उन्हाचा भडका आणि जंगले गिळत चाललेले वणव्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:17 AM2024-04-01T09:17:33+5:302024-04-01T09:18:04+5:30

Fire In Forests: जागतिक तापमानवाढीचे संकट दारात उभे असताना आधीच कमी झालेल्या जंगलांचे क्षेत्र वणव्यांच्या तोंडी सापडू देणे परवडणारे नाही.

The heat of the sun and the danger of wildfires devouring the forests | उन्हाचा भडका आणि जंगले गिळत चाललेले वणव्यांचे संकट

उन्हाचा भडका आणि जंगले गिळत चाललेले वणव्यांचे संकट

- रंजना मिश्रा
गेली काही दिवसांपासून तामिळनाडूच्या निलगिरीतील कुन्नूर वनक्षेत्रातील जंगलातआग लागलेली आहे.  जंगलातील वणवे पसरण्यासाठी अनुकूल वातावरण आवश्यक असते. गरम तथा कोरडे तापमान आणि घनदाट उंच झाडी असेल तर जंगलातले वणवे धडकी भरेल, अशा गतीने पसरत जातात. गेल्या काही वर्षांत उन्हाळ्याची तीव्रता सतत वाढत जात असलेली आपण अनुभवतो आहोतच. जागतिक तापमान वाढीची चर्चा इतके दिवस केवळ त्या क्षेत्रातले कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय परिषदांपुरतीच मर्यादित होती. आता हे संकट आपल्या दारात येऊन उभे ठाकले आहे. ते किती गंभीर आहे, याचा अंदाज हल्ली उन्हाच्या झळा सुरू झाल्या की आपल्या सर्वांना येतोच.
 १९०१ नंतर २०२४ चा फेब्रुवारी महिना दक्षिण भारतातील सर्वांत उष्ण असा महिना होता. याशिवाय गेली दोन महिन्यांत दक्षिण भारतातील राज्यात कमाल, किमान आणि सरासरी असे तीनही प्रकारचे तापमान सामान्यत: वाढलेलेच होते. याचाच परिणाम होऊन थंडीच्या दिवसांतही या जंगलात वाढलेले लाकूड अधिक असल्याने आग वेगाने पसरत आहे. यामुळेच आपल्याला नीलगिरीच्या डोंगरी भागात अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतात.
 जंगलात अशा प्रकारे वणवे लागण्याचे सर्वांत मोठे कारण माणसाची बेपर्वाई असते. जळती काडी किंवा सिगारेटचे थोटूक फेकले जाणे, जंगलात अन्न शिजवणे, मध गोळा करण्यासाठी आग लावणे त्याचप्रमाणे बेकायदा शिकार करण्यासाठी, जनावरांना पळवून लावण्याकरिता आग लावणे अशी कारणे त्यात येतात. जंगलांना आग लागण्याची नैसर्गिक कारणे म्हणजे वीज पडणे, ज्वालामुखीचा स्फोट किंवा दुष्काळामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह आणि लाकूड सुकणे वगैरे. तापमानात वृद्धी आणि कमी पावसामुळे जंगलात वणवे लागण्याचा धोका वाढतो. भारतातील जंगलांचे सर्वेक्षण करण्यासाठी असलेली मध्यवर्ती संस्था ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष असे सांगतो की, भारतात शुष्कपणा अधिक असलेल्या जंगलात आग लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्याचवेळी सदाबहार, अर्ध सदाबहार तसेच पर्वतीय समशितोष्ण जंगलात तुलनात्मकदृष्ट्या आगीची शक्यता कमी राहते. 
भारतात नोव्हेंबर २०२० पासून जून २०२१ पर्यंत जंगलात आग आणि वणवे लागण्याच्या ३,४५,९८९ घटना घडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही संख्या सर्वाधिक आहे. भारतीय वन सर्वेक्षणाद्वारे ही आकडेवारी दिली गेली. या सर्वेक्षणानुसार २०२१ मध्ये जंगलात आग लागण्याच्या घटना २.७ पटींनी वाढल्या. नोव्हेंबर २०२० पासून जून २०२१ पर्यंतच्या आगीच्या घटनांमध्ये काही मोठ्या होत्या तर काही छोट्या. लहान-मोठ्या सगळ्या घटना एकत्र करून हा आकडा समोर आला आहे. 
भारत वन अहवालानुसार भारतात ३६ टक्क्यांपेक्षा अधिक वनक्षेत्र वणवे लागण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे.  भारतात ७१.३५ कोटी हेक्टर वनक्षेत्र असून त्यातील ३६ टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र म्हणजेच २५.९३ कोटी हेक्टर क्षेत्र आगीच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहे.
जागतिक स्तरावरील एकूण वनक्षेत्राच्या जवळपास तीन टक्के भारताचा हिस्सा किंवा साधारणत: ९.८ कोटी हेक्टर वनक्षेत्र २०१५ मध्ये आगीच्या लपेट्यात सापडले होते. जंगलात वणवे लागण्याच्या घटना जास्त करून उष्ण कटिबंधीय क्षेत्रात पाहायला मिळतात. 
२०२१ मध्ये भारताच्या अनेक राज्यांमध्ये जंगलांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या होत्या. मार्च २०२३ मध्ये गोव्यात झाडांना आग लागण्याची घटना प्रामुख्याने चर्चेत होती. २०२४ मध्ये मिझोराममध्ये ३७३८,मणिपूरमध्ये १७०२, आसामात १६५२, मेघालयात १२५२, आणि महाराष्ट्रात १२१५ वणव्यांची नोंद झाली आहे. एकीकडे तापमान वाढीच्या संकटाशी लढणे सर्व स्तरावर तसे मुश्कील, आणि दुसरीकडे आधीच कमी होत चाललेल्या जंगलांचे क्षेत्र वणव्यांच्या तोंडी सापडू देणे आपल्याला परवडणारे नाही. 

Web Title: The heat of the sun and the danger of wildfires devouring the forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.