भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:47 PM2017-09-20T18:47:39+5:302017-09-20T18:57:37+5:30

नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच संयमाची अन आरोग्याची परीक्षाच असते. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल

Easy Menu for healthy fast in this Navaratri | भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा!

भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा!

Next
ठळक मुद्देनऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच आपल्या संयमाची, आरोग्याची परीक्षाच असते.नऊ दिवस उपवासाचे पदार्थ करावे तरी कोणते? हा यक्ष प्रश्न असतोच. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको.

 



- सारिका पूरकर-गुजराथी


देवीच्या नऊ रूपांचे, तिच्या शक्तीचे षोडपचारे पूजन नवरात्रीदरम्यान देशभर केले जाते. आसूरां, दैत्यांवरील तिचा विजय देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सृजनाचा, चैतन्याचा हा उत्सव भारतीयांच्या परंपरा, सणावारांमधील प्रमुख असा आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री साजरा होणारा उत्सव. या उत्सवात नऊ दिवस उपवास केल्यास देवीची कृपा, आशीर्वाद लाभून घरात सुख-समृद्धी नांदते, ही भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून नऊ दिवस उपवास केले जातात. काही ठिकाणी दोन्ही वेळ उपवासाचे पदार्थ सेवन करण्याची प्रथा आढळते, तर काही ठिकाणी धान्य फराळ, एक भुक्त उपवास केले जातात, म्हणजेच एकवेळ उपवासाचे पदार्थ व रात्री दूधातील दशमी, भेंडीची तूपाच्या फोडणीतील भाजी असे पदार्थ खावून उपवास केले जातात.
नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच आपल्या संयमाची, आरोग्याची परीक्षाच असते. एकतर उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे, साबुदाणा यांसारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे अ‍ॅॅसिडिटीचा त्रास होतो. शिवाय नऊ दिवस उपवासाचे पदार्थ करावे तरी कोणते? हा यक्ष प्रश्न असतोच. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल आणि नऊ दिवस तरतरी, शक्ती याची अजिबात उणीव तुम्हाला भासणार नाही..

दिनांक 21 ते 25 सप्टेंबरचे फराळ नियोजन

गुरूवार दि.21 सप्टेंबर

सकाळाचा नाश्ता

भगरीचा उपमा :- भगर कढईत भाजून पाण्यात भिजवून ठेवा. किमान एक-दीड तास तरी भिजली पाहिजे. नंतर पाण्यातून ती उपूसन, पाणी निथळून घ्या. साजूक तूपात जिरे, हिरवी मिरची, हवे असल्यास तिखट घालून उपसलेली भगर घाला. चांगली परतून घ्या. चवीला मीठ, किंचित साखर घाला. अगदी थोडं पाणी घेवून पाण्याचा हबका मारु न भगर मंद आचेवर वाफवा. भगरीचा दाणा मोकळा व्हायला हवा. भगरीचा भात व्हायला नको. वाफ आल्यानंतर उपम्यावर दाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि कोथिंबीर पेरा.
दूपारचं जेवण

उपवासाची बट्टी व बटाटा रस्सा :- साबुदाणा, राजगिरा, भगर, शिंगाड्याचं पीठ बाऊलमध्ये घ्या. त्यात किसलेला बटाटा, दाण्याचा कूट, भिजवून उपसलेली भगर, मीठ, दही, खाण्याचा सोडा, जिरे, काळीमिरी पावडर, साजूक तूपाचं मोहन घालून एकजीव मळून घ्या. या मिश्रणातून बट्टीच्या आकाराचे गोळे बनवून पाण्यात उकडून घ्या.नंतर गॅस तंदूरमध्ये खरपूस शेकून घ्या. या बट्या खाद्यतेलात तळल्या तरी चालतील. या बट्टीबरोबर उकडलेला बटाटा कुस्करु न घ्या. हिरवी मिरची, कोथिंबीर, काळीमिरी पावडर, मीठ घालून मिश्रण वाटून घ्या. कढईत साजूक तूपाची फोडणी करु न जिरे, लवंग तडतडून घ्या.नंतर मिरचीचे वाटण घालून परता. यात आता कुस्करलेला बटाटा, जिरे पावडर घालून चांगले घोटून घ्या.गरजेनुसार पाणी घालून खदखद उकळू द्या. गरमगरम रस्सा बट्टीबरोबर सर्व्ह करा.
रात्रीचं जेवण
बदामाचं सूप :- बदाम पाण्यात भिजवून वाटून पेस्ट बनवा. साजूक तूपात हिरची मिरची घालून परतून घ्या. नंतर यात दोन चमचे शिंगाड्याचं पीठ घालून परतून घ्या. यात आता नारळाचं दूध, बदामाची पेस्ट घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण चांगलं उकळू द्या. यात काळिमिरी पूडही घालू शकता.
शुक्र वार दि.22 सप्टेंबर

सकाळाचा नाश्ता

चिकू मिल्कशेक :- बिया काढलेले चांगले गरदार चिकू आणि दूध, गरजेनुसार साखर घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. ग्लासभर मिल्कशेक दमदार नाश्ता म्हणून ट्राय करा.

