संकल्प अवयवदानाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:21 AM2018-01-02T00:21:10+5:302018-01-02T00:21:42+5:30

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे.

 Resolution organ | संकल्प अवयवदानाचा

संकल्प अवयवदानाचा

Next

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. नागपुरात २०१३ मध्ये केवळ एका ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदान झाले. गेल्या चार वर्षात हा आकडा वाढून १४वर गेला. मात्र यात आणखी भर पडणे आवश्यक आहे. कारण, भारतात दरवर्षी दोन लाख किडनीची (मूत्रपिंड) गरज भासते. मात्र, प्रत्यक्षात पाच ते सहा हजार किडनी उपलब्ध होतात. दरवर्षी ५० हजार लिव्हरची (यकृत) गरज असताना ७५० लिव्हर प्रत्यारोपण होतात. नेत्रदानातही आपण मागे आहोत. नव्या वर्षात प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केल्यास व आपल्या कुटुंबीयास याची माहिती दिल्यास जीवन-मृत्यूच्या रेषेवरील अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो रुग्णांना नवे जीवन मिळू शकेल. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सोबतच अवयवदान व देहदानाला अंधश्रद्धा नामक अविचाराने ग्रासून टाकले आहे. यामुळे दानाच्या तुलनेत अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोक हे दान करण्यास टाळतात. एकीकडे अंधश्रद्धेमुळे अवयवदानाविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना सुशिक्षित माणसे जवळची व्यक्ती गेल्याच्या दु:खात अवयवदानाची जबाबदारी विसरून जातात. तर काही डॉक्टर ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांपासून अवयवदानाची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवतात. याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद नाही. २०१२ मध्ये शासनाने नागपुरात विभागीय प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) स्थापन करून अवयवदानाच्या चळवळीला गती आणली. परंतु २०१३ ते २०१७ या वर्षापर्यंत २८ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान होऊ शकले. २०१८ मध्ये जनजागृतीवर अधिक भर दिल्यास हा आकडा वाढू शकतो. नुकतेच एका मातने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचे दु:ख बाजूला सारून अवयवदानाला परवानगी दिली. या निर्णयाने तिघांचे प्राण वाचले. मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे हे महत्त्व घराघरात पोहचणे आवश्यक आहे. ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे’. असे म्हणतात. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कुणीतरी हे सुंदर जीवन जगू शकेल. यामुळे आता जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयवदान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा. नुकतेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. ही चळवळही अवयवदानासारखीच गतिमान होणे आवश्यक आहे. आपण नशीबवान आहोत. आपले सर्व अवयव शाबूत आहेत. जे या समस्येला सामोरे जातात त्यांच्या जागी क्षणभर स्वत:ला पाहून विचार करण्याची गरज आहे.

Web Title:  Resolution organ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.