गावांचे प्रश्न सोडविण्याचे युवकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:25 AM2018-02-07T01:25:42+5:302018-02-07T01:26:53+5:30

खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन.

Challenge before the youth to solve the village's problems | गावांचे प्रश्न सोडविण्याचे युवकांसमोर आव्हान

गावांचे प्रश्न सोडविण्याचे युवकांसमोर आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देअभय बंग यांचे प्रतिपादन : सर्चमध्ये युवा संसदेला सुरूवात

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन. या संघटनातूनच उद्याचे आदिवासी नेतृत्व पुढे येणार आहे आणि गावांचे प्रश्न सोडविणे, ही या नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
सर्च (शोधग्राम) येथे मंगळवारपासून आदिवासी युवा संसद कार्यक्रमांतर्गत डॉ. के.व्ही.चारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ कबड्डी आणि व्हॉलिबॉल सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा संसदेचे उद्घाटन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ समाजसेवक व माजी आमदार हिरामण वरखडे आदी उपस्थिती होती.
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना गणित, इंग्रजी हे विषय कठीण जात असतील, पण त्यांना धावायला सांगितले तर ते एका पायावर तयार राहतात. इथल्या निसर्गानेच त्यांना ही ताकद दिली आहे. ही ताकद वापरुनच खेळाची मैदाने गाजविण्याचा मूलमंत्र डॉ. बंग यांनी खेळाडूंना दिला.
डॉ. राणी बंग यावेळी म्हणाल्या, खेळामुळे आनंद निर्माण होतो. मैत्री निर्माण होते. सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात. ही एकीच तुमची ताकद आहे. शासनाने वनहक्क गावांना बहाल केले आहे. यातून गावे आर्थिकरित्या समृद्ध होत आहेत. पण या पैशाचा उपयोग गावाच्या, समाजाच्या विकासासाठी होणे आवश्यक आहे. जंगल वाचवणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगतानाच तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांना जीवनातून कायम बाद करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिरामण वरखडे यांनी खेळाच्या जुन्या आठवणी जागविल्या. खेळामध्ये जीवन जगण्याचे गमक आहे. ते आनंदाने अनुभवा, असे आवाहन केले.
मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलीत करून सामन्यांना सुरुवात झाली. गिरोला, रोंगावाही, भीमपूर, मर्केगाव, भेंडीकन्हार, वाघभूमी, कोवानटोला, कुथेगाव या गावांदरम्यान व्हॉलिबॉल तर फुलबोडी, रेंगाटोला, माळदा, कुथेगाव, पवनी, कुपानेर या गावांदरम्यान युवक युवतींचे कबड्डीचे सामने रंगणार आहेत.
कार्यक्रमाचे संचालन नाजूक जाडे यांनी केले. सर्चचे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
आयपीएल प्रो कबड्डी खेळाडू आज सर्चमध्ये
बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी कबड्डी आणि व्हॉलिबॉलचे अंतिम सामने यू मुंबा प्रो कबड्डीचे खेळाडू पवन कुमार आणि श्रीकांत जाधव यांच्या उपास्थितीत होणार आहे. सामन्यानंतर हे खेळाडू सदर युवक युवतींना खेळाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गम भागातील खेळाडूंना त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाविषयी प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Challenge before the youth to solve the village's problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.