अरततोंडी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:35 AM2018-09-29T00:35:53+5:302018-09-29T00:36:13+5:30

तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला.

Decision making decision in Arthotidhi Gram Sabha | अरततोंडी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

अरततोंडी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देतीन गावांतील नागरिकांचा एल्गार : दारूविक्रेत्यांकडून २५ हजार रूपयांचा दंड वसूल करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला. मागील ग्रामसभेत देऊळगाव वासियांनी दारूबंदीचा निर्णय घेऊन गावात दारूबंदी केली. याच धर्तीवर गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या तिन्ही गावात दारूबंदी करून संपूर्ण गट ग्रामपंचायत दारूमुक्त व्हावी, या उद्देशाने ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामसभेत पारित केलेल्या ठरावात गावातील दारू विक्री बंद व्हावी, यासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले. त्यानुसार दारू विक्रेत्यांना त्यांच्याजवळ असलेल्या दारूची विक्री करण्यासाठी ९ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्या दिवसापर्यंत आपल्या जवळ असलेल्या दारूची व मोहफुलाची विल्हेवाट लावावी, असे सांगण्यात आले. मुदतीनंतरही दारू विक्री केल्यास संबंधितांकडून ग्रामसभेच्या माध्यमातून २५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच, त्या नंतरही जर दारू विक्री सुरू राहिली तर दारू विक्रेत्यांना ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय, पोलीस पाटील यांच्या कडून मिळणारे कागदपत्र देण्यात येणार नाही. दारूमुक्ती गाव संघटनेच्या व ग्रामसभेच्या नियमाचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. दारू विक्रेत्याची कोणीही जमानत घेऊ नये. घेतल्यास त्यालाही दारू विक्रेत्याला लावलेले नियम लागू केले जातील व १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. तसेच जंगलामध्ये लपून दारू काढताना आढळून आल्यास वनविभागाची मदत घेऊन कारवाई करण्यात येईल, हे सर्व ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला.
सभेला सरपंच साईनाथ खुणे, सचिव महेंद्र देशमुख, पोलीस पाटील मीनाक्षी शेडमाके, गीता लोहंबरे, पंचायत समिती सदस्य शारदा पोरेटी, वनपाल लक्ष्मीकांत ठाकरे, वनरक्षक सचिन कुथे, नानाजी खुणे, मुक्तिपथचे तालुका प्रेरक शरद निकुरे, प्रेरक माधुरी नैताम तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि अरततोंडी, खरमत टोला, देऊळगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Decision making decision in Arthotidhi Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.