राष्ट्रवादाच्या मोहिमेला मतदारांचा अनुकूल कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:51 AM2019-05-25T04:51:57+5:302019-05-25T04:52:52+5:30

भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने, त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही.

Voters favor NCP campaign | राष्ट्रवादाच्या मोहिमेला मतदारांचा अनुकूल कौल

राष्ट्रवादाच्या मोहिमेला मतदारांचा अनुकूल कौल

नोटाबंदी व जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, यामुळे उद्ध्वस्त झालेले छोटे व मध्यम व्यावसायिक, दिसामासाने ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, ४५ वर्षांतील सर्वात मोठी बेकारी, शेजारील देशांच्या अंतर्गत कारभारात अनावश्यक हस्तक्षेप केल्याने ओढावलेला त्यांचा रोष, महागाईचे रौद्ररूप, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सतत होणारी वाढ, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या या पार्श्वभूमीवर १७व्या लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतील प्रचाराची पातळी फारच खाली आल्याची तथाकथित विचारवंत, विश्लेषक आणि प्रसार माध्यमांनी बरीच चिंता व्यक्त केलेली आहे. तथापि, ही पातळी कुणामुळे खाली आली, सुरुवात कोणी केली, याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही. अशा रितीने प्रचाराची पातळी खाली आणण्याचे नि:संशय श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाते, हे सर्वांना माहीत असूनही कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही. प्रचारसभांमध्ये जाहीरपणे आपली जात सांगणे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दमदाटी करणे, सरकारचे सर्वांगीण अपयश दर्शविणारी अधिकृत संस्थांची आकडेवारी दडपून ठेवणे, अशा अनेक मार्गांनी निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दे चर्चेलाच येऊ नयेत, अशी खबरदारी मोदी व शाह या जोडगोळीने घेतली.


भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने,े त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही. आपल्या तथाकथित यशस्वी योजनांचे ढोल ते पिटत राहिले, पण जागृत पत्रकारांनी त्या दाव्यांचा फोलपणा उघड करण्यात जराही कसूर सोडली नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर अतिराष्ट्रवाद, धार्मिकता आणि जातीनिष्ठा अशा विषयांचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. धर्म आणि राजकारण यांची बेमालूम मिसळ त्यांनी केली. आपले यश जे मान्य करणार नाहीत किंवा आपले म्हणणे जे मान्य करणारच नाहीत, त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मोदी व भाजपची मजल गेली. जोडीला अजय बिस्त, प्रज्ञा सिंह, संबित पात्रा अशी पात्रे होतीच. या सर्वांनी मिळून निवडणुकांचा प्रचार देशभक्त विरुद्ध देशद्रोही, हिंदू विरुद्ध मुसलमान आणि जाती-जातींमधील भेदाभेद इथपर्यंत नेऊन पोहोचविला. राष्ट्रवाद, धर्मवाद आणि जातिवाद यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या मोहिमेला मतदारांनी अनुकूल कौल दिल्याचे दिसले.


काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातील न्याय योजना, सर्व जातीधर्मांचा सामावेश, राष्ट्रीय सुरक्षितता, धार्मिक सलोखा आणि केंद्र-राज्ये यांच्यात सलोख्याचे व सहकार्याचे संबंध राखणे यावर भर दिला. तथापि, काँग्रेसच्या या जबाबदार व देश आणि लोकहिताच्या प्रचार मोहिमेचा या निवडणुकीत मतदारांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.

- डॉ. रत्नाकर महाजन
(काँग्रेस प्रवक्ते)

Web Title: Voters favor NCP campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.