इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट!

By Meghana.dhoke | Published: October 17, 2023 08:13 AM2023-10-17T08:13:39+5:302023-10-17T08:16:11+5:30

दक्षिण आफ्रिकी मुळं असलेला अफगाण संघाचा ब्रिटिश प्रशिक्षक! त्यानं टीमला सांगितलं, ‘एकच लक्षात ठेवा, आपण कुणापेक्षाही कमी नाही!’ आणि चमत्कार घडला!

The story of the coach of the Afghan team that beat England icc world cup | इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट!

इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट!

- मेघना ढोके, संपादक, लोकमत सखी डॉट कॉम

गतविजेत्या इंग्लंडला सहज मात देणाऱ्या अफगणिस्तान संघाचा जल्लोष सुरू असतो. ज्या संघाने वर्ल्डकपमध्ये २०१५मध्ये एकदाच स्कॉटलंडला हरवले होते, तो संघ २०२३ मध्ये जगज्जेत्या संघाला गुडघे टेकायला लावतो ही घटनाच अद्भुत. त्या जल्लोषात एक चेहरा टीव्ही स्क्रिनवर झळकतो. जोनाथन ट्रॉट त्याचं नाव. अफगाण संघाचा प्रशिक्षक. पण ही एकच त्याची ओळख नाही. ट्रॉट हा एकेकाळचा मातब्बर इंग्लिश क्रिकेटपटू. 

२०१३ची गोष्ट. चुरशीची ॲशेस मालिका सुरू असताना त्यानं आपण ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं.  ज्यानं २००९ साली पदार्पणच ॲशेस मालिकेत केलं, पदार्पणातच शतक ठाेकलं. जो फॉर्ममध्ये होता, करिअरच्या शिखरावर पोहोचणार असं दिसत होतं तोच इंग्लंड संघातला एक मातब्बर खेळाडू अचानक जाहीर करतो की मला ब्रेक हवा आहे! खळबळ उडालीच. ट्रॉटने मात्र जगजाहीर मोकळेपणानं सांगितलं होतं की, मला स्ट्रेस आणि ॲन्झायटीचा त्रास होतो आहे, मला बरं वाटत नाही..

खरंतर कुणाही सेलिब्रिटीने, क्रिकेटपटूने आणि पुरुषाने मी मानसिक आजारी आहे, असं जाहीर सांगण्याची रित जगभरात कुठंच नाही. पण आपल्या करिअरची पर्वा न करता ट्रॉटने स्वत:ला २०१३ मध्ये क्रिकेटपासून लांब नेलं. २०१४-१५ मध्ये उपचारांनंतर तो परतलाही, पण त्याला सूर सापडत नव्हता. २०१८ मध्ये त्यानं सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि उजाडले जुलै २०२२. त्यानं अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, ट्रॉटचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. त्याचं नाव ‘अनगार्डेड’. त्यात तो म्हणतो, ‘माझं मलाच कळायला लागलं होतं की,  शॉर्ट बॉल खेळताना मी बिचकतो, असं वाटतं, आपण उघडे पडतोय. मनावर प्रचंड ताण होता.  ताण खेळाचा तर होताच पण मी स्वत:कडून केलेल्या अपेक्षांचा, परफॉर्मन्सचा, सतत कॅमेऱ्यासमोर असल्याचाही त्रास होता. एन्झायटी आणि ताण मला असह्य होता होता.  जो खेळ मला जीवापाड आवडतो तो खेळच मला अनोळखी वाटू लागला होता. म्हणून मी ठरवलं आपण थांबू काही काळ!’ 

ट्रॉट थांबला. त्यानं उपचार घेतले. त्या काळात माध्यमांना मुलाखती देताना मोकळेपणानं सांगितलंही की, ‘आपण जगायला आलो आहोत, पण जगणंच हरवत राहिलं तर कर्तबगारी तरी काय कामाची? स्वत:कडून अपेक्षा करता करता मी इतका थकलो की, आपण हे सगळं का करतो हेच कळेना. बरं हे सगळं सुरू असताना माझ्या आतली खळबळ कुणाला दिसतही नव्हती. सांगून कुणाला खरंही वाटलं नसतं. पण मी स्वत:शी प्रामाणिक राहिलो!’ 

हा प्रामाणिकपणा सोबत घेऊनच जेव्हा ट्रॉट अफगाण संघाचा प्रशिक्षक झाला तेव्हा तालिबान सत्तेत परतले होते. अफगाण संघातले खेळाडू भारतात प्रशिक्षण घेऊन तयारी करत होतेच, आयपीएल खेळत होते. ट्रॉटने त्यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की, ‘मनातून काढून टाका की आपण जिंकू की हरु? विचार करा की आपण आपल्या पूर्ण क्षमतेनं खेळतोय का? कुणाही अन्य खेळाडूपेक्षा तुम्ही कमी नाही!’ बाकी तयारीसह ही मात्राही लागू पडली.

इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन सुरू असताना ट्रॉटने प्रत्येक खेळाडूचं कौतुक केल्याचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे. ट्रॉट खेळाडूंना शेवटी एकच सांगतो, ‘विसरून जा तुम्ही आधी काय हरले, हेही विसरून जा की पुढचे सामने जिंकू की नाही... हा, आत्ताचा क्षण मन:पूर्वक जगा. हे जगणं स्वीकारा, आनंद साजरा करा...’
तालीबानने पोखरलेल्या, भूकंपात हतबल झालेल्या अफगाणी माणसांसाठी हा विजय क्षणिक का होईना आनंद घेऊन आला होता. आणि त्यासाठी त्यांच्या संघामागे उभा होता दक्षिण आफ्रिकी मुळं असलेला एक ब्रिटिश खेळाडू! ताण-ॲन्झायटी-हतबलता आणि आनंद अनुभवलेला  (जगाने) ‘फार यशस्वी’ न ठरवलेला एक माणूस - जोनाथन ट्रॉट! 
    - meghana.dhoke@lokmat.com

Web Title: The story of the coach of the Afghan team that beat England icc world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.