चाचा चौधरी की कहानी

By संदीप प्रधान | Published: June 8, 2018 01:55 AM2018-06-08T01:55:08+5:302018-06-08T01:55:08+5:30

चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते.

 The story of uncle Chaudhary | चाचा चौधरी की कहानी

चाचा चौधरी की कहानी

googlenewsNext

चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते. हा शाकाहारी कुत्रा पाळण्यापेक्षा कुठलाही मांसाहारी प्राणी पाळणे परवडले असते, अशी तिची बडबड सुरू असते. कोपऱ्यात बसलेला अवाढव्य देहयष्टीचा साबू समोर १०८ चपात्यांची चळत आणि १२ किलो हलवा घेऊन त्यावर ताव मारत बसलेला असतो. त्याला पाहताच चाचीचा चेहरा आणखी वेडावाकडा होतो.
चाचा, मला कंटाळा आलाय या संसाराचा. हा रॉकेट आणि हा साबू यांची काही व्यवस्था लावा. यांच्याकरिता करून करून मी पार थकून गेलेय. त्यात तुम्ही नमोंच्या योजनांची माहिती गावभर करण्याकरिता पुस्तक छापायला परवानगी दिल्यापासून शालेय विद्यार्थी मला पाहताच हळूच कुजबुजतात आणि फिदी फिदी हसतात. परवा तर सोशल मीडियावर मला काहींनी ट्रोल केलं. तेवढ्यात दरवाजावरील बेल वाजते. चाची दरवाजा उघडते ना उघडते तोच रावसाहेब दानवे, विनोद तावडे वगैरे मंडळी घरात येऊन सोफ्यावर पटापट बसतात. पाठोपाठ अमित शहा रुमालाने घाम टिपत प्रवेश करतात. अचानक घरात झालेल्या या घुसखोरीमुळे चाची बावचळून जाते. रॉकेट भुंकू लागतो. चाचा लगबगीनं आपला लाल रंगाचा फेटा डोक्यावर ठेवतात. साबू मात्र हलव्यावर ताव मारण्यात गुंग असतो. घरचे झाले थोडे म्हणून घुसले बाहेरचे, अशी बडबड करीत चाची स्वयंपाकघराकडे वळते. लागलीच रावसाहेब दानवे चाचांना हस्तांदोलन करीत बोलतात... हॅलो मिस्टर चाचा चौधरी मिट अवर नॅशनल प्रेसिडेंट अमितभाई शहा. तावडे रावसाहेबांच्या कानात कुजबुजतात. चाचा जरी हिंदी भाषिक असले तरी पक्के मराठी आहेत. चाचा उसका क्या हैना. माधुरी दीक्षितजी के घरसे निकले तो हम लोगो को चाय की तल्लफ आयी. इतने मे कोई बोला की, चाचा इधरीच रहते है. तो हम आपके घर शिरे. चाचा जोरात बोलतात अगं शिरा टाक गं यांना. चाची बोलते... चाचा, रवा आणायला खाली उतरावे लागेल. पण तुम्ही मागच्या महिन्याचेच पैसे दिले नाहीत तर तो तुम्हाला काय जिन्नस देणार. जळणाची लाकडंही संपत आलीेत. चाचीचे शब्द ऐकून सारेच गोरेमोरे झाले. ते रोजचच आहे. पण तुम्ही आले होते कशासाठी? चाचा पुसतात. आमचं लोकसंपर्क अभियान सुरू झालंय त्याकरिता आलो. तेवढ्यात चाची बाहेर येते. या निमित्तानं का होईना तुम्हाला लोकांची आठवण झाली. पेट्रोलचे भाव वाढल्यानं गेली कित्येक दिवसात यांनी मला स्कुटरवरून फिरवून आणलेली नाही. जीएसटी लागू झाल्यापासून आम्ही हॉटेलचे तोंड बघितलेलं नाही.
नोटाबंदीनंतर यांनी मला नवीन कपडालत्ता केलेला नाही आणि १५ लाख खात्यात जमा न केल्यानं माझी सारी स्वप्नं चक्काचूर झाल्येत. चाची डोळ्याला पदर लावते. घरात बांधलेल्या शौचालयाला सहा महिने पाणी नाही आणि उज्ज्वला योजनेत नावं नोंदवून गॅस घरी आलेला नाही. चाचीची टकळी सुरू असताना चाचाने हळूच साºयांना घराबाहेर काढले. आता थेट ‘मातोश्री’वरच जा, असे म्हणत डोळा घातला.
- संदीप प्रधान

(तिरकस)

Web Title:  The story of uncle Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.