 

 

दूपारचं जेवण

उपवासाची पोळी -भाजी :- कितीही चटक-मटक खाल्लं तरी पोळीभाजीशिवाय भूक भागत नाही, त्यासाठी एक कप राजिगरा आणि भगरीचं पीठ ( दोनही मिळून एक कप ), दोन चमचे शिंगाड्याचं पीठ, चवीला मीठ, तुपाचं मोहन घालून कणिक मळून घ्यावी. दहा मीनिटांनंतर या पीठाची बिनघडीची पोळी लाटून घ्या. फुलके भाजतो तसे भाजून घ्या. या पोळीबरोबर उकडलेल्या बटाट्याची साजूक तूप,जि-याची फोडणी घातलेली भाजी किंवा सुरणाची पातळ भाजीही खाऊ शकता.
रात्रीचं जेवण

साबुदाणा सॅलॅड :- काकडी, सफरचंदाचे बारीक तुकडे करु न घ्या. बाऊलमध्ये हे तुकडे, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. नंतर तळलेला उपवासाचा साबुदाणा, तळलेले काजू-बदाम, खोवलेला नारळ, लिंबू रस, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा. क्र ंची पण हेल्दी सॅलॅड तयार होइल.

 

शनिवार दि.23 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता

रताळ्याचा शिरा :- उकडलेल्या बटाट्याचा करतो तसाच रताळे उकडून, कुस्करुन साजूक तूपात परतून हा शिरा बनवता येतो. गरजेनुसार साखर आणि सुकामेवा घातल्यास पौष्टिक नाश्ता तयार होतो.
दूपारचं जेवण

भगरीच्या दशम्या आणि दह्यातली अरबी :- भगर भाजून तिचं पीठ बनवून घ्या. या पीठात चवीला मीठ घाला. नंतर या पीठाची उकड काढून घ्या. उकड गार झाल्यावर त्याच्या दशम्या लाटून तव्यावर साजूक तूप सोडून शेकून घ्या. भाजीसाठी अरबी स्वच्छ करून उकडून, सोलून घ्या. मध्यम काप करा.साजूक तूप गरम करु न जिरे, हिरवी मिरची तडतडवा. यात अरबीचे काप घालून परता. चांगले परतल्यावर काजूची पेस्ट, जिरे पावडर, मीठ, लाल तिखट (तिखट नको असल्यास काळीमिरी पावडर) घाला. मिक्स करा. गरजेनुसार पाणी घालून घट्ट दही घाला. मंच आचेवर उकळी आणा, दही फाटता कामा नये याची काळजी घ्या.
 

रात्रीचं जेवण

खारी लस्सी :- घट्ट सायीचं दही, साधं मीठ, सैंधव मीठ, जिरे पावडर आणि आवडत असल्यास किंचित काळीमिरी पावडर घालून मिक्सरधून काढून घ्या. यात तुम्ही कोथिंबिरीची पानंही घालू शकता. ही खारी लस्सी गार करून प्यावी.
रविवार दि.24 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता

उपवासाचा ढोकळा- भिजवलेली भगर, साबुदाण्याचं पीठ, दही एकत्र वाटून घ्या. या मिश्रणात मीठ आणि फ्रूट सॉल्ट घालून वाफवून घ्या, त्यापूर्वी त्यावर काळीमिरी पावडर भुरभुरा. गार झाल्यावर ढोकळा कापून घ्या.साजूक तूप, जि-याची फोडणी यावर पसरवून कोथिंबीर भुरभुरावी.

दूपारचं जेवण

आलू पराठा :- बटाटा कुस्करु न घ्या. साजूक तूपात जिरे तडतडले की हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण घाला. बटाटा, मीठ, काळीमिरी पावडर घालून एकजीव करु न थंड होऊ द्या.राजगिरा पीठात किंचित भगरीचं पीठ घालून कणीक मळून घ्या.या गोळ्यातून पुरी लाटून बटाट्याचे सारण भरु न पराठा लाटून साजूक तूपावर शेकून घ्या. घट्ट सायीच्या दह्यासोबत हे पराठे खाता येतात.
 

रात्रीचं जेवण

रताळ्याची खीर :- रताळी धुवून सोलून किसून घ्या. साजूूक तूपात हा किस घालून मंद आचेवर परतून घ्या, किस चांगला नरम झाला की दूध घालून उकळू द्या. मंद आचेवर दहा मिनिटं तरी उकळायला हवे. नंतर यात साखर घालून आणखी उकळू द्या. शेवटी वेलची पावडर, सुक्यामेव्याचे काप घाला. ही खीर घट्ट आणि व थंडच चांगली लागते. एक बाऊल खीर म्हणजे रात्रीचा परिपूर्ण आहार होईल.

 


 

 

सोमवार, दि.25 सप्टेंबर
सकाळचा नाश्ता
अरबी/बटाटा/सुरण चाट :- तिघांपैकी काहीही एक उकडून सोलून मध्यम आकारात तुकडे करु न घ्या. या तुकड्यांवर शिंगाड्याचं पीठ, मीठ भुरभुरु न चांगले घोळवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करु न त्यावर हे तुकडे शॅलो फ्राय करा. नंतर त्यावर तळलले शेंगदाणे, कोथंबीर आणि लिंबू रस घालावा.
 

दूपारचं जेवण

डोसा-भाजी:- भगर-साबुदाण्याचं पीठ भिजवून त्यात मीठ आणि तेल घालून दोन तास मुरवत ठेवा. राजगिरा, शिंगाडा पीठही घालू शकता. नंतर पॅनवर डोसे काढून घ्या. यासोबत उकडलेले रताळे, सुरण, अरबी याची कोरडी किंवा रस्सा भाजी खाता येते.
 

रात्रीचे जेवण

शिंगाड्याची कढी :- ताकात दोन चमचे शिंगाडा पीठ घालून घुसळून घ्या. साजूक तूपात जिरे, हिरवी मिरचीची फोडणी करा. हवी असल्यास लाल साबूत मिरची घालू शकता. नंतर ताक-पीठाचं मिश्रण घाला. चवीनुसार मीठ, सैंधव मीठ, चवीला साखर, चालत असल्यास किसलेले आलं घाला. चांगली उकळी येऊ द्या. गरमागरम कढी प्या.

 

Web Title: Easy Menu for healthy fast in this Navaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.