तेलकट त्वचाही सुंदर दिसू शकते फक्त हे करा!
तेलकट त्वचाही सुंदर दिसू शकते फक्त हे करा!

ठळक मुद्दे* व्हाइटहेडससाठी संत्र्याची साल, तांदळाचं पीठ आणि वाटाण्यांची पावडर उपयोगी पडते.* ब्लॅकहेडसाठी क्लीजींग आणि स्क्रब खूप महत्वाचे असतात.* उघड्या रंध्रासाठी केळ, पपई, टोमॅटो आणि गुलाबपाणी यांचा उपाय करावा.
- माधुरी पेठकर


ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी नितळ त्वचा म्हणजे केवळ स्वप्नंच ठरतं. तेलकट त्वचेच्या अंगभूत गुणधर्मामुळे त्वचेला हानिकारक घटक त्वचेमध्ये अगदी सहज शोषले जातात आणि त्वचा खराब होते.
त्वचेचा हा दोष दुरूस्त करण्यासाठी मग पार्लर किंवा त्वचा रोग तज्ञ्ज्ञांकडे जावून महागड्या ट्रीटमेण्ट घेण्यावाचून पर्याय नसतो. पण असं जरी वाटत असलं तरी त्वचेकडे रोज थोडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं, घरात सहज उपलब्ध होणारे घटक वापरून त्वचा स्वच्छ ठेवणारे उपाय केले तर तेलकट त्वचाही नितळ आणि सुंदर दिसू शकते.
तेलकट त्वचेवर मळ लवकर जमा होतो. त्यामुळे त्वचा खराब करणा-या तीन प्रमुख समस्या निर्माण होतात. व्हाइट हेडस, ब्लॅकहेडस ( मुरूमांचा प्रकार) आणि रंध्र मोठ्या प्रमाणात उघडणे. पण त्वचा दिवसभर जर स्वच्छ ठेवली तर या समस्यांवर घरच्याघरी मात करणं शक्य आहे.

 

 


 

व्हाइटहेडसाठी

त्वचेच्या खाली तेल साठलेल्या छोट्या गुठळ्या तयार होतात. ज्या त्वचेच्या वरच्या भागात पांढ-या आणि पिवळसर दिसतात. त्यामुळे त्वचा उंचसखल दिसते. यासाठी घरच्याघरी करता येणारा उपाय आहे. यासाठी दोन चमचे संत्र्याच्या सालाची पावडर, दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे सुकलेल्या वाटाण्यांची पावडर घ्यावी. हे सर्व साहित्य एकत्र करून त्या गुलाब पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट करावी. हा लेप हळुवारपणे   चेहे-यास लावावा. तो वाळू द्यावा. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा आणि हळुवार टिपून घ्यावा.

ब्लॅकहेडसाठी
 

ब्लॅकहेड हे कडक असतात. ते हवेच्या संपर्कात येवून काळे होतात. ते त्वचेत खोलवर रूतून बसलेले असतात. यांची जर नीट काळजी घेतली नाही तर त्याचे फोड होतात. यासाठी क्लीजींगची ट्रीटमेण्ट उपयुक्त असते. यासाठी स्क्रब आणि हलका मसाज आवश्यक असतो. हे स्क्रब घरच्याघरी करता येतं. यासाठी दोन चमचे संत्र्याचा रस, दोन चमचे मध घ्यावं आणि त्यात चिमूटभर औषधी कापूर घालावा. संत्र्याच्या सालात अ‍ॅसिड असतं ज्याचा उपयोग त्वचा स्वच्छ होण्यासाठी होतो आणि मध हे मॉश्चरायझिंगसाठी चांगलं असतं. हे मिश्रण एकत्र करून  चेहे-यावर हलक्या हातानं काही मिनिटं मसाज करावा. आणि चेहेरा गार पाण्यानं धुवून स्वच्छ करावा. हा स्क्रब नियमित लावल्यास चेहेरा स्वच्छ राहातो आणि ब्लॅकहेडसही जातात.
पण जर ब्लॅकहेडसची समस्या जुनी असेल आणि घरच्या उपायांनी कंण्ट्रोल होत नसेल तर मग त्यावर पार्लरमध्ये जावून उपचार घ्यावा. ब्लॅकहेड जाण्यासाठी वाफ घेण्याच्या उपायाचा चांगला फायदा होतो. ही वाफ घेताना त्यात लव्हेंडर तेलाचे दोन तीन थेंब, लिंबाची सालं आणि पुदिन्याची पानं घातली तर वाफ घेताना त्वचेकडून या घटकांचे गुणधर्मही त्वचेत शोषले जातात. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि ब्लॅकहेडसही कमी होतात.

व्हाइटहेड आणि ब्लॅकहेड जाण्यासाठी क्लिजिंग, त्यासाठी लेप, स्क्रब , वाफ हे जेवढं महत्त्वाचं तितकंच पुरेसं पाणी पिणं पोटात फायबर असलेले घटक पुरेशा प्रमाणात जाणंही गरजेचं असतं. त्वचा स्वच्छ राहण्यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्यायला हवं. आहारात कच्च्या भाज्या आणि फळं यांचा योग्य समतोल हवा. मिक्स धान्यांची पोळी, हिरव्या पालेभाज्या, कोबी, बिन्स हे घटक आहारात असले तरी त्वचेचं आरोग्य सुधरायला मदत होते.

 


 

केळ, पपई, टोमॅटो आणि गुलाबपाणी

तेलकट त्वचेमुळे त्वचेची रंध्र नेहेमीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उघडी होतात. त्यामुळे त्यातून जास्त तेल स्त्रवतं . त्वचा सैल पडते. त्वचा बांधून ठेवणारे उपाय केले तर ही रंध्रही बंद होतात. यासाठी पिकलेलं केळ घ्यावं. ते चेहे-याला घासावं.20 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
यासाठी टोमॅटो आणि पपईचाही उपयोग होतो. टोमॅटोचा गर काढून तो चेहे-यावर घासावा. तो चेहे-यावर सुकू द्यावा. आणि नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
पपई वापरताना पपईचा गर 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवावा. तो गार झाल्यावर चेहे-यावर हळुवार घासावा. गर वाळू द्यावा. चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. केळ, टोमॅटो आणि पपईमुळे त्वचा घट्ट होते, रंध्र बंद होतात.
त्वचा चांगली ठेवण्यासाठी गुलाबपाण्याचाही उपयोग होतो. यासाठी गुलाब पाण्याचा बर्फ करावा. आणि हे आइस क्युब चेहे-यावर फिरवल्यातरी त्वचा छान होते.


Web Title: Oily skin can look beautiful too, just do it!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.