नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच

By संजय तिपाले | Published: January 25, 2024 02:55 PM2024-01-25T14:55:36+5:302024-01-25T14:57:48+5:30

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मृतदेह आढळलेल्या तीन महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

Boat Accident Assistance of Rs 4 lakh each to the families of the deceased; Fourth body found, search for two more continues | नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच

नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच

गडचिरोली :  मिरची तोडणीच्या कामावर जाताना नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली होती तर एका महिलेसह नावाडी थोडक्यात वाचले होते. सहापैकी तिघींचे मृतदेह आढळले होते. २५ जानेवारीला चौथ्या महिलेचा  मृतदेह मिळाला असून आणखी दोघींचा शोध सुरुच आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मृतदेह आढळलेल्या तीन महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

मजूर महिलांच्या दोन नावा बुडाल्याची घटना २३ जानेवारीला चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वैनगंगा नदीपात्रात घडली  होती. एका नावेतील आठजण सुखरूप वाचले, तर दुसऱ्या नावेतील गणपूर (रै.) गावच्या सहा महिलांना जलसमाधी मिळाली होती. जिजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२), मायाबाई अशोक राऊत (४५), सुषमा सचिन राऊत (२२) या सासू-सुनेसह बुधाबाई देवाजी राऊत (६५) यांचा समावेश आहे. या नावेतील नावाडी सुरेंद्र शिंदे (३०, रा. टोक, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) व सरूबाई सुरेश कस्तुरे (५८, रा. गणपूर रै.) हे सुदैवाने वाचले. २३ जानेवारी रोजी शोधकार्यानंतर जिजाबाई  राऊत   व पुष्पा   झाडे  यांचे मृतदेह आढळले, तर २४ रोजी रेवंता झाडे यांचा मृतदेह आढळून आला. या तिघींवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. २५ जानेवारीला राज्य आपत्ती निवारण पथकाने पुन्हा शोधकार्य सुरु केले. घटनास्थळापासून पाच किलोमीटरवरहल जयरामपूरनजीकच्या पार्डी घाटाजवळ सुषमा राऊत यांचा मृतदेह आढळून आला. तो ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अद्याप सुषमा राऊत यांच्या सासू मायाबाई अशोक राऊत व बुधाबाई देवाजी राऊत यांचा शोध लागलेला नाही. प्रशासकीय यंत्रणा व बचाव पथक ठाण मांडून असून दोघींना शोधण्याचे काम सुरु आहे. 

यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत -
नाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे, रेवंता झाडे यांच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. या धनादेशाचे २४ जानेवारीला चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सुषमा राऊत यांचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या कुटुंबालाही अर्थसहाय्य केले जाणार असून उर्वरित दोन महिलांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
 

Web Title: Boat Accident Assistance of Rs 4 lakh each to the families of the deceased; Fourth body found, search for two more continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.