दोन लग्नाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:40 AM2018-05-23T01:40:37+5:302018-05-23T01:40:37+5:30

सांगली आणि साताऱ्यात दोन अनोखे विवाह सोहळे पार पडले. समतेचे विचार रुजविण्यासाठी आणि अनिष्ट चालीरीतींना मूठमाती देण्यासाठी असे विवाहसोहळे आवश्यक आहेत.

Two things about marriage | दोन लग्नाची गोष्ट

दोन लग्नाची गोष्ट

Next

- चंद्रकांत कित्तुरे

लग्न म्हणजे दोन जिवांना रेशीमगाठीत बांधणे. मनुष्यप्राण्याच्या आयुष्यात या लग्नाला खूप महत्त्व आहे. लग्न कसे करावे याबाबत हिंदू समाजात अनेक प्रकार आहेत. त्याला विवाहपद्धती म्हणतात. जाती- धर्मानुसार ते होत असले तरी त्यामध्ये बदल होत असतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत या विवाहसोहळ्यांचा थाट काही औरच असतो. पूर्वी हे सोहळे सात दिवस चालायचे. अलीकडच्या काळात ते एका दिवसावर आले आहेत. या सोहळ्यांमध्ये प्रथा आणि परंपरा याला मोठे महत्त्व असते. मात्र, काळानुरूप यामध्ये बदल होऊ लागले आहेत. असेच दोन आगळेवेगळे विवाहसोहळे सांगली आणि साताºयात पार पडले. रुढी, परंपरांमध्ये जखडलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे, पुरोगामित्वाचे एक पाऊल पुढे टाकणारे असेच या विवाह सोहळ्यांचे वर्णन करावे लागेल.
यातील पहिला विवाह सोहळा सांगलीत झाला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे या विवाहात पौरोहित्य एका महिलेने म्हणजेच वधूच्या मातेने केले. डॉ. निर्मला पाटील असे त्यांचे नाव. मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या त्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांचे पती डॉ. सुधीर पाटील. दोघेही वैद्यकीय व्यवसाय करतात. समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा यांना या दाम्पत्याचा विरोध आहे. डॉ. निर्मला पाटील यांनी तर याबाबत समाज प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. ठिकठिकाणी त्या व्याख्यानेही देतात. विवाह संस्कारात महिलांना स्थान नसते, पण याला होणारा विरोध मोडून काढत शिवविवाह पद्धतीने होणाºया विवाहसोहळ्यात पौराहित्य करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आतापर्यंत सुमारे ४० विवाहांमध्ये त्यांनी पौरोहित्य केले आहे. या दाम्पत्याची कन्या अक्षया ही डॉक्टर झाली आहे. तिचा विवाह ६ मे रोजी शिवविवाह पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे पौरोहित्यही डॉ. निर्मला यांनीच केले. कन्येच्या विवाहाचे पौरोहित्य तिच्या मातेनेच करणे ही महाराष्टÑातील पहिलीच घटना असावी. या विवाह सोहळ्यात सर्व कर्मकांडांना फाटा देण्यात आला होता. शिवसप्तकावेळी उपस्थितांनी अक्षता न टाकता टाळ्या वाजवून वधू-वरांचे अभिनंदन केले. कुणीही आहेर अथवा पुष्पगुच्छ आणला नव्हता. उलट सिंदखेडराजा येथे उभारण्यात येणाºया जिजाऊ सृष्टीसाठी देणगी पेटी ठेवण्यात आली होती.
दुसरा विवाह साताºयात रविवारी पार पडला. प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांच्या या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्चाला फाटा देत गोकुळदास उदागे यांनी समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची सुमारे एक हजार पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, असा त्यांचा विश्वास आहे. शनिवारीच इंग्लंडचा प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्केल यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्याची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. आपल्याकडेही राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटीजचे विवाहसोहळे चर्चेचे ठरतात. त्याचप्रमाणे पुरोगामी पाऊल टाकणाºया या दोन विवाह सोहळ्यांची चर्चा व्हायला हवी. विवाह समारंभातील अनिष्ट चालीरीती, कर्मकांडांना मूठमाती देण्यासाठी समाजानेही अशा विवाह सोहळ्यांचे अनुकरण करायला हवे.

Web Title: Two things about marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न