गोरखपूरच्या बालमृत्यूंचे भाजपमध्ये कोणालाही सोयरसूतक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:19 AM2017-08-19T00:19:35+5:302017-08-19T00:19:37+5:30

बाबा राघवदास यांना पूर्वांचलचे गांधी संबोधले जाते. गोरखपुरात त्यांच्या नावाने १९८१ च्या सुरुवातीला ८०० खाटांचे महाकाय बीआरडी रुग्णालय सुरू झाले.

There is no one in BJP in Gorakhpur's child mortality | गोरखपूरच्या बालमृत्यूंचे भाजपमध्ये कोणालाही सोयरसूतक नाही

गोरखपूरच्या बालमृत्यूंचे भाजपमध्ये कोणालाही सोयरसूतक नाही

Next

-सुरेश भटेवरा
बाबा राघवदास यांना पूर्वांचलचे गांधी संबोधले जाते. गोरखपुरात त्यांच्या नावाने १९८१ च्या सुरुवातीला ८०० खाटांचे महाकाय बीआरडी रुग्णालय सुरू झाले. विविध सोयींनी युक्त अशा या रुग्णालयात आजमितीला जवळपास ९०० कर्मचारी व डॉक्टर्स तैनात आहेत. दुर्दैवाने एक संतापजनक दुर्घटना नुकतीच या रुग्णालयात घडली. एन्सेफलायटिसच्या आजाराने इथे पहिल्या दिवशी ३० तर पाचव्या दिवसापर्यंत ६० बालके मृत्युमुखी पडली. आता ही संख्या ७२ वर पोहोचली आहे. केवळ आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर न झाल्याने या बालकांना आपले प्राण गमवावे लागले. उत्तर प्रदेशात धुमधडाक्यात साजºया होणाºया कृष्ण जन्माष्टमीच्या सुमारास ही दुर्घटना घडावी, हा विचित्र योगायोग आहे. भगवान कृष्ण कारागृहात जन्मले. २१ व्या शतकात देशातली असंख्यशासकीय रुग्णालये सध्या तुरुंगापेक्षाही वाईट अवस्थेत आहेत. भ्रष्टाचार व अव्यवस्थेने बजबजलेल्या अशा कारागृहरूपी रुग्णालयात अनेक तान्ह्या बालकांवर जन्मल्याबरोबर मृत्यूला कवटाळण्याचा प्रसंग यावा, हा भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने शरमेने मान खाली घालावी, असा लाजिरवाणा प्रसंग आहे.
भगवे वस्त्रधारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशेष लाडके धर्मनेते योगी आदित्यनाथ सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. गोरखपूर हा त्यांचा गृहजिल्हा. याच मतदारसंघातून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून आले. आपल्याच आश्रमात गुंडांना राजरोस आश्रय देण्याचा योगी आदित्यनाथांवर आरोप आहे, तरीही साºया देशाला उठसूठ ते राष्ट्रभक्तीचे धडे शिकवीत असतात. आपल्याच गावातले प्रमुख रुग्णालय किती दैनावस्थेत आहे, याची मात्र त्यांना कधी फिकीर करावीशी वाटली नाही हे सत्य ताज्या दुर्घटनेतून स्पष्टपणे सामोरे आले.
दीडशे एकराच्या विस्तीर्ण परिसरात उभे असलेले गोरखपूरचे बीआरडी रुग्णालय पूर्वांचलात स्वस्त दरात आरोग्यसेवा पुरवणारे अतिशय महत्त्वाचे रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या वेबसाईटनुसार इथल्या ओपीडीत उपचारासाठी दरवर्षी साडेतीन लाख रुग्ण येतात. व्हेंटिलेटर्स, आयसीयू, आयसीसीयू, डायलिसिस, पेस मेकिंग, इन्डोस्कोपी, न्यूरो सर्जरी इत्यादींसह लहान बालकांवरील उपचारांची अद्ययावत यंत्रसामुग्री या रुग्णालयात उपलब्ध आहे. तरीही २०१२ पासून सुमारे तीन हजार बालकांचा मृत्यू या रुग्णालयात ओढवला. ताज्या दुर्घटनेत अवघ्या एका सप्ताहात इथे ७२ बालके दगावली तेव्हा साºया देशाचे लक्ष त्याकडे वेधले गेले गेले. बीआरडी रुग्णालयाच्या बालरोग विभागाला आॅक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा करणाºया कंपनीने १ आॅगस्ट १७ रोजीच एक नोटीसवजा पत्र पाठवून कळवले होते की रुग्णालयाकडे ६३ लाख रुपयांहून अधिक रकमेची पूर्वीची बाकी आहे. नव्या सिलिंडर्सचा पुरवठा ही रक्कम अदा केल्याशिवाय करता येणार नाही. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी, बीआरडी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आदींनाही या पत्राच्या प्रती सदर कंपनीने पाठवल्या. १० आॅगस्ट रोजी याच कंपनीच्या कर्मचाºयांनी रुग्णालयात आॅक्सिजन सिलिंडर्सची प्रचंड कमतरता आहे, याची जाणीव दुसºया लेखी पत्राद्वारे करून दिली. मुख्यमंत्री योगी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव, आरोग्य सचिव महिन्यातून दोनदा या रुग्णालयाचा दौरा करतात, रुग्णालयात नेमक्या काय समस्या आहेत, याची माहिती त्यांनी कधी घेतली की नुसतेच नावापुरते दौरे केले? गोरखपूर न्यूजलाईनचे पत्रकार मनोजसिंह यांनी ‘वायर’ला पाठवलेल्या