मनाचिये गुंथी - घामाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:20 AM2017-09-14T00:20:04+5:302017-09-14T00:20:17+5:30

गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते.

sweaty flowers | मनाचिये गुंथी - घामाची फुले

मनाचिये गुंथी - घामाची फुले

Next

- डॉ. रामचंद्र देखणे
गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते. आपण नमस्काराची क्रिया करतो. पण त्या नमस्कारात आतून जर मन विनम्र झाले नसेल तर क्रिया व्यर्थ होय. विनोबाजींनी सुरेख दृष्टांत दिला आहे. शंकराच्या पिंडीवर धार धरून अभिषेक चालला आहे. पण चित्त जर अभिषेकामध्ये नसेल, ते जर दुसरीकडेच भरकटत असेल तर अभिषेक घडेल काय? अभिषेकाच्या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार अखंड ओतली जात असेल तरच त्या अभिषेकाला किंमत आहे. म्हणजेच चित्त ओतून केलेला अभिषेक हे नुसते अभिषेकाचे कर्म न राहता ते ‘विकर्म’ ठरेल आणि अशा बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग घडतो.
हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याला निष्कामतेची फळे-फुले येणार नाहीत. अशा कर्मात विकर्म ओतले म्हणजे ‘अकर्म’ होते. कर्म सहजपणे बाहेर पडते. मुलावर प्रेम करणे, त्याला वाढविणे, पोसणे हे मातेचे सहजकर्म असते. तेच ‘अकर्म’ होय. माऊली ज्ञानदेव म्हणतात,
‘‘अगा करितेन वीण कर्म ।
तेचित ते नैष्कर्म्य ।’’ पुढे-पुढे तर या सहज कर्मातही कर्म करणारा मी आहे असा भावही न ठेवता जे कर्म घडते तेच ‘नैष्कर्म्य’ होय. कर्म, कर्मातून विकर्म, विकर्मातून अकर्म आणि पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणे म्हणजे कर्मातील आनंदाची एके क पायी गाठीत कर्मानंदावर आरूढ होणे होय.
खरे तर, कर्म आणि श्रम यातून जीवन वेलीला प्रसन्नतेची फुले लागतात आणि ही श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. प्रभूची वाट पाहत प्रभू पूजेसाठी शबरीने आणलेली फुले पाहून रामाने विचारले, ‘ही फुले रात्रीच्या वेळीही एवढी प्रफुल्लित कशी?’ त्यावर शबरीने दिलेले उत्तर फार उद्बोधक आहे.
ती म्हणाली, ‘प्रभू, फार वर्षांपूर्वी इथे मतंग ऋषींचा आश्रम होता. या ऋषींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमात सरपण आणण्यासाठी साºया शिष्यांना सांगितले. पण कुणीच ऐकले नाही, शेवटी वयोवृद्ध ऋषी खांद्यावर कुºहाड टाकून सरपण आणायला निघाले. त्यांच्या पाठोपाठ सारे शिष्यही निघाले. दोन दिवस त्या सर्वांनी भरपूर श्रमदान केले. सरपण तोडताना हे अक्षरश: घामाघूम झाले. त्यांच्या श्रमाचे घाम या भूमीवर पडले आणि त्या घामाच्या बिंदूतून ही फुले जन्माला आली. म्हणून ती नित्य प्रफुल्लित राहिली. श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. ती स्वत:ही प्रफुल्लित असतात.
 

Web Title: sweaty flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.