ठळक मुद्दे* लग्नसमारंभातला मेन्यू ठरवताना त्यात अवश्य वैविध्यता ठेवा परंतु त्यासाठी पदार्थाचे प्रकार, संख्या हे मात्र मर्यादित ठेवा. एका वेळेस किती प्रकार खरोखर खाल्ले जातात याचा विचार अवश्य करायला हवा.* लग्नातला मेन्यू ठरवताना शक्यतो त्या ऋतुत उपलब्ध होणारे घटक पदार्थ वापरावर भर द्यावा तसेच लग्न सोहळा ज्या भागात आहे, त्या प्रांतातील विशिष्ट चवीचे पदार्थ, तेथील लोकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन मेन्यू ठरवावा.* जेवणासाठी उगाचच मॉडर्न, वेगळ्या चवीच्या पदार्थांचा अट्टाहास धरू नका. ही चव आवडली नाही तर अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची भीती असते. पारंपरिक परंतु थोडे बदल केलेले पदार्थ नक्की ठेवू शकता.-सारिका पूरकर-गुजराथी


तुळशीचं लग्न लागल्यानंतर लगेचच सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू होईल. लग्नाचे बार दणक्यात उडवले जातील.
जंगी, शाही विवाह सोहळे ही अलिकडची विवाह संकल्पना चांगलीच जोर धरू लागलीय. त्यामुळे साहजिकच विवाह सोहळ्यातील प्रत्येक रिती-रिवाज, परंपरा, विधी याबरोबरच खानपानालाही ‘जंगी’पणाची झालर लावली जाते. पूर्वी लग्नाचं जेवण म्हणजे वरण-भात, मसाले भात, चटणी-कोशिंबीर, पापड, श्रीखंड, पोळी-पुरी, रस्सा भाजी हा मेन्यू फिक्स होता.

 

परंतु आता लग्नाचं जेवण म्हटलं की छप्पन भोग मेन्यू तयार केला जातो. लग्नातील व-हाडी मंडळींना कायम स्मरणात राहील, ते आपल्या लग्नातल्या जेवणाचं सतत नाव काढतील अशी चव, असे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. त्यात अगदी नाश्ता-न्याहारीच्या पदार्थापासून पाणीपुरी, नूडल्स, डोसा अशा अनेकाविध पदार्थांचाही शिरकाव झाला आहे. इथवरच यादी संपत नाही. रबडी, रसमलाईपासून बदामाचा शिरा, मुगाचा हलवा असे शाही गोडाचे पदार्थ, पंजाबी, साऊथ इंडियन मेन्यू, रोटी-पोळीचे, भात-पुलावाचे सॅलाडचे आणि सूपचे नानाविध प्रकार जेवणाच्या पंक्तीत दिसू लागले आहेत. खवय्यांचे चोचले जरी यामुळे पुरवता येत असले तरी या बुफे पद्धतीमुळे तसेच पदार्थांच्या मुबलक प्रकारांमुळे लग्न सोहळ्यात अन्नाची नासाडी प्रचंड वाढली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात आजही लाखो नागरिकांना दोन वेळचं पोटभर अन्न मिळत नसताना अन्नाची ही नासाडी अत्यंत चिंताजनक आहे. दूध, तुप, पनीर, महागडा तांदूळ यासारखे घटकांचीही ही नासाडी आहे. भाजीपाला, मसाले हे देखील लग्नामधली उष्टं टाकण्याच्या सवयीमुळे वाया घालवलं जातं. म्हणूनच ही अन्नाची नासाडी आणि त्यासाठी होणारा पैशांचा चुराडा टाळायला हवा. लग्नातील मेन्यूचं नीट प्लॅनिंग केलं तर तो   खाणा-याच्या स्मरणातही राहातो आणि लग्न समारंभातील अन्नाची नासाडीही यामुळे टाळता येते.

