भयगंडात अडकले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:01 AM2018-03-16T01:01:15+5:302018-03-16T01:01:15+5:30

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग.

Students stuck in horror | भयगंडात अडकले विद्यार्थी

भयगंडात अडकले विद्यार्थी

googlenewsNext


बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग. परीक्षेमुळे प्रचंड तणावात असलेला एक विद्यार्थी त्याचे परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात पोहोचतो. अतिशय विमनस्क अवस्थेत थेट प्राचार्यांचे केबिन गाठतो आणि त्यांना विनवणी करतो, सर, मला कॉपी करू द्या. मी जर परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर माझे पालक माझ्यावर संतापतील, मला घराबाहेर काढतील. विद्यार्थ्याची ही अनपेक्षित मागणी आणि त्याची मानसिक अवस्था बघून प्राचार्यही प्रचंड अस्वस्थ होतात. दहावी-बारावीच्या परीक्षेचे भूत आणि त्यावर पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांना किती भयभीत करते, याचे हे जिवंत उदाहरण. शिक्षण घेणे म्हणजे फक्त भरपूर गुणांसह परीक्षा उत्तीर्ण करणे, त्या गुणांच्या भरवशावर नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणे आणि तेथील कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मोठमोठाल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळविणे, असे एक समीकरणच आज होऊन बसलेय. शिक्षण म्हणजे ज्ञानार्जन ही संकल्पना जवळपास मोडीतच निघालीय, असे म्हटले तरी चालेल आणि या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्याची दशा सर्कशीतील एखाद्या जनावराप्रमाणे झाली आहे. घरी पालक आणि शिकवणी वर्गांमध्ये शिक्षक त्याच्या मागे हंटर घेऊन उभे असतात. सर्वांचा एकच ससेमिरा असतो, काहीही कर एवढे गुण मिळालेच पाहिजेत ! मग काय! हा दबाव, हा तणाव न झेपणारे विद्यार्थी खरोखरच यासाठी ‘काहीही करण्यास’ तयार होतात. अगदी कॉपी करण्यापासून तर प्रश्नपत्रिका विकत घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. नुकत्याच झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विविध केंद्रांवर कॉप्यांचा आलेला महापूर सर्वांना थक्क करणाराच होता. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे तणाव आणि भयगंडातूनच गैरमार्ग पत्करत असतात. यातूनच पुढे आत्महत्येसारखा टोकाचा मार्गही स्वीकारला जातो. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. हा तणाव कसा कमी करता येईल? याचा विचार आता पालक आणि शिक्षण संस्थांनीही करणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केलेली सूचना गांभीर्याने घ्यावी लागेल. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेत विद्यार्थी समुपदेशन केंद्र उभारण्यात यावे, अशा आशयाचे पत्रच यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठांना पाठविले आहे. मानसोपचारतज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध असणार आहे आणि यूजीसीच्या या सूचनेची महाविद्यालयांनी प्रामाणिक अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्यास निश्चितच मदत मिळेल.

Web Title: Students stuck in horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.