Lal Bahadur Shastri Jayanti: 'लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श जीवनात उतरवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 09:45 AM2018-10-02T09:45:06+5:302018-10-02T09:45:46+5:30

महान आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या नेत्यांचे स्मरण त्यांच्या जयंती दिनी करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

Take the memories of Lal Bahadur Shastri's ideal life | Lal Bahadur Shastri Jayanti: 'लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श जीवनात उतरवा'

Lal Bahadur Shastri Jayanti: 'लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श जीवनात उतरवा'

Next

- एम. व्यंकय्या नायडू
महान आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या नेत्यांचे स्मरण त्यांच्या जयंती दिनी करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अनेकदा असे कार्यक्रम परंपरा म्हणून यांत्रिकपणे पार पडतात, पण केवळ श्रद्धांजली अर्पण करून न थांबता, त्यांनी देशाच्या भल्यासाठी केलेल्या कामाची ओळख तरुण पिढीला करून देणेही गरजेचे असते. अशाच व्यक्तींपैकी एक आहेत, लाल बहादूर शास्त्री. आपण महात्मा गांधींच्या जयंती दिनी २ आॅक्टोबरला त्यांचेही स्मरण करीत असतो.

ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेकांनी जशी प्रेरणा घेतली, तशी प्रेरणा घेत लाल बहादूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यात जो निर्धार होता, देशाप्रती जी भावना होती त्यासह त्यांच्यात प्रामाणिकपणाही होता. साधेपणा आणि मूल्याधारित राजकारणाचे ते प्रतीक होते. ६० वर्षांपूर्वी शास्त्रीजींनी देशाविषयी बांधिलकी काय असते हे दाखवून दिले. तामिळनाडू राज्यात अदियालूर येथे झालेल्या रेल्वे अपघातात १४० जणांचे प्राण गेल्याची रेल्वेमंत्री या नात्याने जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. घटनात्मक गरजेचे उदाहरण दाखवून देण्यासाठी आपण तो राजीनामा स्वीकारत आहोत, असे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्या वेळी म्हणाले होते. वास्तविक, त्या अपघाताला शास्त्रीजी अजिबात जबाबदार नव्हते.

आपल्या साधेपणाने आणि मानवतावादी दृष्टिकोनाने त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या जीवनातील दोन घटनातून ते कसे तत्त्वनिष्ठ होते याचे प्रत्यंतर येते. त्यांची दृष्टी विशाल होती, म्हणून त्यांनी ते सातवीत असताना आपले जात सुचविणारे आडनाव टाकून दिले होते. आपल्या विवाहात त्यांनी हुंडा म्हणून वधूपक्षाकडून काही वार खादीचा कपडा आणि चरखा मागितला होता!
देशाचे पंतप्रधान झाल्यावर १५ आॅगस्ट १९६४ ला लाल किल्ल्यावरून भाषण देताना त्यांनी देशाच्या ऐक्याविषयी जे विचार मांडले होते, ते आजही सुसंगत वाटतात. शास्त्रीजी म्हणाले होते, ‘सारे जग आपल्याकडे आदराने तेव्हा बघेल, जर आपण अंतर्गत मजबूत असू व देशातून दारिद्र्य आणि बेरोजगारीचा नायनाट करू शकू. जातीयवादी, प्रादेशिक आणि भाषिक वादाने देश दुबळा होऊ शकतो. त्यामुळे आपण राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवायला हवे. सामाजिक क्रांतीतूनच हे राष्ट्र मजबूत होईल.’ त्यांचा भर चारित्र्य निर्मितीवर आणि नैतिकतेवर होता. आज सर्वत्र मूल्याची घसरण होत असताना त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे.
१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांनी दिलेली ‘जय जवान, जय किसान’ ही अजरामर घोषणा आजही देशवासीयांना प्रेरणा देते. काही वर्षांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या घोषणेत ‘जय विज्ञान’ हा नाराही समाविष्ट केला. शांततेच्या धोरणाशी त्यांची बांधिलकी होती, पण देशाच्या एकात्मतेबाबत ते कठोर होते. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सैन्याला सज्ज केले. गुरुद्वारा बांगला साहिब, दिल्ली येथे
३ आॅक्टोबर, १९६५ ला भाषण देताना ते म्हणाले, ‘कोणतेही आक्रमण देशवासी माफ करणार नाहीत. त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.’ त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द त्यांच्या अकाली मृत्यूने खंडित झाली खरी, पण त्यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानवर विजय संपादन केला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त २४ आॅक्टोबर १९६५ रोजी दिल्लीत दिलेल्या भाषणात
ते म्हणाले होते, ‘आपण विश्रांती घेऊन भागणार नाही. आपल्या देशाचे भविष्य काय राहील हे आज सांगता येणार नाही. पाकिस्तानने आपल्याविरुद्ध आक्रमणाचे धोरण सोडलेले नाही. अशा स्थितीत आपली सुरक्षा व्यवस्था आपण मजबूत करायला हवी.’ त्यांचा कृतीवर विश्वास होता हे दर्शविणारी एक घटना सांगतो, देशात अन्नधान्याचा तुटवडा असताना त्यांनी स्वत: एक वेळच्या भोजनाचा त्याग करून आदर्श घालून दिला होता. त्याचा परिणाम साऱ्या देशभर दिसून आला. उत्तर प्रदेशात पोलीस विभागाचे मंत्री असताना त्यांनी पोलिसांना काठ्यांऐवजी पाण्याचा मारा करण्यास सांगितले होते.
‘आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत आपण शिक्षक, अभियंते आणि अन्यांचा समावेश करून विचारात ताजेपणा आणायला हवा,’ असे मत त्यांनी १९६४ साली ग्रामीण प्रकल्पाच्या बैठकीत मांडले होते. सध्याच्या सरकारने १० संयुक्त सचिव बाहेरून भरती करण्याचे जे ठरवले आहे ते याच सूत्रानुकूल आहे. तेव्हा प्रत्येक भारतीयाने त्यांचा साधेपणा, मानवता, कष्ट व समर्पण भाव शिकला पाहिजे. त्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही आपण स्मरण ठेवायला हवे.
(उपराष्ट्रपती)

Web Title: Take the memories of Lal Bahadur Shastri's ideal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.