विदर्भ द्वेष

By admin | Published: August 9, 2016 12:59 AM2016-08-09T00:59:25+5:302016-08-09T00:59:25+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी राजकीय पक्षांच्या वर्तुळात अधून-मधून चर्चेला येते, त्यावर वादळ उठते, आरोप-प्रत्यारोप होतात आणि हा विषय ज्या वेगाने येतो

Vidarbha hate | विदर्भ द्वेष

विदर्भ द्वेष

Next

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी राजकीय पक्षांच्या वर्तुळात अधून-मधून चर्चेला येते, त्यावर वादळ उठते, आरोप-प्रत्यारोप होतात आणि हा विषय ज्या वेगाने येतो त्याच वेगाने विरूनही जातो. परवा महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भ राज्याच्या आंदोलनाची पुन्हा एकदा चर्चा झाली. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला विरोध केला, तर भाजपाच्या वैदर्भीय नेत्यांनी या मागणीचे समर्थन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका त्यांच्या राजकीय असहाय्यतेचा एक भाग होती. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, विदर्भ राज्याची मागणी ही सर्वच राजकीय पक्षांच्या मतलबी आणि घाणेरड्या राजकारणाचा एक भाग बनली आहे. वैदर्भीय जनतेला विदर्भ राज्य हवे आहे. पण, ती मागणी पुढे नेणाऱ्या येथील नेत्यांमध्ये एकजूट नसल्याने नेमकी हीच संधी साधून हे राजकीय पक्ष स्वार्थासाठी त्याचा असा वापर करून घेत असतात.
परवा विधिमंडळात तेच घडले. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे यांनी विदर्भाच्या मागणीला विरोध करताना विदर्भावर आजवर होत असलेल्या अन्यायाची साधी दखलही घेतली नाही. राणे मुख्यमंत्री राहिले आहेत, विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेचे खुशाल समर्थनही करावे; पण, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सतत अन्याय सहन करीत असलेल्या एका प्रदेशाच्या अस्मितेचा अपमान करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांचा नेहमी उल्लेख होतो. या हुतात्म्यांबद्दल वैदर्भीय माणसाला आदरच आहे. पण विदर्भद्वेषातून आणि विदर्भ राज्याला विरोध करण्याच्या मानसिकेतून हे हौतात्म्य चर्चिले जाते, ही खेदाची बाब आहे. १८८८ पासून विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. या १२८ वर्षांच्या काळात विदर्भ राज्यनिर्मितीच्या आंदोलनात शेकडो लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची तुम्ही दखल घेणार की नाही?
विदर्भाला विरोध करताना राणे, विखेंनी आपल्याच पक्षाचा इतिहास पडताळून बघायला हवा. विदर्भ महाराष्ट्रात राहिले तरच काँग्रेसची सत्ता राहील, हे ठाऊक असल्याने यशवंतराव चव्हाणांनी पंडित नेहरूंना वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू दिले नाही. आता तेच राजकारण भाजपा करीत आहे. कारण विदर्भातील $४४ आमदारांच्या बळावर भाजपाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपा नेत्यांनी आपली फसगत करून सत्ता मिळवली असे विदर्भातील जनतेला प्रकर्षाने जाणवू लागले आहे. भाजपाने मूर्ख बनवले, काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते विरोधात, स्थानिक नेते संभ्रमात, हायकमांड शांतपणे हा खेळ पाहत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला भूमिकाच नाही, अशा राजकीय चक्रव्यूहात विदर्भ राज्याची चळवळ सापडली आहे. विदर्भवाद्यांमध्ये एकजूट नाही. प्रत्येकाला स्वत:चे महत्त्व वाढवायचे आणि श्रेय लाटायचे आहे. यातील अनेकांना विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची आतापासूनच स्वप्ने पडू लागली आहेत. काहींनी वेगवेगळ्या राहुट्या उभारून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विदर्भवाद्यांची दहा तोंडे दहा दिशेला हाच विदर्भ राज्याच्या निर्मितीतला सर्वात मोठा अडथळा आहे. विदर्भातील जनता आज प्रामाणिक, लढवय्या, सर्वस्व झोकून देणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहे. ‘जनमंच’ या सामाजिक संस्थेने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या जनमत चाचणीत सहा लाख लोकांनी केलेले मतदान हा तसे नेतृत्व शोधण्याचा एक आश्वासक प्रयत्न होता.
वैदर्भीय जनतेच्या मनातील नेतृत्वाची ही आस अनिवासी आणि प्रवासी आंदोलनाने पूर्ण होणार नाही. नागपुरात यायचे, पत्रपरिषद घ्यायची, टीव्हीवरील चर्चेत सहभागी व्हायचे, विदर्भाबाबत एखादे खळबळजनक विधान करायचे आणि मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मुंबईला निघून जायचे. विदर्भ अशाने अजिबात मिळणार नाही. विदर्भाच्या प्रश्नावर एकरूप व्हा, सुख-दु:खात सहभागी व्हा मग बघा हीच जनता स्वयंप्रेरणेतून भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी राहील.
- गजानन जानभोर

Web Title: Vidarbha hate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.