वृत्तानुसार ज्या विभागातर्फे एन्सेफलायटीसचा उपचार होतो त्या फिजिकल मेडिसिन व रिहॅब विभागाच्या सर्व कर्मचाºयांना गेल्या २८ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. याच कारणामुळे चार डॉक्टर्स नोकºया सोडून गेले आणि आता या विभागात कोणी डॉक्टर नाही. मुख्यमंत्री योगी ९ जुलै व ९ आॅगस्ट रोजी रुग्णालयात येऊन गेले. गतवर्षी २८ आॅगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेलांनीही बीआरडी रुग्णालयाचा पहाणी दौरा केला. जागोजागी पसरलेली अस्वच्छता, उपचारासाठी अत्यावश्यक सामुग्री, इत्यादींची कमतरता या दौºयात दोघांना जाणवली नाही काय? की ‘सब कुछ ऐसेही चलता है’ अशा अविर्भावात त्यांनी दुर्लक्ष केले? काँग्रेसच्या प्रतिकांवर भाजपचे विशेष प्रेम. त्यामुळेच दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींचे नातू (कन्येचे चिरंजीव) सिध्दार्थनाथ सिंग हे विद्यमान योगी मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत. गोरखपूरच्या दुर्घटनेनंतर सिध्दार्थनाथ सिंग म्हणाले, अशा घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पूर्वीही त्या घडल्याच आहेत. आॅक्सिजन सिलिंडर्सच्या कमतरतेमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप सुरुवातीला उत्तर प्रदेश सरकारने साफ फेटाळला मात्र वास्तव सामोरे येताच डॅमेज कंट्रोलची भाषा सुरू झाली. सरकारचे समर्थन करताना सिध्दार्थनाथ सिंग साफ विसरून गेले की एका रेल्वे अपघातानंतर आपले नाना शास्त्रीजींनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना रेल्वेमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा दिला होता. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षात समाजवादी पक्षाच्या कारभारावरील नाराजीमुळेच उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपच्या हाती राज्याची सत्ता सोपवली आहे.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असोत की दुर्घटनांची नैतिक जबाबदारी, आपल्या पदांचा कोणत्याही स्थितीत राजीनामा द्यायचा नाही, ही भाजपमधे कायमची पध्दत आहे. गोरखपूरच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगींचा बचाव करताना, याच धोरणाचा पुन्हा बेशरमपणे पुनरुच्चार करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले, ‘गोरखपूरची घटना केवळ एक ‘हादसा’ आहे. भारतासारख्या मोठ्या देशात यापूर्वीही अशा पुष्कळ दुर्घटना घडल्या आहेत. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय भाजप कोणावरही दोष लादत नाही. मुख्यमंत्री योगींनी राजीनामा देण्याचा त्यामुळेच प्रश्न उद्भवत नाही.’ शहांसारख्या अध्यक्षांकडून दुसरी अपेक्षाही नव्हती. शाह यांचे अभय प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी जोरात सुटले. बालमृत्यूंचा शोक बाजूला ठेवून पोलीस प्रमुख मलखानसिंगांना त्यांनी फर्मान सोडले की त्वरित अशी व्यवस्था करा की साºया उत्तर प्रदेशात कृष्ण जन्माष्टमीचा सण पारंपरिक पध्दतीने धुमधडाक्यात साजरा झाला पाहिजे. पत्रकारांनी आदेशाचा खुलासा विचारताच योगी उत्तरले, ईदच्या दिवशी रस्त्यांवर नमाज पठण मी रोखू शकतो काय? मग पोलीस ठाण्यांसह राज्यात सर्वत्र जन्माष्टमीचा उत्सव रोखण्याचा मला काय अधिकार आहे? याच दरम्यान लखनौच्या कार्यक्रमात कावड यात्रेचा उल्लेख करीत मुख्यमंत्री योगी म्हणाले, कावड यात्रा म्हणजे काही शवयात्रा नव्हे, लाऊडस्पीकर, बँडबाजे, डमरू वाजल्याशिवाय कावड यात्रा कशी संपन्न होईल? ही विधाने वाचताना विधिनिषेध शून्य मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा की कौतुक? हे समजत नाही. अच्छे दिन घोषणेला गोरखपूरचे गालबोट लागू नये, यासाठी स्वातंत्र्या दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनीही या दुर्घटनेचा उल्लेख टाळला. मोदींनंतर देशाचे पंतप्रधान योगीच होतील, असे रा. स्व. संघाचे म्हणे स्वप्न आहे. भारताचा प्रवास भविष्यात कोणत्या दिशेने होणार आहे, याची ही चुणूक आहे. भाजपच्या भाषेतच बोलायचे झाले तर कुठे नेऊन ठेवलाय भारत देश? असेच आता विचारावे लागेल.
(राजकीय संपादक, लोकमत)
 

Web Title: There is no one in BJP in Gorakhpur's child mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.