हातमोज्यांबद्दलचे ते सतरा नियम तुम्हाला माहिती आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:20 PM2018-01-23T18:20:15+5:302018-01-23T18:43:02+5:30

आता केवळ थंडी वा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे हातमोजे एकेकाळी एवढे महत्वाचे होते की ते वापरताना सामाजिक संकेत पाळले जात. या गोष्टीवर कदाचितच कोणाचा विश्वास बसेल, पण ते खरं होतं.

Do you know these 17 social rule of hand gloves? | हातमोज्यांबद्दलचे ते सतरा नियम तुम्हाला माहिती आहेत का?

हातमोज्यांबद्दलचे ते सतरा नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Next
ठळक मुद्दे* हातमोजे घातलेले असतानाच एखाद्याशी हस्तांदोलन केल्यास अशा व्यक्तीकडे चक्क दोषी म्हणून पाहिलं जायचं.* लाल रंगाचा, दागदागिन्यांनी मढवलेला हातमोजा हे पवित्र रोमन साम्राज्याचं प्रतीक होतं.* सतराव्या-अठराव्या शतकात लोक नक्षीकाम केलेले हातमोजे वापरत.

 


- मोहिनी घारपुरे-देशमुख


आपल्या पोषाखातील एक अविभाज्य घटक म्हणून सुरूवातीच्या काळात हातमोज्यांनी मानवी जीवनात एक अविभाज्य स्थान मिळवलं होतं. हे स्थान इतकं महत्त्वाचं होतं की हातमोजे घालण्यावरून सामाजिक संकेतच निर्माण झाले. कोणत्या रंगाचे हातमोजे कुठे कधी कसे वापरावे याचे सामाजिक संकेत काटेकोरपणे पाळले जात असत. याबद्दल शोध घेतला असता अनेक रंजक संदर्भ सापडतात. या संदर्भावरून तत्कालिन समाजव्यवस्थेचाही अंदाज बांधता येतो.

 

हातमोजे आणि सामाजिक संकेत

1. उजव्या हातातील मोजा हा खूप अर्थपूर्ण होता. आपल्यापेक्षा उच्चपदस्थ व्यक्तीला भेटण्यापूर्वी उजव्या हातातील मोजा काढून ठेवण्याची प्रथा होती.

2. लाल रंगाचा, दागदागिन्यांनी मढवलेला हातमोजा हे पवित्र रोमन साम्राज्याचं प्रतीक होतं.

3. न्यायनिवाडा करताना न्यायाधिश हातमोजे घालूनच न्यायदान करत.

4. स्पॅनिश प्रतिष्ठितांना पोप आणि राजाच्या उपस्थितीत हातमोजे घालण्याची परवानगी नसे. विशेषत: समारंभाप्रसंगी, चर्चमध्ये किंवा एखाद्याच्या अंत्ययात्रेमध्ये राजा आणि पोप उपस्थित असताना स्पॅनिश प्रतिष्ठीत मंडळींनी हातमोजे घालूच नयेत असा संकेत होता.

5. जितकी लहान बाही तितके लांब हातमोजे आणि आश्चर्य म्हणजे त्यांची फॅशन ही पॅण्टच्या फॅशनला साजेशी असे.

6. हातमोजे घातलेले असतानाच एखादी वस्तू उचलणं किंवा एखाद्याशी हस्तांदोलन केल्यास अशा व्यक्तीकडे चक्क दोषी म्हणून पाहिलं जायचं.

7. दातांच्या सहाय्यानं हातमोजे काढणा-या व्यक्तीकडेही लोक गुन्हेगार असल्याप्रमाणे पहात.

8. सतराव्या-अठराव्या शतकात लोक नक्षीकाम केलेले हातमोजे वापरत.

 

9. प्राचीन रशियामधील लोक मिटन्स वापरत. या मिटन्सना केवळ अंगठ्याच्या जागी छिद्र असे. श्रीमंत लोक हे मिटन्स चक्क सोन्यानं सजवत. तर महिला आपल्या मिटन्सला मोती आणि दागदागिन्यांनी मढवत. विशेष म्हणजे या मिटन्सवर रेशीम आणि सोन्याची किनार असे. विणलेले मिटन्स अनेकदा जरीकाम केलेलेही असत.

10. रशिया, सायबेरियाच्या उत्तर भागात दोन दोन मिटन्स एकावर एक वापरण्याचीही फॅशन होती. महिला आपल्या मिटन्सला सोन्याचांदीची जर लावून सजवत. इस्टर किंवा अन्य मोठ्या सुट्टीच्या काळात हे मिटन्स महिला आवर्जून वापरत.

11. एकोणीसाव्या- विसाव्या शतकादरम्यान सुती हातमोजे वापरात आले. दिवसा बोटं असलेले मोजे तर संध्याकाळी कोपराच्याही वरपर्यंत लांब असलेले हातमोजे वापरण्याची रीत होती. सुप्रसिद्ध स्त्रीया कोपरापर्यंत लांब असलेले पांढरे सुती हातमोजे वापरत. दैनंदिन जीवनातही स्त्रिया आपले हातमोजे काढत नसत. किंबहुना या हातमोज्यांवर त्या रिंग घालत असत.

12. काळे हातमोजे अंत्यविधीच्या वेळी, पिवळे हातमोजे शिकारीच्या वेळी, पांढरे हातमोजे बॅले डान्सच्या वेळी वापरण्याचा प्रघात होता.

13. वेटर्स देखील सुती हातमोजे वापरत.

14. घरातून बाहेर पडण्यापूर्वीच हातमोजे घालावे असा संकेत होता. चारचौघात हातमोजे घालणं शिष्टाचाराला धरून नसे. त्यामुळे तसं करणं असभ्यपणाचं होतं.

15. विसाव्या शतकाच्या प्रारंभी सर्वाधिक फॅशनेबल महिलेचे हातमोजे चक्क बकरीच्या कातडीचे बनवले गेल्याचे समजते.

 

16. खेळाकरिता वापरल्या जाणा-या हातमोज्यांकरीता सर्वोत्तम चामडे वापरले जात.

17. पार्टी आणि बॅले डान्सिंगच्या वेळी महिलांनी सिल्कचे पांढरे हातमोजे परिधान करणं जणू अनिवार्यच होतं. बॅले डान्सिंग करताना हातमोजा फाटला तरीही तो काढू नये असा संकेत महिलावर्गामध्ये होता. किंबहुना तसा तो फाटू शकतो हे लक्षात घेऊन हातमोज्याचा एक जादा जोड डान्सिंगला जाताना सोबत ठेवावा असाही प्रघात होता. तर पत्ते खेळताना किंवा रात्रीच्या भोजनाचे वेळी मात्र हातमोजे काढून ठेवावेत असा संकेत होता.

एकंदरीतच, काळाच्या ओघात हातमोज्यांच्या फॅशनमध्ये बदल झाला तसेच, त्याच्याशी निगडीत सामाजिक संकेतही बदलत गेले आहेत. आता केवळ थंडी वा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे हातमोजे एकेकाळी एवढे महत्वाचे होते यावर भविष्यात कदाचितच कोणाचा विश्वास बसेल ...
मात्र, कालची मागे पडलेली फॅशन केव्हा नव्यानं पुन्हा बाजारपेठेचा ताबा घेईल याचा काहीही नेम नाही! हातमोज्यांच्याही बाबतीत कदाचित असंच काही होईल!

 

 

Web Title: Do you know these 17 social rule of hand gloves?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.