Who has the advantage of fire? | आगीचा फायदा कोणाला?

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़ मुंबईत मोठा व्यवसाय असणाºया उद्योजकांची बरीचशी गोदामे ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरात आहेत़ या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या वस्तू, कच्चा माल ठेवला जातो़ त्याला हानी पोहोचणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते़ त्यासाठी सरकारी अधिकारी - कर्मचारी, राजकीय नेत्यांचे खिसे भरले जातात़ तरीही यातील काही गोदामांना दरवर्षी आग लागते़ आर्थिक वर्ष संपण्याआधी अशी गोदामे, कारखाने यांना सर्रास आग लागते़ या आगीत जीवितहानी होत नाही, पण आर्थिक नुकसान मात्र होते़ त्याचा फायदा निश्चितच उद्योजकांना होतो़ विमा कंपन्यांकडून त्यांना रक्कम मिळते़ अशा आगी भविष्यात अनेकांचा बळीही घेऊ शकतात़ तेव्हा आग नेमकी का लागली याची कारणे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे़ गेल्या महिन्यात अशाच प्रकारे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगरला आग लागली होती़ त्यातही जीवितहानी झाली नाही़ येथील सर्व झोपड्या अनधिकृत होत्या़ या झोपड्यांवर कारवाई होऊ नये, या हेतूने ही आग लावण्यात आली होती, हे पोलीस तपासात उघडकीस आले़ भिवंडी येथील गोदामांना लागलेली आग भडकण्याचे प्राथमिक कारण म्हणजे तेथे अग्निरोधक यंत्रणा नसणे़ त्यातून सुरक्षेचा मुद्दा पुढे आला़ प्रत्यक्षात तेथील अवैध उद्योगही वाढले आहेत़ ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर कारवाईचा निर्णय घेतला आणि राजकीय हस्तक्षेपानंतर बासनातही गुंडाळला. आमच्यावर कारवाईचा प्रयत्न झाल्यानेच ठाण्याच्या याआधीच्या जिल्हाधिकाºयांची आम्ही बदली घडवून आणली, असे सांगण्यापर्यंत या मंडळींची, त्यांच्या पाठीराख्यांची मजल गेली, हे धक्कादायक आहे़ कोणत्या गोदामात कोणत्या स्वरूपाचा किती माल साठवला जातो आहे, याच्या कोणत्याही नोंदी सरकारी यंत्रणांकडे नाहीत. देशात गाजलेल्या तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मालही येथेच सापडला होता. यातील एकेका गोदामातील उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. संपूर्ण परिसर अब्जावधीच्या गुंतवणुकीचे केंद्र आहे आणि म्हणूनच तेथील सर्व बेकायदा उद्योगांकडे जितके सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आहे, तेवढाच येथील राजकीय हस्तक्षेपही मोठा आहे. पण हेच बेकायदा उद्योग आता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे अशा आगीच्या घटनांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी.