पार्सेकर बंडखोरी करायला का प्रवृत्त झालेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 08:27 AM2019-03-14T08:27:33+5:302019-03-14T08:50:24+5:30

शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे.

Why are laxmikant Parsekar rebellious ? | पार्सेकर बंडखोरी करायला का प्रवृत्त झालेत?

पार्सेकर बंडखोरी करायला का प्रवृत्त झालेत?

Next

राजू नायक

शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे.

शिरोडा व मांद्रे येथे भाजपाने दोघा काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश दिलाय व २३ एप्रिलच्या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्याला प्रतिटोला देताना पार्सेकरांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवलीय. पक्षाच्या निष्ठावानांच्या ते सतत सभा घेताहेत व स्वत:च्या नेतृत्वावर त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे सत्तेसाठी विकून टाकल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर यांनीही पार्सेकर यांची निर्भर्त्सना करताना ते उभे राहिले तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्याचीही त्यांची औकात नाही, असे जाहीररीत्या सुनावले आहे.

महादेव नाईक यांनी गेल्या आठवड्यात भाजपाचा राजीनामा देऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय. ते भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिथावण्याच्या उचापतीत पडले नाहीत. त्या तुलनेने पार्सेकरांकडे संघटनशक्ती व निधीची जोड आहे. शिवाय पार्सेकर व दयानंद सोपटे- ज्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपा मांद्रे मतदारसंघात उमेदवारी देणार आहे- यांच्यात जुने वैमनस्य आहे. पार्सेकर त्यांना माफ करून स्वत:ला दुय्यम स्थान घ्यायला तयार नाहीत.

एक गोष्ट खरी आहेय की मुख्यमंत्री असतानाही पार्सेकर २०१७ च्या निवडणुकीत दारुणरीत्या पराभूत झाले व सत्ता टिकवायची असेल तर कॉँग्रेस पक्षाला खिंडार पाडणे हा एकच पर्याय भाजपा नेतृत्वापुढे होता. सोपटे व शिरोडा मतदारसंघातील सुभाष शिरोडकर त्यांच्या गळाला सहज लागलेत. परंतु, भाजपाची तिकिटे मिळताच कार्यकर्ते निमूट पाठिंबा देतील व नेतेही मूग गिळून प्रचारात सहभागी होतील, अशी सोपटे-शिरोडकरांची अटकळ होती. कारण, २०१७मध्ये सत्ता संपादन करतेवेळी गोवा फॉरवर्ड व मगोप बरोबर भाजपाने संधान बांधले तेव्हा भाजपाचे फातोर्डा, साळगाव, शिवोली येथील पराभूत उमेदवार मूग गिळून गप्प बसले आहेत. परंतु, त्यावेळी त्यांची समजून काढायला मनोहर पर्रीकर जातीने उपस्थित होते. सध्या ते आजारी आहेत. आणि पार्सेकर, महादेव नाईक कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. या बदलत्या राजकारणामुळे व पक्षाच्या विविध राजकीय पवित्र्यांमुळे आपले अस्तित्व धोक्यात आल्याचा अंदाज त्यांना आलाय. या परिस्थितीमुळे भाजपालाही अस्वस्थतेने घेरले असून पार्सेकर पक्षात असंतोष निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. पर्रीकरांची प्रकृती त्यात आणखी नाजूक बनली असल्याने हा सारा सत्तेचा खेळ निमूट पाहण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले आहे. सत्तेचा सारिपाट सांभाळताना स्वपक्षाच्या नेत्यांचा राग वाढवायचा की निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेचा रोष सहन करायचा अशा विचित्र परिस्थितीत भाजपा सापडला आहे!

Web Title: Why are laxmikant Parsekar rebellious ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.