तेंदूपत्ता मजुरीची नगदी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:52 PM2019-05-18T23:52:21+5:302019-05-18T23:52:39+5:30

मागील वर्षी काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजुरी व रॉयल्टी दिली नाही. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी तेंदूपत्त्याची मजुरी मजूर नगदी मागत आहेत. ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले असले तरी ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही.

Cash demand for tendon wage | तेंदूपत्ता मजुरीची नगदी मागणी

तेंदूपत्ता मजुरीची नगदी मागणी

Next
ठळक मुद्देमागील वर्षीच्या अनुभवातून घेतला धडा । काही ग्रामसभांनी याही वर्षी केले कच्चे करारनामे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील वर्षी काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजुरी व रॉयल्टी दिली नाही. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी तेंदूपत्त्याची मजुरी मजूर नगदी मागत आहेत.
ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले असले तरी ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही. तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास तो मजुरी व रॉयल्टी सुद्धा देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकवेळा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरांची मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हातान्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना स्वत:च्या मजुरीवर पाणी फेरावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी झाल्या. मात्र काही कंत्राटदारांनी अजूनही तेंदूपत्त्याची मजुरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर आहे. यामध्ये सातत्याने चढउतार होत राहतात. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. याही वर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता असल्याने मजुरांनी नगदी मजुरी मागण्यास प्राधान्य दिले आहे. मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.
मागील वर्षी कंत्राटदारांनी रॉयल्टी सुद्धा बुडविली होती. हा अनुभव ग्रामसभांच्या पाठिशी आहे. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे कंत्राटदारांची चांगलीच गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले आहेत. तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभांनी व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

तेंदूपत्ता हंगाम पोहोचला अंतिम टप्प्यात
तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला १५ दिवसांपूर्वीपासून सुरूवात झाली होती. आता तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामालाही ग्रामीण भागात सुरूवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या वाहतुकीला आता सुरूवात झाली आहे.

Web Title: Cash demand for tendon wage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.