‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:31 AM2018-08-14T00:31:03+5:302018-08-14T00:31:24+5:30

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

Somnath Chatterjee Death Updates : Somnathdas Political career Memory | ‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

Next

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सोमनाथदा बंगालचे असले तरी साऱ्या देशाला आपले वाटणारे व साºयांना घेऊन चालणारे नेते होते. त्याचमुळे ते डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे असतानाही २००४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने त्यांची सभापतिपदावर निवड केली. तो पदभार त्यांनी ज्या डौलाने व गांभीर्याने सांभाळला त्याची तुलना लोकसभेचे पहिले सभापती अनंत शयनम् अय्यंगार यांच्या कारकिर्दीशीच करता यावी. ते सभापती असताना घडलेल्या दोन घटना या संदर्भात नमूद करण्याजोग्या आहेत. त्यांच्या कोणत्याशा निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आपल्यासमोर हजर व्हायला सांगणारा आदेश (समन्स) काढला तेव्हा कायदे मंडळाच्या प्रमुखाला असा आदेश देण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे सोमनाथदांनी त्या न्यायालयाला ऐकविले. कायदेकारी, कार्यकारी आणि न्याय या सरकारच्या तीनही शाखांना घटनेने स्वायत्तता दिली असताना आपल्या शाखेचा अधिकार व सन्मान राखण्यासाठी सोमनाथदांनी तेव्हा एक संवैधानिक संकटच ओढवून घेतले होते. पुढे भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुइंधनाच्या करारावरून भाजप व कम्युनिस्टांसह अनेक पक्षांनी तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेविरुद्ध राष्टÑपतींकडे तक्रारपत्र दिले. त्या पत्रावर सही करायला नकार देऊन सोमनाथदांनी ‘सभापतीने अशा पक्षीय भूमिका घेऊ नये’ असे त्यांच्या पक्षाचे पुढारी प्रकाश करात यांना सुनावले. त्यावर संतापलेल्या करातांनी त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करणारा आदेश काढला. सोमनाथदांनी तो आनंदाने स्वीकारला. मात्र नंतरच्या काळात त्यांची प्रतिष्ठा उंचावलेली व करातांची रसातळाला गेलेली देशाला दिसली. सोमनाथ चॅटर्जी हे भूमिका घेणारे नेते होते. १९९६ मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देवेगौडा यांची देशाच्या पंतप्रधानपदावर निवड करण्याआधी त्यांचे बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर एकमत झाले होते. ज्योती बसूंनी पंतप्रधानपद स्वीकारावे या मताला सोमनाथदांची मान्यता होती. परंतु तेव्हा नव्यानेच पक्षाच्या सचिवपदावर आलेल्या करात यांनी तसे केल्याने पक्षाचे नुकसान होईल असा पवित्रा घेऊन ज्योती बसूंना ते पद मिळू दिले नाही. त्यावेळी व नंतरच्या काळातही प्रकाश करातांना साथ देणारे उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. ए.बी. बर्धन यांनी या साºया घटनाक्रमाबाबत खंत व्यक्त करताना म्हटले ‘आम्ही करातांऐवजी सोमनाथदांचे म्हणणे ऐकले असते तर ते पक्ष व देश या दोहोंसाठीही चांगले झाले असते’. मोठ्यांचे शहाणपण ज्यांच्या उशिरा लक्षात येते त्यांची व त्यांच्या संघटनांची स्थिती कशी होते हे आता करात व त्यांचा डावा कम्युनिस्ट पक्ष बंगाल व अन्यत्र अनुभवत आहे. असो, सोमनाथदांचा पक्ष देशात कधी सत्तेवर येणार नव्हता. तरीही त्यांनी सरकारला कधी ‘विरोधासाठी विरोध’ केला नाही. विकासाच्या व चांगल्या योजनांना त्यांनी नेहमी साथ दिली. झालेच तर सरकार व त्यातील नेत्यांविषयी त्यांनी कधी पातळी सोडून टीका केली नाही. त्याचमुळे सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्याएवढेच अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले. राजकीय विरोध करताना त्याला व्यक्तिगत विरोधाची जोड न देण्याचा त्यांचा संयम देशातील फारच थोड्या नेत्यांना राखता आला आहे. त्याचमुळे डाव्या कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी स्वीकारलेले सोमनाथदा एखाद्या सर्वपक्षीय नेत्यासारखेच देशात व संसदेत वावरले. सर्वच पक्ष व राज्ये त्यांच्याविषयीचा आदरभाव बाळगून होती. त्यांची स्मृती हा देश दीर्घकाळ जपणारही आहे.

Web Title: Somnath Chatterjee Death Updates : Somnathdas Political career Memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.