तरुणाईला सावरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:42 PM2019-07-02T13:42:38+5:302019-07-02T13:44:26+5:30

तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे

Young! | तरुणाईला सावरा!

तरुणाईला सावरा!

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
भारत हा सर्वाधिक तरुण देश आहे, असे आपण अभिमानाने म्हणतो. ते खरे आणि वास्तव आहे. परंतु, या तरुणाईला सांभाळण्याचे, सावरण्याचे आणि दिशा देण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. अन्यथा ही तरुणाई वाहवत गेली तर मोठा अनर्थ ओढवेल. याची भयघंटा वाजू लागली आहे. पूर्वी महानगरांपुरती सीमित असलेली ही चिंता आता जळगावसारख्या छोट्या शहरांना भेडसावू लागली आहे, हे मू.जे.महाविद्यालयात तरुणांच्या क्षुल्लक वादात मुकेश सपकाळे या तरुणाच्या झालेल्या खुनावरुन स्पष्ट झाले आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या तरुणाईला दिशा देण्याचे काम करणार कोण हाच मोठा प्रश्न आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सगळ्या घटकांनी समन्वयाने व पुढाकाराने मार्ग काढायला हवा. या घटनेनंतर ज्या दोन-तीन प्रमुख बाबी समोर आल्या त्याचा विचार सुरुवातीला करुया. महाविद्यालयाच्या परिसरातील ही गुंडगिरी आहे. गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादाची किनार त्याला दिसत आहे. पीडित आणि आरोपी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शिक्षण जेमतेम बारावी, आयटीआय पर्यंत झालेले आहे. छोट्या स्वरुपातील नोकऱ्या काही जण करतात. हे चित्र पाहता सामान्य स्थितीतील हे तरुण गुन्हेगारी मार्गाकडे भरकटलेले दिसतात. एकावर केवळ पूर्वी गुन्हे दाखल आहेत. इतरांची तशी पार्श्वभूमी नाही. चित्रपटातील गुन्हेगारी विश्वाच्या प्रभावामुळे आकर्षित होऊन काही या मार्गाकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने आणि रोजगार नसल्याने तरुण मुले या मार्गाकडे सहजतेने आकर्षित होतात. जिद्दी, धाडसी, जीवावर उदार होणाºया तरुणांना हेरण्याचे काम काही टोळ्या करीत असतात, त्यांच्या हाती असे तरुण हमखास सापडतात. शिक्षण जेमतेम असल्याने नोकऱ्यांची संधी कमी आहे. गुन्हेगारी विश्वातून विनासायास भरपूर पैसा मिळत असताना कष्टाची चाकरी करायला अपरिपक्व विचाराची ही तरुण मुले तयार होत नाही.
आहे रे आणि नाही रे या घटकांमधील अंतर्विरोध हादेखील एक मुद्दा आहे. तुलना करताना आपल्याला या गोष्टी का मिळत नाही, समोरच्याला का मिळाल्या हा प्रश्न तरुणाईला पडतो. सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुध्दी नसल्याने मग टोळीत सामील होऊन हिसकावण्याची प्रवृत्ती बळावते. याचे परिणाम आणि पडसाद काय उमटतील, याचा विचार देखील ही मुले करीत नाही. आपल्या कुटुंबाचे काय होईल, ही काळजी त्यांना शिवत नाही. कुटुंबांवर निस्सीम प्रेम करणारी ही तरुणाई कुटुंबाला सगळे सुख देण्यासाठी अशा मार्गाकडे वळल्याचे समर्थन करीत असतात. ‘वाल्या ते वाल्मिकी’ असा प्रवास करण्यासाठी कुणी मार्गदर्शक भेटला तर शक्य आहे, अन्यथा घसरण अटळ आहे.
राजकीय मंडळी या तरुणाईचा करुन घेत असलेला वापर हा अधिक घातक आहे. आपल्या पदाचा, सत्तेचा वापर करुन किरकोळ स्वरुपाचे गुन्हे केलेल्या या तरुणांना वाचविण्याचे, सोडविण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असतात. पण अशा कृत्यांमधून आपण गुन्हेगारीला प्रोत्साहन, बळ देत आहोत, याकडे ते कानाडोळा करतात. त्यांचे इप्सित वेगळे असते. राजकारण, निवडणुका यासाठी या तरुणाईचा वापर करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा राजकीय पाठिंब्याच्या बळावर ही तरुणाई बेदरकार व बेधडकपणे गुन्हे करायला मोकळी होते. प्रशासनाचे हात बांधले जातात. भस्मासूर तयार झाल्यावर मग राजकीय मंडळींसह समाजाचे डोळे उघडतात. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलली जाते. पण खरेच अशी जबाबदारी ढकलणे योग्य आहे काय? तरुणाईला वेळीच योग्य मार्गावर आणणे समाजातील सर्वच जबाबदार घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. निव्वळ प्रशासन किंवा समाजावर ढकलून काही साध्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

Web Title: Young!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव