पगडीचंही सोशल इंजीनिअरिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:01 AM2018-06-16T01:01:38+5:302018-06-16T01:01:38+5:30

आपल्या इतिहासात गुरूला परमेश्वराचं स्थान आहे. समाजातील जडणघडणीत त्या त्या काळातल्या संतांनी, गुरूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे.

social engineering of Turban | पगडीचंही सोशल इंजीनिअरिंग!

पगडीचंही सोशल इंजीनिअरिंग!

Next

- डॉ. उदय निरगुडकर
(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)

तसं आजकाल कुणी पगडी डोक्यावर घालत नाही. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून ग्रामीण भागात उन्हातान्हात राबणारा कष्टकरी शेतकरी डोक्याला मुंडासं बांधतो. फारतर टोपी घालतो. शहरात मात्र शिरस्त्राणाचं महत्त्व हेल्मेटपुरतंच राहिलंय. पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुमच्या डोक्यावर काय आहे किंवा नाही ही गोष्ट दंडाला कारणीभूत होते. परंतु डोक्यात काय आहे ही गोष्ट महाराष्ट्रात यापूर्वी कधी इतक्या चवीनं चर्चिली गेली नसेल. अर्थात त्याला महत्त्वही तसंच. कारण ते उद्गार शरद पवारांचे. आता निवडणुका जवळ आल्यात तर पवारसाहेब काही हेतू मनात ठेवूनच बोलतील ना. छगन भुजबळ सध्या जामिनावर सुटलेत. आरोपांतून त्यांची पूर्णपणे मुक्तता झाली नाही. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात हजर राहिले. आणि महाराष्ट्रात हा पगडीचा वाद सुरू झाला. पगडी हे खरंतर प्रतीक. त्याआडून राजकारणातील अनेक बेरीज-वजाबाक्यांचे डावपेच अख्ख्या महाराष्ट्रात लढवले जाऊ लागले. शिंदेशाही, पेशवाई अशा अनेक पगड्या महाराष्ट्रात पूर्वी लोक सर्रास वापरायचे. आता पगडीचा वापर सत्कारापुरताच. पण त्या सत्कारातूनही सत्कार्यच घडावं, असं हे निवडणुकीचं वातावरण. पगडीचा इतिहासही २०० वर्षांचा. पगडीचा इतिहास पराक्रमाचा, विद्वत्तेचा, शिक्षणाचा आणि ही मस्तकी मिरवली तीसुद्धा गांधीजींचे गुरू असणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले, मराठ्यांचा पराक्रमी इतिहास लिहिणारे न्या. रानडे, शिक्षणसंस्था स्थापन करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर, सुधारणावादी आगरकर, असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, आणि रँडला मारणारे चाफेकर. मुळात हे सगळं आताच का आलं? हा वाद पगडीचा आहे की विचारांचा आहे? या वादातून महाराष्ट्राला काय मिळालं? तरु णांनी यातून काय धडा घ्यायचा? डोक्यात काय विचार साठवायचे? सर सलामत तो पगडी पचास, अशी एक म्हण आहे...भुजबळांना सध्या तोच अनुभव येत असावा. सध्याच्या घडीला भुजबळ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ओबीसी चेहरा. बहुजन समाजाला एकाच पगडीखाली आणण्यासाठी हे पगडीचं सोशल इंजीनिअरिंग पवारांना साधायचं आहे का? एक पगडी नाकारून आणि टोप्या घालणं या शब्दाला एक वेगळाच अर्थ आहे. राजकारणात तर टोप्या घालणारे आणि टोप्या बदलणारे कमी नाहीत. २०१९ च्या तोंडावर कुणाच्या डोक्यावर कोणती पगडी दिसेल, सांगता येत नाही.
सर्वधर्मसमभाव जपणारे भय्युजी महाराज
