पुन्हा भाजपा-सेनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:01 AM2018-07-26T06:01:44+5:302018-07-26T06:04:02+5:30

भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही.

victory for bjp and shiv sena in nagar panchayat election | पुन्हा भाजपा-सेनाच

पुन्हा भाजपा-सेनाच

Next

नागपूर संघभूमी. भाजपासाठी खरी कर्मभूमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शहर असल्यामुळे येथे होणाऱ्या भाजपाच्या जय-पराजयाची चर्चा राज्यासह देशभरात ठरलेलीच. त्यामुळेच नागपुरात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असो भाजपा नेते ती तेवढ्याच सिरियसली घेतात. त्यामुळेच निवडणूक लहान असली तरी पालकमंत्र्यांपासून ते आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सारेच तुटून पडतात. पक्ष संघटनाही एखाद्या मिशनवर असल्यासारखी राबताना दिसते. तर ताकदीने कमी असलेली शिवसेनाही निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावून लढते. भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही. असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या वानाडोंगरी व पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात पहायला मिळाले. वानाडोंगरीमध्ये कमळ फुलले तर पारशिवनीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण उंचावला. गेल्या दीड वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी शेतकºयांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांचा आगडोंब माजवत भाजपाविरोधात रोष तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वानाडोंगरीच्या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. राष्ट्रवादीला जनाधार दिसत असतानाही निकाल पूर्णपणे विरोधात गेला. खरे तर भाजपा-सेनेला रोखून धरत आगामी निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा संदेश देण्याची चांगली संधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. मात्र, पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचा फटका पक्षाला बसला. वानाडोंगरीत काँग्रेसशी आघाडी झाली खरी परंतु काही नेत्यांनी त्यात बिघाडी करण्याचेच काम जास्त केले. पारशिवनीत तर आघाडीचे प्रयत्नच अपयशी ठरले. काँग्रेसने रणनीती आखली खरी मात्र नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी तिकीट न मिळण्याच्या भीतीने आधीच बंडखोरी केली. भाजपाने काँग्रेसमधील तोडीचे उमेदवार उचलले व कमळावर लढविले. याचा नेमका फायदा भाजपाला झाला. शिवसेना बºयापैकी जिवंत असलेल्या रामटेक विधानसभेअंतर्गत येणाºया या नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जात बाजी मारली. नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोकळे झाले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना मागे खेचण्यासाठी काय काय खेळ खेळल्या गेले यावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. लोकसभा आणि विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भाजपाची फौज कंबर कसून तयार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच हेवेदावे बाजूला सारून गटापेक्षा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले नाही तर सर्वांवरच घरी बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: victory for bjp and shiv sena in nagar panchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.