कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:00 AM2017-10-29T04:00:25+5:302017-10-29T04:00:56+5:30

परीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती.

What is the university? | कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय?

कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय?

Next

पूजा दामले
परीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागतात, त्यामध्ये गोंधळ होतो या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना, विद्यापीठाचे निकाल पारदर्शकपणे लागतील आणि लवकर लागतील, असा त्यांना विश्वास होता. पण, ढिसाळ नियोजन, प्राध्यापकांना योग्य पद्धतीने न मिळालेले प्रशिक्षण, तांत्रिक त्रुटी अशा सर्वच गोष्टींची परिणती अखेर निकालाच्या ‘लेटमार्क’वर दिसून आली.
जून महिन्यात लागणारे निकाल अखेर १९ सप्टेंबरला जाहीर झाले. पण, या सर्व गोंधळात कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला. मात्र, विद्यापीठाच्या निकालाचे काय, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. डॉ. संजय देशमुख यांची ७ जुलै २०१५ रोजी कुलगुरू पदी नियुक्ती झाली. यंदाचे विद्यापीठाचे १६०वे वर्ष असल्याने कुलगुरू या नात्याने अनेक कार्यक्रम आणि उपाययोजनांचे आयोजन केले होते. विद्यापीठात ‘डिजिटल लॉकर’ सुरू करण्यात आले. यानंतर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत देशमुख यांनी विद्यापीठात आणली. पण, ही पद्धत आणण्याची वेळ चुकली. कारण, पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा या मार्च -एप्रिल महिन्यात सुरू झाल्या. आणि आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया ही एप्रिल महिन्याच्या अखेर सुरू झाली.
निविदा प्रक्रियेलाही पहिल्यांदा अत्यल्प प्रतिसाद मिळूनही कुलगुरूंनी हट्ट सोडला नाही. सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा हट्ट कुलगुरूंना भोवला. हजारो विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागल्याने राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी निकालाच्या प्रकरणात लक्ष घातले. कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या सगळ्या गोंधळात विद्यार्थी संघटना संतप्त होऊन कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी करू लागल्या. कुलगुरूंनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले, पण राजीनामा दिला नाही. अखेर मंगळवार, २४ आॅक्टोबरला कुलगुरूंना पदावरून काढून टाकण्यात आले.
१६० वर्षांच्या विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. आत्तापर्यंत विद्यापीठात प्राध्यापक हाती उत्तरपत्रिका तपासत होते. त्या वेळी उशीर झाला तरीही ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल हे जून महिन्यापर्यंत लागायचे. पण, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत मात्र विद्यापीठाला या प्रक्रियेसाठी सप्टेंबर महिना उजाडला. पण, आॅनलाइन तपासणीसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले होते, त्या मेरिट ट्रॅक कंपनीवर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. हिवाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकाही याच कंपनीतर्फे आॅनलाइन तपासून घेतल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने राज्यभरातील विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे.
या सर्व गोंधळात सध्या विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा निकाल कधी लागणार, विद्यापीठ उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन पुन्हा सुरळीत कधी होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राला पडले आहेत.

कुलगुरू शोधण्याची परीक्षा...
डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू पदावरून काढून टाकण्यात आल्यावर राज्यपालांनी दुसºया दिवशी ‘कुलगुरू शोध समिती’ची स्थापना केली आहे. मुंबई विद्यापीठातील या गोंधळानंतर कुलगुरू निवडणे हीच मोठी परीक्षा आहे. विद्यापीठाची मलिन झालेली प्रतिमा उजळणे आणि निकालाचा गोंधळ होऊ न देणे या जबाबदाºया नवीन कुलगुरूंवर असणार आहेत.

Web Title: What is the university?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.