प्रबोधनकाराची सावली

By admin | Published: June 9, 2015 04:55 AM2015-06-09T04:55:50+5:302015-06-09T04:55:50+5:30

ज्या गावात महाराजांचे कीर्तन असायचे तेथील गरीब मुलांना सुनंदाबाई गणवेश, पुस्तके वाटायच्या. चिंधी बाजारातील जुने कपडे त्या घेऊन यायच्या

Shadow of enlightenment | प्रबोधनकाराची सावली

प्रबोधनकाराची सावली

Next

गजानन जानभोर

ज्या गावात महाराजांचे कीर्तन असायचे तेथील गरीब मुलांना सुनंदाबाई गणवेश, पुस्तके वाटायच्या. चिंधी बाजारातील जुने कपडे त्या घेऊन यायच्या, मुलांना द्यायच्या व स्वत:ही घालायच्या. या मागची भावना एवढीच की, त्या काटकसरीतून गरीब मुलांसाठी नवीन कपडे घेता येतील.
-------
मुलगा डॉक्टर झाला की त्याने मोठा दवाखाना टाकावा, खूप पैसे कमवावेत, असे आईवडिलांना वाटत असते. ते चुकीचे असले तरी आजच्या काळाला अनुसरूनही आहे. पण, धर्मपाल डॉक्टर होऊन गावी परतला तेव्हा सुनंदाबार्इंनी त्याला स्पष्ट सांगितले की, तू गावातच राहायचे आणि गरिबांची सेवा करायची. दवाखाना सुरू करण्यासाठी पैसे नव्हतेच. अशावेळी सुनंदाबार्इंनी त्याला घरातच दोन खोल्या दिल्या आणि डॉ. धर्मपालचा दवाखाना सुरू झाला. सुनंदाबाई रुग्णांची सेवा करायच्या, त्यांना जेऊ घालायच्या, वेळप्रसंगी गावी परत जाण्यासाठी पैसेही द्यायच्या. परवा सुनंदाबाई गेल्या तेव्हा हे गरीब रुग्ण आपल्या रक्ताच्या नात्यातीलच कुणी गेल्यागत धाय मोकलून रडत होते.
उपेक्षित समाजाचे प्राक्तन आपल्या कीर्तनातून मांडणारे सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांच्या सुनंदाबाई पत्नी. प्रबोधनाचा विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य सत्यपाल महाराजांनी दिले. पती कीर्तनातून जे सांगतात ते आपल्या व मुलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष रुजावे यासाठी या माऊलीची धडपड असायची. ज्या गावात महाराजांचे कीर्तन असायचे त्या गावातील हुशार, गरीब मुलांना सुनंदाबाई गणवेश, पुस्तके वाटायच्या. चिंधी बाजारातील जुने कपडे त्या घेऊन यायच्या, मुलांना द्यायच्या व स्वत:ही घालायच्या. या मागची प्रामाणिक भावना एवढीच की, त्या काटकसरीतून गरीब मुलांसाठी नवीन कपडे घेता येतील. पोथ्यांची पारायणे करण्याऐवजी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे पारायण करा, असे सत्यपाल महाराज लोकांना सांगायचे. त्यांच्या या कळकळीचे पहिले अनुसरण सुनंदाबाई घरातून करायच्या. वटसावित्रीला त्यांनी वडाच्या झाडाला कधी फेऱ्या मारल्या नाहीत, अक्षयतृतीयेला घास टाकला नाही, देवीदेवतांच्या नावाने उपवास केले नाहीत की पोथ्याही वाचल्या नाहीत. घरातील आनंदाच्या क्षणी मात्र त्या भुकेलेल्यांना आठवणीने कवटाळून घ्यायच्या. सत्यपाल महाराज सिरसोलीत दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा घेतात. सुनंदाबार्इंशी त्यांचा विवाह अशाच सोहळ्यात झाला. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांनी त्यांचे लग्न लावून दिले, जुन्या कपड्यांवर, कुठलेही विधी नाहीत, हुंडा नाही आणि सोपस्कारही नाहीत. नवरा-बायकोचा संसार कसा असावा, हे कीर्तनातून सांगताना महाराज सुनंदाबार्इंचा आवर्जून उल्लेख करायचे. त्यावेळी त्या गर्दीत कुठेतरी असायच्या. कीर्तनात महाराजांना मिळणाऱ्या शाली त्या तेथेच बाया-बापड्यांना वाटून द्यायच्या. ‘आपला नवरा सप्तखंजेरीतून जे मांडतो त्याच्याशी प्रामाणिक राहावे आणि मुलांनाही संस्काराच्या त्याच वाटेने पुढे न्यावे, पत्नीचा हाच खरा धर्म आहे’, असे त्या सांगायच्या. कार्यक्रमानिमित्त महाराज सतत बाहेर राहायचे. प्रबोधनकाराची अशी भ्रमंती सुरु असताना इकडे सुनंदाबाई मात्र तक्रार न करता संसार सांभाळत होत्या. महाराजांच्या कीर्तनात हार्मोनियमवर साथ देणारा गजानन हा त्यांचा चुलत भाऊ. त्याचे आई-वडील लहानपणीच वारले. महाराजांच्या आईने त्याला पोटाशी धरले. सुनंदाबार्इंनी त्याला कधीच अंतर दिले नाही. अनेकदा घरात तेल-मीठ नसायचे. पण ही गोष्ट महाराजांना कळू देत नव्हत्या. नवऱ्याला कळले तर त्याला घराकडे लक्ष द्यावे लागेल व त्याचे प्रबोधनाचे कार्य थांबेल, ही भीती त्यांना वाटायची. आजच्या काळातील बापू-महाराजांच्या बायकांचे थाट पाहिल्यानंतर सुनंदाबार्इंचा त्याग व नवऱ्याच्या प्रबोधनाच्या कामी दिलेली निष्कांचन साथ हे सामाजिक चळवळीतील मोठे योगदान ठरते.
देहदान हा महाराजांच्या कीर्तनातील आस्थेचा विषय. सुनंदाबाई त्यांना नेहमी म्हणायच्या, ‘मी गेल्यावर माझेही देहदान करा’. परवा त्या गेल्या तेव्हा नातेवाईकांनी अंत्यविधीचा आग्रह धरला. महाराज मात्र देहदानाच्या निर्णयावर ठाम होते. ‘आपण जिवंत असेपर्यंतच आपले शरीर उपयोगाचे असते, नंतर त्याची राख होते. कुणाच्याही उपयोगाला ते का येत नाही?’ सुनंदाबाई हा प्रश्न महाराजांना नेहमी विचारायच्या. परवा अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुनंदाबार्इंचे पार्थिव सुपूर्द केले त्यावेळी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर साऱ्यांनाच सापडले होते.

Web Title: Shadow of enlightenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.