चुना लावा बोटाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2023 07:47 AM2023-07-04T07:47:32+5:302023-07-04T07:47:44+5:30

आमदारांनी नाम्याला छोटी-मोठी कंत्राटे मिळवून दिल्याने पिवळी रससशीत सुबत्ता त्याच्या हाता-गळ्यात चमचमत होती.

Put lime on your finger! | चुना लावा बोटाला!

चुना लावा बोटाला!

googlenewsNext

नाम्याने व्हॉटसॲप सुरू केले तर मेसेजचे गठ्ठेच्या गठ्ठे समोर बदाबदा कोसळू लागले. ‘चकाट्या पीट भावा’ हा नाम्याचा सर्वांत लाडका ग्रुप. त्यावर एक व्हिडीओ पडला होता. ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर सोहळ्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?’, असा एक रोखठोक सवाल केलेला तो व्हायरल व्हिडीओ नाम्याने पाहिला. बाकी मेसेज वाचल्यावर त्याला नव्या राजकीय घडामोडींची कल्पना आली. त्याचा आमदार आणि नाम्या यांचे ३६ गुण जुळत असल्याने तो सोशल मीडियावर आमदारांचा व त्यांच्या पक्षाचा किल्ला प्राणपणाने लढवत असे.

आमदारांनी नाम्याला छोटी-मोठी कंत्राटे मिळवून दिल्याने पिवळी रससशीत सुबत्ता त्याच्या हाता-गळ्यात चमचमत होती. आपले आमदार कुठे आहेत हे तपासायला नाम्याने फोन केला तर आमदारांचा मोबाइल नॉट रिचेबल होता. नाम्याच्या ग्रुपवरील ‘भोंगा बंद’ असे नाव धारण केलेल्याने आमदारांचा फोटो खंजिरासकट पोस्ट केला होता. ‘मोहब्बत की दुकान’ हीच ओळख असलेल्याने त्या खंजिरावर सहमतीचे अंगठे उठवले व ‘आम्हाला हे नवे नाही’, अशी कॉमेंट पोस्ट केली. ‘लाल चुटूक टिळ्या’चा डीपी ठेवलेला तोही ‘धनुष्यबाण’ चिन्हाने सत्तेतील नव्या पाहुण्यांबाबत नाराजी व्यक्त करीत होता. नाम्याला राहवले नाही. त्याने दुसऱ्या एका ग्रुपवरील आमदारांच्या नॉट रिचेबल होण्याबाबत समर्थनाची पोस्ट फॉरवर्डली.

नाम्याच्या गुरुजींचा मुलगा तोही ग्रुपवर होता. त्याने ‘परशुरामाचा परशू’ हा डीपी ठेवला होता. काल-परवापर्यंत नाम्या आणि त्याच्या आमदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा तो आज चक्क नाम्याच्या समर्थनार्थ धावून आलेला पाहून नाम्याला हायसे वाटले. थोड्याच वेळात वेगवेगळ्या ग्रुपवर मिम्स, ट्वीट, व्हिडीओ, पोस्ट यांचा अक्षरश: पाऊस सुरू झाला. भ्रष्टाचाराच्या पुराव्यांच्या होड्या पावसाच्या पाण्यात सोडल्या गेल्या, तर तुरुंगात खितपत पडलेल्या कुणाला सुटकेची आस लागल्याचे मीम्स सुसाट सुटले. जो तो आपापल्या सोयीचे मीम्स फॉरवर्ड करून आडव्या, उभ्या स्मायलीतून असुरी आनंद घेत होता. आमदारांच्या राजकीय भवितव्याची गंभीर चर्चा सुरू झाली. नाम्याच्या पोटात गोळाच उभा राहिला. मग त्या ‘परशुरामाच्या परशू’ने तात्त्विक भूमिका मांडली. सोशल मीडिया आणि मीडिया प्रभावी झाल्यापासून आता सकाळची गोष्ट संध्याकाळी विसरली जाते. लोक चार दिवस हे खंजीर-बिंजीर लक्षात ठेवतात. देशाच्या विकासाकरिता प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. खरा धोका धर्मांतर व लव्ह जिहाद हाच आहे. हा मुद्दा ग्रुपवर रेंगाळला तसे ‘लाल चुटूक टिळा’ आणि ‘भोंगा बंद’ यांनी अगोदरचा विरोधी सूर बदलून ‘परशुरामाच्या परशू’च्या सुरात सूर मिसळला.

‘परशुरामाच्या परशू’ने नाम्याला पर्सनल मेसेज करून आता तू आणि तुझा आमदार इकडे आहात, याची जाणीव करून दिली. त्यामुळे ‘मोहब्बत की दुकान’ अक्षरश: एकाकी पडला. लवकरच अमेरिकेतून अत्याधुनिक ड्रोन येणार आणि सीमेलगत घुसखोरी करणाऱ्या चीनवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करून चिनी सैन्याला नेस्तनाबूत केल्यावर कोण बाकी मुद्दे लक्षात ठेवतो, असा लंबाचौडा मेसेज ‘परशुरामाचा परशू’ने पोस्ट केला. मग ड्रोनच्या चर्चेत सारेच गुरफटले. राजकारणातील नव्या युत्या, आघाड्यांवरून लोक नाराज होतात; पण चार दिवसांत सारे विसरून जातात. देशातील बहुसंख्याकांना खरे आकर्षण विकास, हिंदुत्व याचेच आहे, असे नाम्याच्या मेंदूत ‘परशुरामाचा परशू’ने नेमके घुसवले.

चार दिवसानंतर मंत्रिपदाची शपथ घेऊन आमदार मतदारसंघात आले. नाम्या त्यांना भेटायला गेला. आमदार नाम्याला म्हणाले, ‘विकास थांबला होता रे गावाचा, तुझा आणि माझ्या तमाम जनतेचा. रोज मनात कालवाकालव होत होती. शेवटी आम्ही मारली उडी!’ - आपण आमदारांच्या इतके जवळ असूनही कानोकान खबर लागली नाही ही नाम्याची नाराजी हेरून आमदार म्हणाले, तुझी बहीण तुझ्या खास मित्रासोबत लग्न करून गेली तेही तुला कळले नव्हते; पण ती चांगल्या घरात पडली. तिचा विकास झाला. अशी विकासाची ऑपरेशन्स गुप्त असतात. आता तुला आणखी मोठी कामे मिळणार, तू गोल्डन मॅन होणार. नाम्या खुदकन हसला. नाम्याने व्हॉट्सॲप सुरू केले, तर त्याच्या लाडक्या ग्रुपवर एक मेसेज पडला होता. ‘यापुढे निवडणुकीत आमच्या बोटाला शाई नव्हे चुना लावा’. मेसेज पोस्ट करणारा सायलेंट मेंबर मेसेज टाकून लेफ्ट झाला होता..

Web Title: Put lime on your finger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.