinner in the hostel | वसतिगृहात निकृष्ट जेवण

वसतिगृहात निकृष्ट जेवण

Next
ठळक मुद्देआंदोलन : समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयावर सोमवारी देणार धडक

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : समाज कल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी उपोषण आंदोलन केले.
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मागील बाजूस १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रापासूनच शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे भोजन व इतर खाण्याचे पदार्थ न देता अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते. सदर प्रकार वसतिगृहाचे गृहपाल व कंत्राटदाराला विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकवेळा लक्षात आणून देऊन मेन्यू प्रमाणे जेवण देण्यास सांगितले. मात्र कंत्राटदारावर याचा काहीही परिणाम झाला नाही. आठवड्यातून दोनदा मटन देणे आवश्यक असताना एकचवेळा मटन दिले जात होते. आठवड्यातून दोनवेळा चिकन दिले जात असले तरी ते पुरेशा प्रमाणात नव्हते. दुधामध्ये पाणी टाकून अत्यंत कमी दूध दिले जाते. सलाद दिला जात नव्हता. बरेच दिवस केवळ पातळ वरण भात केला जात होता. मुदतबाह्य तिखट व अळ्या लागलेले चने भाजी करण्यासाठी वापरले जात होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी उपोषण आंदोलन करून जेवण न करण्याचा निर्णय घेतला.
आंदोलन सुरू झाल्यानंतर सहायक समाज कल्याण आयुक्त विनोद मोहतुरे यांना विद्यार्थ्यांनी फोन करून वसतिगृहात येण्याची विनंती केली. मात्र मोहतुरे यांनी आपली तब्येत चांगली नसल्याचे कारण पुढे करून वसतिगृहाला भेट दिली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सोमवारी समाज कल्याण कार्यालयावर धडक देऊन निकृष्ट जेवण व वसतिगृहातील असुविधांबाबत सहायक आयुक्तांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला. गृहपालांनी विद्यार्थ्यांना विनंती केल्यानंतर सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांनी जेवण केले.
युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा सचिव एजाज शेख, आशिष कन्नमवार, ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे यांनी वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. येथील दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंबेडकर पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, तालुकाध्यक्ष विजय कृपाकर यांनी सुध्दा पाहणी केली.
घरगुती गॅसचा अवैध वापर
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्याचे कंत्राट देवरी येथील अग्रवाल नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने रत्नाकर गोटमुकलवार यांना कंत्राट दिले आहे. यावरून अग्रवाल हे केवळ कमिशन घेऊन मोकळे होत असल्याचे दिसून येते. जेवण पुरविण्याचे कंत्राट घेणे हा व्यवसाय असल्याने अन्न शिजविण्यासाठी निळ्या रंगाचे कर्मशीअल सिलिंडर वापरणे आवश्यक असताना या कंत्राटदाराने घरगुती वापराचे लाल रंगाचे सिलिंडर वापरत आहे. विशेष म्हणजे, सामान्य ग्राहकांना वेळेवर एक सिलिंडर मिळत नाही. वसतिगृहाच्या मेसमध्ये तीन सिलिंडर असल्याचे दिसून आले. एकाच वेळी तीन सिलिंडर आले कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना प्यावे लागते अशुध्द पाणी
वसतिगृहातील प्रत्येक नळाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्लॅब टँक बसविण्यात आली आहे. विहिरीचे पाणी टँकमध्ये सोडले जाते. तेच पाणी शौचालय, वॉटर कुलरमध्ये येते. मात्र पिण्याचे पाणी शुध्द करण्याची या ठिकाणी यंत्रणा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशुध्द पाणी प्यावे लागत असून अनेक विद्यार्थ्यांना काविळ, अतिसार यासारखे आजार होत आहेत. या ठिकाणी पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्रत्येक खोलीमध्ये चार विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. खोलीचा आकार मोठा असल्याने किमान दोन लाईट आवश्यक असताना केवळ एकच लाईट आहे. प्रांगणातील सौरलाईट मागील कित्येक वर्षापासून बंद आहे. ग्रंथालयात पुरेसे पुस्तके नाहीत. खेळासाठी साहित्य नाहीत, असा आरोप केला आहे. हिवाळा सुरू होऊन सुध्दा ब्लँकेटचा पुरवठा झाला नाही. पंख्यांची स्पीड अत्यंत कमी आहे, असा आरोप केला आहे.

 

Web Title: Dinner in the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.