जीवन आणि मृत्यूचा खेळ इतका अनाकलनीय असेल असं कधीच वाटलं नव्हतं. हजारो, लाखो भक्तांच्या जीवनात आपल्या भक्तिमार्गानं प्रकाश पसरवणारे भय्यूजी महाराज स्वत:च्या हातांनी स्वत:च्या जीवनात मात्र अंधार निर्माण करतात, हे विषण्ण करणारं वास्तव आहे. त्यांच्या लाखो भक्तांना, चाहत्यांना हे पचवता येणं अत्यंत कठीण आहे. उदयसिंह देशमुख अशा नावाचा एक अत्यंत राजबिंडा, देखणा तरुण वयाच्या २८ व्या वर्षी मॉडेलिंगचं क्षेत्र सोडून आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करतो आणि लाखो शोषितांचे, वंचितांचे दु:ख, दैन्य दूर करण्याकरिता झटतो. समाजातील विषमता दूर करून सन्मानाचं आयुष्य मिळावं, यासाठी त्यांचा मसिहा बनतो. देश मोठा करायचा असेल तर व्यक्ती आध्यात्मिक, नैतिक, मानसिकदृष्ट्या विकसित करावी लागेल, हे त्यांचं असिधाराव्रत होतं. रूढ अर्थानं भस्म, जटा, रुद्राक्ष माळा, चमत्कार यापासून कटाक्षानं दूर राहून आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याच्या जोडीला अध्यात्म ही त्यांची पद्धती होती. धर्माचं अवडंबर माजवायचा त्यांना विलक्षण तिटकारा होता. सर्वधर्मसमभाव यावर त्यांची श्रद्धा असल्याने अजमेरचे मुल्ला-मौलवी, अमृतसरचे शीख धर्मगुरू आणि चर्चचे पाद्री ही सगळी मांदियाळी त्यांच्या आसपास असायची. आपल्या इतिहासात गुरूला परमेश्वराचं स्थान आहे. समाजातील जडणघडणीत त्या त्या काळातल्या संतांनी, गुरूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. भय्यूजी महाराजही त्याची आठवण करून देणारे होते. एक विवाद्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलंय. त्यांचं सामाजिक काम, शेतकºयांसाठी अश्रू पुसणं, वंचित-शोषितांच्या मदतीला धावून जाणं. आध्यात्मिक क्षेत्रात राहूनही राजकीय संकटमोचक म्हणून भूमिका निभावणं. त्यांच्या कामांचा धडाका अफाट होता. त्यांच्या आत्महत्येचं गूढ कदाचित उलगडेल. पण ते मात्र कधीच परत येणार नाहीत.
वाकडी घटनेच्या मुळाशी जाणे आवश्यक
जामनेर हे नावदेखील महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असण्याचं कारण नाही. मग जामनेरपासून १० किलोमीटरवरचं पाच हजार लोकवस्तीचं पहुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं वाकडी हे गाव माहीत असणं तर गोष्टच दूर. पण आज या गावात तणावपूर्ण शांतता आहे. कारण इथला एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओमध्ये अत्यंत आक्षेपार्हपणे दोन अल्पवयीन अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाण करताना दिसत आहेत. या वादाला कारण भटक्या जोशी समाजाच्या ईश्वर जोशी यांच्या खासगी मालकीच्या विहिरीत ही मुलं पोहायला जायची. आणि तिथूनच याचा वाद पेटला. त्यात पुन्हा गाव संवेदनशील. भरपूर राजकीय हस्तक्षेप आतापर्यंत होत आलेले. हा व्हिडिओ त्यांनीच काढला आणि व्हायरल केला. दोन तीन दिवस प्रकरण मिटवण्याचे खूप प्रयत्न झाले असं बोललं जातं.
शेवटी तीन दिवसांनी पोलिसांना दखल घ्यावी लागली. कारण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रि या तीव्र होत्या. गुन्हा सरकारी जागेत घडला. आणि मग पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी आणि हाफ मर्डर असे ३१३, ४०५ आणि ५०६ कलम लावण्यात आले. हा वाद स्थानिक आहे की त्यामागे शतकानुशतकांची जातीय संघर्षाची मानसिकता आहे? म्हणूनच या घटनेच्या मुळाशी शांतपणे जायला हवं. कारण अशा तापलेल्या प्रकरणात समजापेक्षा गैरसमजाचीच शक्यता जास्त आहे. एक अन्याय निस्तरताना नेमका बदलत्या काळात गाव बदलला. पण मर्दुमकी गाजवण्याची मानसिकता मात्र बदलायला तयार नाहीय. एखाद्या गरिबाला, असहाय्याला पकडून त्याचा छळ करण्यात आनंद मानणाºयांना काय म्हणावं?

Web Title: social engineering of Turban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.