ते गरजतात, हे गुरगुरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:16 AM2018-04-17T03:16:26+5:302018-04-17T03:16:26+5:30

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो.

They grow, they growl, they growl | ते गरजतात, हे गुरगुरतात

ते गरजतात, हे गुरगुरतात

googlenewsNext

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो. ते गर्जना करणार आणि हे नुसतेच गुरगुरणार. तशीही मोठ्या संघटनेसमोर व राष्ट्रीय पातळीवर सत्तास्थित असणाऱ्या पक्षासमोर प्रादेशिक पातळीवरच खुरटलेल्या पक्षांची व त्यांच्या पुढा-यांची उंची, वजन, स्थान आणि त्यांचे बलाबल जोखण्याची क्षमता आता जनतेने प्राप्त केली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गुरगुरतात, दरदिवशी नव्या कुरापती पुढे करतात, स्थानिक प्रश्नांवरच्या त्यांच्या तक्रारीही बºयाच असतात. पण भाजपचे सत्तावान त्यांची फारशी दखल घेताना कधी दिसत नाहीत. फडणवीस ती घेत नसतील तर मोदींकडून तशी अपेक्षाही करायची नसते. मोदींचा पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. २१ राज्यात सत्ताधारी आहे. महाराष्ट्रातही तो मुख्यमंत्रिपदावर आहे आणि त्याने सेनेला येथे जेमतेम चार आणि तीही बिनामहत्त्वाची मंत्रिपदे दिली आहेत. केंद्रातला तिचा मंत्री बाळासाहेबांच्या भाषेत ‘नुसता रिकाम्या बॅगा घेऊन फिरत असतो’. सभा समारंभाची निमंत्रणे असतात, त्यात व्यासपीठावर जागाही मिळते, प्रसंगी एखाददुसरा कौतुकाचा शब्दही ऐकविला जातो. पण सारे तेवढ्यावरच थांबते. जास्तीची मंत्रिपदे नाहीत, महत्त्वाची खाती नाहीत आणि केंद्रातही फारशी वट नाही. ही स्थिती जेवढी दयनीय तेवढीच आपल्या अस्तित्वाची दखल ठेवण्यासाठी अधूनमधून कुरघोडी करायला लावण्याइतपतच महत्त्वाची उरली असते. शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत जाता येत नाही आणि आता तसेही पवारांनी त्यांचे नाते काँग्रेसशी असल्याचे व ते राहणार असल्याचे सांगून टाकले आहे. तिचे शेतकरी कामगार पक्षाशीही जुळणारे आहे, रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही तुकड्याला तिची मैत्री चालणारी नाही आणि पक्षात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा कोणताही पक्ष तिला जवळ करणार नाही. ही एकाकी अवस्था सेनेपुढे केवळ दोन पर्याय ठेवणारी आहे. एकतर तिने स्वबळावर लढायचे किंवा भाजपच्या आश्रयाने उभे राहायचे. याआधी सेनेने स्वबळावर निवडणूक लढविली आहे, तीत तिला आपले उमेदवार भाजपच्या उमेदवाराएवढ्या संख्येने विजयी करणे जमले नाही. भाजपला सेनेची साथ हवी असतानाही, केवळ पवारांच्या शब्दावर विसंबून राहून त्या पक्षाने राज्यात आपले सरकार आणले. पवारांची ती साथ सेनेला खाली पहायला लावणारी आणि, तुम्ही नाही तर आम्ही, आपला नाही तर बाहेरचा पाठिंबा असे करून सेनेला नमविणारी होती. भाजपने सेनेची ताकद व तिच्या डरकाळीचा प्रभाव तेव्हा जोखला आहे. नंतरच्या काळात देतील ते पदे घेऊन सेना फडणवीसांसोबत गेली. गेल्या तीन-चार वर्षात भाजपने सेनेला आणखी दुबळे केले आहे. सेनेचे नेतृत्व प्रादेशिक व तिला मर्यादाही महाराष्ट्राची. त्यामुळे सेनेत जाऊनही एखाद्याला आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्याची सोय नाही. परिणामी नेत्यांएवढेच अनुयायीही प्रादेशिकच. त्यांची भाषा, विषय आणि आवाकाही प्रादेशिक. मग मोठी माणसे येत नाहीत आणि आहेत तीच जपायची असतात. सेनेची ही अडचण शहांना समजते, मोदींना कळते आणि फडणवीसांनाही चांगली ठाऊक असते. पवारही तिच्या या कोंडीमुळे प्रसन्न असतात. याचमुळे ‘तुम्हाला आमच्या मागून येण्याखेरीज गत्यंतर नाही’ असे फडणवीस सेनेला स्पष्ट शब्दात ऐकवू शकतात. पूर्वी सेनेची समजूत घालायला महाजन जायचे, कधी मुंडे मातोश्रीवर हजेरी लावायचे, आता मुनगंटीवार जातात आणि सेनेची ‘समजूत’ घालून परत येतात. आपल्या वजनातील ही घट केवळ काळांमुळे नाही तर प्रकृतीमुळेही आहे हे सेनेला कळतच असणार. पण वाघ हा अखेरीस वाघच असतो. तो गवत खात नाही आणि डरकाळ्या फोडणे सोडतही नाही. आपला वचक ज्या बळावर कायम ठेवणे शक्य आहे ते बळ टिकवून धरणे एवढेच त्याचे राजकारण पुढल्या काळात चालत असते. शिवसेनेचे राजकारण आता असे आहे आणि ते भाजपवाल्यांएवढीच मराठी माणसांचीही करमणूक करणारे आहे.

Web Title: They grow, they growl, they growl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.