अस्सल चवींचे हे देसी सूप थंडीची हुडहुडी नक्की घालवतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 06:36 PM2017-11-08T18:36:06+5:302017-11-08T18:42:51+5:30

टोमॅटो, मिक्स व्हेजिटेबल, स्वीट कॉर्न हे नेहेमीचेच सूप पिऊन कंटाळला असाल तर यंदाच्या थंडीत काहीतरी वेगळं गरमागरम ट्राय करायला हवं. त्यासाठी आपले अस्सल चवीचे देसी सूप आहेतच.

The desi soup to make you able to fight with cold | अस्सल चवींचे हे देसी सूप थंडीची हुडहुडी नक्की घालवतील!

अस्सल चवींचे हे देसी सूप थंडीची हुडहुडी नक्की घालवतील!

googlenewsNext
ठळक मुद्दे* हिवाळ्यातील एक सूप म्हणून सुंठेची कढी प्यायलाच हवी. आजीची रेसिपी म्हणून लोकप्रिय असलेली ही कढी सूप म्हणूनही या थंडीत ट्राय करता येईल.* रस्सम हा दक्षिण भारतातील अत्यंत लोकप्रिय, चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. हे रस्सम भाताबरोबरही खाल्ला जातो किंवा थंडीत सूप म्हणूनही प्यायला जातो.* उत्तर भारतात मटारपासून झोल हा सूपचा प्रकार बनवतात. चवीला भन्नाट आणि करायला सोपा.

 

सारिका पूरकर-गुजराथी


कडाक्याच्या थंडीत आले, गवती घातलेला चहा जसा तुम्हाला हवाहवासा वाटतो, चहा घेतला की कशी छान तरतरी येते, तशीच कडाक्याच्या थंडीत गरमागरम सुपनं देखील मजा येते. घसा शेकला जातो. तोंडाला छान चवही येते.
सूप एरवीही केलं जातं परंतु खास थंडीच्या दिवसात वाफाळत्या सूपच्या बाऊलचं महत्त्वं फारच . पण टोमॅटो, मिक्स व्हेजिटेबल, स्वीट कॉर्न हे नेहेमीचेच सूप पिऊन कंटाळला असाल तर यंदाच्या थंडीत काहीतरी वेगळं गरमागरम ट्राय करायला हवं.

1) सुंठेची कढी

थंडी म्हटलं की, सर्दी, पडसे, घसादुखी हे ओघानं आलंच. बहुधा थंड हवेमुळे आतापासूनच अनेकजण यामुळे जाम झाले आहेत. तर यावर उपाय म्हणा किंवा मग हिवाळ्यातील एक सूप म्हणून सुंठेची कढी प्यायलाच हवी. आजीची रेसिपी म्हणून लोकप्रिय असलेली ही कढी सूप म्हणूनही या थंडीत ट्राय करता येईल. थोड्याशा आंबट ताकात मुगाच्या डाळीचं पीठ, धने-जिरे, ओवा, सुंठ, शहाजिरे, हरडा, आवळकाठी, सैंधव मीठ यांची एकत्र करून पूूड घालावी. ही पूड कढीमध्ये चांगली ढवळून घ्यावी. नंतर त्यावर साजूक तूप, हिंग, जि-याची खमंग फोडणी ओतून हलकी उकळी काढूून ही कढी तयार केली जाते. अत्यंत पाचक आणि रु चकर अशी ही कढी सूप स्वरु पात घ्यायला काहीच हरकत नाही. घसा, पोट यांचे विकार या कढीमुळे एकदम छू मंतर होतात.

 


 

2) रस्सम

दक्षिण भारतातील हा अत्यंत लोकप्रिय, चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. आपण महाराष्ट्रात सार बनवतो तसाच परंतु आणखी मसालेदार आणि चवदार असतं रस्सम. दक्षिण भारतात टोमॅटो, चिंच, लसूण, काळी मिरी यांपासून विविध चवींचे रस्सम बनवतात. त्यासाठी दाक्षिणात्य पद्धतीचा खास मसाला केला जातो. त्यामुळे रस्समची चव आपल्या सारापेक्षा वेगळी लागते. धने, मेथी दाणे, काळी मिरी, मोहरी,हिंग, गंटूर लाल मिरची, कढीपत्ता, तूरडाळ हे चांगले भाजून घेऊन मिक्सरमधून काढून बारीक केलं की तयार होतो रस्सम मसाला. हा मसाला वापरु न विविध रस्सम बनवले जातात.टोमॅटो रस्समसाठी चिंचेच्या कोळात शिजवलेली तूरडाळ, टोमॅटो फोडी किंवा प्युरी, रस्सम पावडर , गूळ, खवलेला नारळ, कोथिंबीर घालून उकळले की हिंग, उडद डाळ,कढीपत्ता, लाल मिरचीची फोडणी करून त्यावर ओततात. गरमागरम रस्सम जबरदस्त लागतो. याचप्रकारे काळी मिरी, जिरे, मिरची,लसूण बारीक करून चिंचेच्या कोळात हे मिश्रण उकळून रस्सम केला जातो. भाताबरोबरही खाल्ला जातो किंवा थंडीत सूप म्हणूनही प्यायला जातो.

 


 

3) मटार झोल

हिवाळ्यात बाजारात हिरवे मटारचे ढीग लागतात. चवीला गोड, लुसलुशीत मटारचे दाणे प्रोटीननं भरलेले असतात. उत्तर भारतात मटारपासून झोल हा सूपचा प्रकार बनवतात. चवीला भन्नाट आणि करायला सोपा. टोमॅटो, आले, हिरवी मिरची वाटून घेतली जाते. साजूक तूपात जिरे, हळद,धने पावडर घालून ही पेस्ट चांगली परतून मटारची भरड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. भरपूर पाणी, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला घालून मिश्रण उकळलं की झोल तयार होतो. सर्व्ह करताना चमचाभर साजूक तूप घातलं तर या झोलची चव केवळ अप्रतिम लागते.

 


 

4) हरभरा सूप

केरळमध्ये हे सूप थंडीच्या दिवसात खास करून केलं जातं. हरभ-यात भरपूर प्रोटीन्स , फायबर असतात. तसेच शक्तीवर्धकही असतात. म्हणूनच हे सूप यंदाच्या हिवाळ्यात नक्की करून पाहा. हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करु न घेतली जाते. साजूक तूपात जिरे तडतडवून कढीपत्ता, हिरवी मिरची-लसूण पेस्ट,हिंग, जिरे-धने पावडर, काळी मिरी पावडर घालून या फोडणीत हरभ-याचं पाणी घातलेलं वाटण घालून मीठ घालावं. आणि मिश्रणाला चांगली उकळी काढावी. हे सूप चवीला अतिशय रूचकर लागतं.

 

 

Web Title: The desi soup to make you able to fight with cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.