शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:56 AM2024-02-19T11:56:12+5:302024-02-19T11:58:31+5:30

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...संपत्तीची लालसा आणि पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी छत्रपती शिवरायांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात!

Special article on Chhatrapati Shivaji Maharaj | शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...

प्रा.डॉ.नितीन बाबर, अर्थशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, भविष्यवेधी द्रष्टा, सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून अद्वितीय कार्य केले आहे. शिवाजी महाराजांनी जगाला केवळ स्वराज्याचं राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. जागतिकीकरण, बाजारीकरण, सत्तास्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा व पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवाजी महाराजांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात.

शेती, पर्यावरण याविषयी महाराजांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवला, महाराजांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यव्यवस्था निर्माण केली. काटेकोर जलव्यवस्थापन, शेतसारा माफी, सवलती, समृद्धी, कृषी व्यवस्थापनातून लोककल्याणाची हमी दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. आज शेतीची अवस्था काय आहे? एकीकडे बोगस बी-बियाणे, खते, औषधे, कृषी खात्यातील सावळा गोंधळ, पीकविमा कर्जमाफी-अनुदान वाटपातले गैरव्यवहार; आणि दुसरीकडे शहरकेंद्रित स्मार्ट विकासाच्या नादात ग्रामीण भागाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! म्हणून शिवरायांच्या कृषीविषयक धोरणाचा फेरविचार आज कालसुसंगत ठरतो.

शिवाजी महाराजांनी उद्योगांच्या संरक्षणाबरोबरच व्यापाराच्या वाढीसाठीही काळजी घेतली. हस्तउद्योग, कुटिरोद्योगपूरक धोरण स्वीकारून कारागीर, कास्तकार व शिलेदारांच्या माध्यमातून स्वयंनिर्भर अर्थकारणावर भर दिला, व्यापारवाढीसाठी उपाययोजना केल्या. राज्याचा कोषागार संपन्न असेल तर त्या प्रगती निश्चितच होते. लढाईमध्ये गनिमांकडून हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. 'स्वयंनिर्भर स्वराज्या 'चा तत्कालीन विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी किती सुसंगत होता, हे लक्षात येते.

छत्रपती शिवरायांनी पर्यावरण आणि माणूस यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व ओळखले होते. 'गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई!' असा मंत्रच त्यांनी आपल्या आज्ञापत्रातून दिला. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा या वृक्षांची लागवड करून स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली. आज विकासाच्या अमानुष हव्यासापोटी माणसाने आपल्याच पायावर कशी कुन्हाड मारून घेतली आहे हे उघड दिसते. महाराजांच्या गौरवशाली प्रयत्नांची आणि विचारांची एकमेव साक्ष असणाऱ्या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात
जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेपण हे कोणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नव्हते. त्यांनी 'स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य।' अशी भावना जागृत करून तुकड्या-तुकड्यांत विखुरलेल्या समाजात सर्वांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या समान संधी देणाऱ्या लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या कार्यकौशल्याची नेहमीच चर्चा होते; पण त्यांची ध्येयधोरणे आज अंमलात आणण्याच्या कालसुसंगततेचा उल्लेख क्वचितच होतो. त्या वाटेने जायचे तर एका व्यापक कृतिशील जनसंवादाबरोबरच खंवीर कृतिशीलतेची आज खरी गरज आहे.

Web Title: Special article on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.