अशीही आगामी आत्मचरित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:36 AM2017-12-02T00:36:30+5:302017-12-02T00:36:56+5:30

 Such upcoming autobiographies | अशीही आगामी आत्मचरित्रे

अशीही आगामी आत्मचरित्रे

Next

- नंदकिशोर पाटील
यंदाचं अ.भा.साहित्य संमेलन बरंच गाजणार असं दिसतंय. अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झालीच आहे, पण तो काही वादाचा मुद्दा आता राहिलेला नाही. यंदा फड वेगळीच मंडळी गाजवणार असं दिसतंय. कोकणसम्राट नारोबादादा, मातोश्रीनिवासी ह.भ. उद्धोजी, कृष्णकुंजवासी राजाभाऊ दादरकर आदी तमाम महानुभवांनी आपापले जीवनानुभव टंकलेखित करण्याची लेखनकामाठी हाती घेतल्याची उडती खबर आम्हांस लागली आहे. बडोदा येथे भरणाºया संमेलनाच्या मांडवात आत्मचरित्रे प्रकाशनाचा सामूहिक बार उडवून देण्याचा कट शिजत असल्याची गुप्तवार्ताही आमच्या हाती आली आहे. आपल्याकडे तशीही राजकीय आत्मचरित्रांची थोर परंपरा आहेच की! अगदी यशवंतराव चव्हाणसो (कृष्णाकाठ) यांच्यापासून ते थोरले बारामतीकर शरद पवारसो (लोक माझे सांगाती) यांच्यापर्यंत अनेकांनी आत्मचरित्र लिहून मराठी साहित्यविश्वात अमूल्य भर घातली आहे.
ही वाङ्मयीन परंपरा अखंड राहावी आणि गेला बाजार मराठी साहित्याचे दालन आणखी समृद्ध व्हावे, म्हणून काही नेत्यांनी आत्मानुभव लिहू घातले आहेत. लेखकांची नावं आणि त्यांच्या आगामी आत्मचरित्रांची शीर्षकं अशी-
सदाभाऊ खोत : रोजंदारी ते सुभेदारी
राजू शेट्टी : साखर पचवलेला माणूस!
महादेव जानकर : काठी नं घोंगडं...
हर्षवर्धन पाटील : गेले ते दिन गेले
रावसाहेब दानवे : तरीही रडतात...ले (सारे!)
धनंजय मुंडे : भगवानगडाला जेव्हा जाग येते
पंकजा मुंडे : भाऊ नसे माझा पाठिराखा!
अशोक चव्हाण : एकला चलो रे
सुधीर मुनगंटीवार : ताडोबा ते तिरुपती
गिरीश महाजन : माझी पिस्तुलबाजी
गिरीश बापट : अजुनि डाळ शिजेना
एकनाथ खडसे : पराचा कावळा !
उद्धव ठाकरे : मातोश्रीवरील दिवस
राज ठाकरे : उजाडेल तेव्हा बघू !
अजित पवार : काका मला वाचवा
चंद्रकांत पाटील : गेलं खड्ड्यात!
आत्मचरित्रांची नुसती शीर्षकं वाचूनच म्हणे लाखो प्रतींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे!

Nandu.patil@lokmat.com

Web Title:  Such upcoming autobiographies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.