लग्नातला मेन्यू ठरवताना..
१) लग्नसमारंभातला मेन्यू ठरवताना त्यात अवश्य वैविध्यता ठेवा परंतु त्यासाठी पदार्थाचे प्रकार, संख्या हे मात्र मर्यादित ठेवा. एका वेळेस किती प्रकार खरोखर खाल्ले जातात याचा विचार अवश्य करायला हवा. उदाहरणार्थ नाश्त्यासाठी, फर्स्टकोर्ससाठी तुम्ही स्नॅक ठेवत असाल तर त्यात लहान लहान स्नॅक न ठेवता कटलेट टिक्कीचा एकच परंतु परिपूर्ण प्रकार ठेवा. भजी, पकोडा यांचे प्रकार टाळून मेन कोर्समध्येही तुम्ही स्नॅक ठेवू शकता.

२) विवाहातील जेवणासाठी भरमसाठ प्रकार ठेवू नका. यामुळे तुमचं बजेट तर वाढतं. शिवाय हे खाऊ की ते खाऊ असं म्हणत खाणारे प्लेटमध्ये सर्व प्रकार एकाचवेळी घेतात. मात्र ते संपवले मात्र जात नाही. त्यामुळे अन्नाची नासाडी होते.म्हणून मोजकेच पण अत्यंत चवदार तसेच पोषक मूल्यांचा समावेश असलेले पदार्थ ठेवावेत.

३) गोड पदार्थांची मेजवानी ही लग्नसमारंभातलं प्रमुख आकर्षण असतं. परंतु त्यासाठी सतराशेसाठ गोड पदार्थ ठेवू नका. उदाहरणार्थ रसमलाई, जिलबी, गाजर हलवा, गुलाबजाम हे सर्व पदार्थ मेजवाणी म्हणून एकत्र एकाच सोहळ्यासाठी अजिबात ठेवू नका. कारण या गोड पदार्थांना एकाचवेळी खाणं केवळ अशक्य. म्हणूनच गोड पदार्थांची यादी फार न लांबवता ती एक किंवा दोन गोड पदार्थांवरच संपवा.

 

४) महागडे घटक पदार्थ जपून वापरा. लग्न सोहळ्यातील मेनूसाठी आवश्यक असणारे तूप, पनीर, दूध, साखर, तांदूळ, मसाले हे महागडे घटक पदार्थ जपून वापरायला सांगा.

५) नवीन काहीतरी देण्याचा, करण्याचा आपला प्रयत्न आणि इच्छा लग्न समारंभासारख्या प्रसंगी जो तो पूर्ण करत असतो. परंतु नवीन वेगळे म्हणून घोषा लावताना हे लक्षात घ्यायला हवं की, सर्वच नवीन पदार्थ, प्रकार चवदार असतीलच असं नाही. त्यामुळे जेवणासाठी उगाचच मॉडर्न, वेगळ्या चवीच्या पदार्थांचा अट्टाहास धरू नका. ही चव आवडली नाही तर अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची भीती असते. पारंपरिक परंतु थोडे बदल केलेले पदार्थ नक्की ठेवू शकता.

६) लग्नातला मेन्यू ठरवताना शक्यतो त्या ऋतुत उपलब्ध होणारे घटक पदार्थ वापरावर भर द्यावा तसेच लग्न सोहळा ज्या भागात आहे, त्या प्रांतातील विशिष्ट चवीचे पदार्थ, तेथील लोकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन मेन्यू ठरवावा. आवडीच्या चवीचे पदार्थच जर आकर्षक पद्धतीनं ठेवले तर वºहाडी मंडळी नक्कीच खुश होईल. चव नसलेले पदार्थ कितीही सजवले तरी ते संपणार नाहीत हे आधी लक्षात ठेवा.

७) सूप, दही-भल्ला, रगडा पॅटीस असे चाटचे तसेच स्नॅकचे जास्तीचे टेबल्स शक्यतो ठेवू नका. यामुळे मुख्य

जेवणाकडे व-हाडी दुर्लक्ष करतात आणि अन्न वाया जातं.

८) विवाह सोहळ्यातील मेन्यूसाठीचे तुमचे आर्थिक नियोजन केटरला समजावून सांगा. त्यानुसारच पदार्थ ठरवा. आधी पदार्थ ठरवून नंतर बजेट प्लॅन करू नका.