लॅटिन फुटबॉल म्हणजे कोलंबिया, उरुग्वेदेखील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:57 AM2018-06-26T06:57:36+5:302018-06-26T06:57:44+5:30

लॅटिन अमेरिकन फुटबॉलवर चर्चा म्हटले, की ती केंद्रित होते ब्राझील आणि अर्जेंटिनावर. कारण त्यांनी अलीकडच्या काळात विश्वविजेतीपदे जिंकली

Latin football is also Colombia, Uruguay | लॅटिन फुटबॉल म्हणजे कोलंबिया, उरुग्वेदेखील

लॅटिन फुटबॉल म्हणजे कोलंबिया, उरुग्वेदेखील

Next

रणजित दळवी
लॅटिन अमेरिकन फुटबॉलवर चर्चा म्हटले, की ती केंद्रित होते ब्राझील आणि अर्जेंटिनावर. कारण त्यांनी अलीकडच्या काळात विश्वविजेतीपदे जिंकली. पण १९३० मधली पहिली-वहिली आणि त्यानंतर १९५० ची स्पर्धा ते जिंकले होते, हे कोणाच्याही ध्यानी नसते.
ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० अशी तीन जेतेपदे जिंकून ज्यूलस रिमे ट्रॉफी कायमची आपली केली. अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये सध्याचा फिफा वर्ल्ड कप जिंकला. ब्राझीलने १९९४ व २००२ असे मग जबरदस्त पुनरागमन केले. या संघांनी विश्वाला ‘सुपरस्टार्स’ दिले, म्हणून चाहत्यांना त्यांच्या आठवणी ताज्या कराव्याशा वाटतात. पेले, झिको, सॉक्रेटिस, रोमारिओ, रोनाल्डो, रिव्हाल्डो किती नावे घ्यायची. अर्जेंटिनाचे मॅराडोना, मारिओकेम्पेस, आॅस्वाल्डो आर्दिलेस यांनी प्रकाशझोत आपल्यावरच राहील, अशी कामगिरी केली. उरुग्वेने असे कोणी मोठे खेळाडू दिले नसले, तरी त्यांच्याकडे लुईस सुआरेझ आहे. कोलम्बियाने विश्वस्तरावर फारसे काही केले नसले तरी कार्लोस व्हाल्देरामा आणि तो ‘चक्रम’ गोलरक्षक रेने हिगिटा याला कोण विसरेल? नव्या पिढीत नेमार आणि मेस्सी यांनी आपल्या देशांना चर्चेत ठेवले.
अशा स्थितीत कोलम्बियाने पोलंडवरील ३-० विजयानिशी लक्ष वेधून घेतले आहे. ज्या तºहेने त्यांनी पोलंडला गुडघे टेकावयास लावले, ते पाहता लॅटिन फुटबॉलचा आवाका समजला. एकीकडे अर्जेंटिनाची सद्य:स्थिती आणि ब्राझीलची अडचण पाहता बाद फेरीसाठी पात्र उरुग्वे आणि ती गाठू शकणारी कोलम्बिया यांनी लॅटिन अमेरिकेच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
जपानविरुद्ध पाचव्याच मिनिटाला कार्लोस सांचेझला ते लाल कार्ड मिळाले व कोलम्बियाला ती लढत नाहक गमवावी लागली. पण हे सारे विसरून त्यांनी पोलंडविरुद्ध सकारात्मक खेळ केला, त्यासाठी त्यांची पाठ थोपटलीच पाहिजे.
त्यांनी केलेले गोल अफलातून होते. पासेसमधील अचूकता आणि टायमिंग यांचा मिलाफ किती प्रभावी ठरतो, याचे प्रदर्शन पाहावयास मिळाले. कर्णधार जेम्स रॉड्रिक्सच्या क्रॉसवर उंचापुरा सेंटर बॅक येरी मीनाचा तितकाच नाजूक हेडर त्यांना आघाडी देऊन गेला. त्यानंतर फाल्कावला हुआन स्विंटरोने ‘थ्रू पास’ दिला. त्याने कोणताही बचाव भेदला गेला असता. पोलंडवर आणखी जुलूम करताना जेम्सने जो हुआन क्वाड्रादोला चेंडू दिला, त्यात दिसली लॅटिन फुटबॉलची जादू! चेंडू बचाव फळीच्या चक्क मागे वळवून त्याने क्वाड्रादोला लांब धाव घेत अप्रतिम गोल करण्याची संधी उपलब्ध केली.
कोलम्बियाची मधली फळी ज्या प्रभावीपणे सूत्रे हलविते आहे, ते पाहता सेनेगलविरुद्ध आग्यामोहोळाचा हल्ला संभवतो. या विजयाने त्यांचा आत्मविश्वास आभाळाइतका उंचावला आहे. इंग्लंडने पनामावर गोलवर्षाव करीत ६-१ अशा टेनिस स्कोअरने लढत जिंकली. विश्वचषकामध्ये त्यांनी एवढ्या फरकाने केव्हाच विजय मिळवला नव्हता. याचा अर्थ इंग्लंड पुढे बरेच काही साध्य करेल, असे खात्रीने म्हणता येत नाही. कर्णधार हॅरी केनने तीन गोल केले. ज्यापैकी दोन होते पेनल्टीचे. हडबडून गेलेल्या पनामा बचावपटूंनी केलेल्या घोर चुकांचा तो परिणाम होता.
या पेनल्टीचे निर्णय दिल्यानंतर इजिप्तचे रेफरी घियाड ग्रिशा यांनी ‘व्हीएआर’कडे खात्री करण्याचा मार्ग पत्करला. प्रत्येक वेळी त्यांनी त्यासाठी तीन-एक मिनिटे घेतली आणि पूर्वार्धाच्या शेवटी ‘स्टॉपेज टाइम’ दिला फक्त चार मिनिटे. याकडे फिफाने अधिक लक्ष देऊन अभ्यास करावा असे वाटते. ठीक आहे. येथे पराभवाचे अंतर मोठे होते. पण एखादे मिनिट काय तर काही सेकंद किती मोलाचे असतात, ते ब्राझील आणि जर्मनीने तसेच आणखी काही संघांनी नाही अनुभवले?
जपानने आशियाच्या आशा कायम ठेवताना सेनेगलशी दोन वेळा बरोबरी साधली. गोलरक्षकांच्या साध्या चुकांमुळे आणि फॉरवर्ड्सना गोलसंधीचा लाभ न उठवता आल्याने एक चांगली संधी जपानच्या हातून निसटली. स्पर्धेतून बाद झालेल्या, मनोबल खच्ची झालेल्या पोलंडला त्यांनी हरविले, तर त्यांना आगेकूच करता येईल. आपल्या खेळामध्ये ब्राझीलच्या खेळातील खासियतींचे मिश्रण करणाऱ्या जपानला ते साध्य व्हावे!

Web Title: Latin football is also Colombia, Uruguay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.