हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

By विजय दर्डा | Published: February 26, 2024 10:11 AM2024-02-26T10:11:40+5:302024-02-26T10:15:45+5:30

काही वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्याला गर्दीतून बाजूला काढते. फली नरिमन आणि अमीन सयानी ही दोन्ही अशीच श्रेष्ठ माणसे होती!

Why were these two so unusual? Fali Nariman and Amin Sayani... | हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

- डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल लोकमत समूह

गेल्या आठवड्यात दोन चांगली माणसे, महान व्यक्तिमत्त्वे आपल्यातून निघून गेली. घटनातज्ज्ञ आणि कायदेमहर्षी पद्मविभूषण फली एस. नरिमन आणि रेडिओवरचा मखमली आवाज पद्मश्री अमीन सयानी यांनी आपला निरोप घेतला. दोघांचीही कारकीर्द अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील, परंतु त्यांच्या परिचयात एक गोष्ट समान आहे: आवाज! त्यांच्या या आवाजाने दोघांनाही उत्तुंग शिखरावर पोहोचवले. या दोघांमध्ये असे काय खास, वेगळे होते? त्यांच्या जगण्यात डोकावले, तर एक 'चांगला माणूस' आणि 'उत्तम व्यावसायिक' होण्यासाठी आवश्यक अशा पुष्कळ गोष्टी सापडतील.

सद‌भाग्याने मला या दोघांचेही सान्निध्य लाभले. पदाविभूषण फली नरिमन खासदारही होते आणि त्यांच्याशी माझी चांगलीच जवळीक होती, त्यांनी 'रिंगसाइड' या माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या कार्यालयात गेलो की, आजूबाजूला पसरलेल्या पुस्तकांच्या ढिगात कामात बुडालेले नरिमन दिसत. कायद्याचे इतके आणि असे बारकावे ते शोधत की, भलेभले विशेषज्ञ त्यांच्या आसपासही येऊ शकत नसत, ऋषितुल्य फली नरिमन खऱ्या अर्थाने कायद्याचे पितामह होते. भारतीय घटना, नागरिकांचे मूलभूत अधिकार, राज्य सरकारची शक्ती, अशा बाबतीत त्यांनी केलेल्या व्याख्या कायद्याच्या क्षेत्रातील मैलाचा दगड मानल्या गेल्या, पद्मविभूषण फली नरिमन यांनी निर्भयतेने सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला.

१९७२ मध्ये ते भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त झाले. १९७५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. फली नरिमन यांनी त्यावेळी म्हटले की, हे घटनाबाह्य नागरिकांच्या मौलिक अधिकारांचे यातून हनन होत सर्वोच्च न्यायालयात आणीबाणीविरुद्ध याचिका दाखल करण्याचा त्यांनी ठेवलेला प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला, आणीबाणीवर टीका करणारा लेख त्यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिला. आकाशवाणीवरील एका भाषणातही त्यांनी आणीबाणीवर टीका केली. इंदिरा गांधी यांच्यासमोर अशा प्रकारे खंबीरपणे 'उभे राहणे' त्या काळात मोठी गोष्ट होती. त्यावेळी त्यांच्या या निर्भयपणामुळे फली नरिमन म्हणजे जो घाबरत नाही, झुकत नाही,' असे म्हटले जाऊ लागले; परंतु शेवटी फली नरिमन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयात काम करण्यावरही प्रतिबंध आणले गेले. असे असूनही ते कधी झुकले नाहीत. सत्याचा आवाज त्यांनी नेहमीच बुलंद राखला. 'लोकशाहीचे रक्षक' म्हणून त्यांची आठवण कायम काढली जाईल.

त्यांचे सुपुत्र रोहिंग्टन नरिमन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे सॉलिसिटर जनरल होते. मला फली नरिमन यांच्या 'बिफोर मेमरी फेड्स... अॅन ऑटोबायोग्राफी' या आत्मचरित्रातील काही ओळी आठवतात. पारसी कुटुंबात जन्माला आलेल्या नरिमन यांनी म्हटले होते, 'मी एका धर्मनिरपेक्ष भारतात राहिलो, फुललो, फळलो. ईश्वराची इच्छा असेल, तर योग्यवेळी मी धर्मनिरपेक्ष भारतामध्येच या जगाचा निरोप घेईना'

- वाढत्या धर्मांधतेची त्यांना चिंता वाटत होती का? या प्रश्नाचे उत्तर द्यायला फली आता आपल्यामध्ये नाहीत; पण प्रश्न तर शिल्लक आहेच!

...आणि दुसरे, आवाजाच्या जगातील शहेनशाह म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री अमीन सयानी! त्यांना भेटणे आणि त्यांचा आवाज ऐकणे दोन्हीही चित्त प्रसन्न करणारे होते. 'लोकमत समाचार' पुन्हा सुरू करताना आयोजित समारंभासाठी मी त्यांना नागपूरमध्ये निमंत्रित केले होते. त्यांचा सर्वांत प्रसिद्ध कार्यक्रम बिनाका गीतमालाशी प्रारंभापासून जोडला गेलेला एक प्रसंग फार थोड्या लोकांना माहीत असेल. १९५२ सालची गोष्ट. बी.व्ही. केसकर भारताचे माहिती आणि नभोवाणीमंत्री होते. त्या वेळची नवीन सिनेगीते 'अश्लील' असतात, असे त्यांचे मत होते, म्हणून त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपटगीते प्रसारित करण्यावर बंदी आणली. चित्रपट गीतांचे चाहते तर खूप होते, म्हणून श्रीलंकेतून प्रसारित होणाऱ्या रेडिओ सिलोनने ही गाणी प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आणि 'बिनाका गीतमाला' या कार्यक्रमासाठी आवाजाचा एखादा जादूगार सापडतो का, याचा शोध सुरू झाला. हा शोध अमीन सयानी या होतकरू तरुणापाशी येऊन थांबला. मग रेडिओ सिलोनवर आवाज घुमला 'बहनों और भाईयों आप की खिदमत में, अमीन सयानी का आदाब' आणि लोक या आवाजाचे अक्षरशः वेडे झाले.

चित्रपटगीतांसाठी १९५७ मध्ये ऑल इंडिया रेडिओपासून स्वतंत्र अशा 'विविध भारती'ची निर्मिती झाली; परंतु तोपर्यंत अमीन सयानी यांची बिनाका गीतमाला पुष्कळच पुढे निघून गेली होती. सयानी यांचा आवाज निश्चितच अतुलनीय होता; पण केवळ त्यांच्या आवाजाने त्यांना इतके मोठे केले का? त्यात एक नवेपण होते, एक खट्याळपणा होता, जो त्यांनी आपल्या मखमली आवाजात गुंफून सादर केला. गाण्यांची निवड आणि प्रस्तुतीसाठी शब्दांची निवड ते अत्यंत बारकाईने करत असत. कुठल्याही क्षेत्रात मोठे व्हायचे असेल, तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

वेगळा रस्ता चोखाळून नवा विचार, आपल्यात भिनवून घ्यावेत, तेव्हाच फली नरिमन आणि अमीन सयानी यांनी गाठली, तशी उंची गाठता येऊ शकते... असे काही तरी करा जे आधी कोणी केलेले नाही. ज्या रस्त्यावरून जाल, तो सोडू नका. समर्पित राहा... तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे व्हाल.

...दोघांनाही माझा नमस्कार
 

Web Title: Why were these two so unusual? Fali Nariman and Amin Sayani...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.