भारताला ट्रम्प यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:32 AM2018-01-05T00:32:53+5:302018-01-05T00:33:11+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सरकारची सगळी मदत तात्काळ बंद करण्याची सज्जड धमकी त्या देशाला दिली आणि त्याच वेळी तेथील विधिमंडळाने (काँग्रेस) पाकिस्तानला द्यावयाची २५५ दशलक्ष डॉलर्सची मदतही थांबविली. तेवढ्यावर न थांबता गेल्या ३५ वर्षात अमेरिकेने पाकला केलेल्या ३५ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड मदतीचा त्या देशाने नुसताच दुरुपयोग केला असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 Trump relief to India | भारताला ट्रम्प यांचा दिलासा

भारताला ट्रम्प यांचा दिलासा

Next

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सरकारची सगळी मदत तात्काळ बंद करण्याची सज्जड धमकी त्या देशाला दिली आणि त्याच वेळी तेथील विधिमंडळाने (काँग्रेस) पाकिस्तानला द्यावयाची २५५ दशलक्ष डॉलर्सची मदतही थांबविली. तेवढ्यावर न थांबता गेल्या ३५ वर्षात अमेरिकेने पाकला केलेल्या ३५ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड मदतीचा त्या देशाने नुसताच दुरुपयोग केला असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर अमेरिकेची सेना ज्या अतिरेक्यांविरुद्ध लढत आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी क्लिंटन, जॉर्ज बुश, व बराक ओबामा या पूर्वीच्या अध्यक्षांनी पाकला हे साहाय्य केले. पाकिस्तानने मात्र या मदतीचा उपयोग अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी न करता तो पैसा अन्यत्र वळविला असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. या पैशाचा वापर पाकने आपली अण्वस्त्रे वाढविण्यासाठी, क्षेपणास्त्रे मजबूत व वेगवान करण्यासाठी आणि भारताशी लढण्यासाठीच अधिक केला. तिचा फारच थोडा व तो देखील तोंडदेखला वापर या अतिरेक्यांविरुद्ध त्या देशाने केला असा ट्रम्प यांचा आताचा दावा आहे. यातली गंमत ही की पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीचा वापर असा करीत आहे ही गोष्ट मात्र भारताने गेली कित्येक वर्षे अमेरिकेच्या कानीकपाळी ओरडून सांगितली आहे. परंतु पाकिस्तानच आपल्याला खरे साहाय्य करील असा भरवसा या देशाला रिचर्ड निक्सन यांच्या काळापासून वाटत राहिला. निक्सन यांना पाकिस्तानातून कमालीच्या गुप्तपणे बीजिंगपर्यंत पोहचविण्याचे व त्यांची माओ-त्से-तुंगांशी गाठ घालून देण्याचे जे राजकारण पाकिस्तानने तेव्हा केले तेव्हापासून तो आपला सच्चा मित्र असल्याचा विश्वास अमेरिकेला वाटत राहिला. प्रत्यक्षात अमेरिकेची मदत घ्यायची आणि तिच्या बळावर आपले शस्त्रागार वाढवायचे एवढेच राजकारण पाकिस्तानने केले. शिवाय त्या मदतीचा गुप्तपणे वापर करून त्याने चीनशीही आपले संबंध बळकट करून घेतले. आजच्या घटकेला पाकिस्तान हा चीनचा मित्र की अमेरिकेचा असा प्रश्न जगाच्या राजकारणाला पडला आहे. अतिरेक्यांना पाकिस्तानचे भय नाही, उलट त्यांना पाकची मदतच अधिक आहे. त्यातून पाकिस्तानने आपले संबंध आता चीनएवढेच रशियाशीही दृढ केले आहेत. चीनने त्याच्या प्रदेशातून ४७ अब्ज डॉलर्सचा औद्योगिक कॅरिडॉर बांधायला घेतला आहे. वर भारताशी पाकचा संघर्ष झाल्यास त्याला मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. तिकडे रशियाचे सैन्य पाकच्या सैन्यासोबत काश्मिरात सैनिकी कवायती करताना दिसले आहे. रशिया आणि चीन या दोन महासत्ता सोबत असताना पाकिस्तानला अमेरिकेला झुलवत ठेवणे सहज जमणारे आहे. खरे तर त्या देशाला या सगळ्याच महाशक्तींची आर्थिक व लष्करी मदत आजपर्यंत मिळत राहिली आहे. ट्रम्प यांच्या लक्षात आलेली ही फसवणूक फार उशिराची आहे. त्यांचा स्वभाव पाहता ते पाकची मदत थांबवतीलही. मात्र त्याचा पाकिस्तानवर फार परिणाम होईल याची शक्यता मात्र फारशी नाही. तो देश लष्करीदृष्ट्या बलवान आहे. त्याची क्षेपणास्त्रे वेगवान आहेत आणि त्याच्या शस्त्रागारात २७६ अणुबॉम्ब आहेत. आता अमेरिकेने मदत दिली काय अन् न दिली काय पाकवर त्याचा परिणाम फारसा व्हायचा नाही. शिवाय अमेरिकेने थांबविलेली मदत चीनकडून भरून घेण्याएवढे त्या देशाचे राजकारण पुरेसे तरबेज बनलेलेही आहे. त्यातून ट्रम्प यांच्या उठवळपणावर अमेरिकेचाच फारसा विश्वास राहिलेला नाही. त्यांचे मंत्री त्यांना सोडून जात आहेत आणि विधिमंडळाने त्यांच्या कारभाराच्या चौकशा चालविल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवावा अशीही एक मागणी तेथे जोर धरत आहे. काही का असेना, पाकिस्तानला होणारी अमेरिकेची मदत थांबणे ही भारताला दिलासा देणारी बाब आहे.

Web Title:  Trump relief to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.