पुणे तेथे रोजगार उणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 07:15 AM2018-07-28T07:15:25+5:302018-07-28T07:17:02+5:30

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे

Pune there job poor! | पुणे तेथे रोजगार उणे!

पुणे तेथे रोजगार उणे!

googlenewsNext

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे.  स्थलांतरितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाले आहे. भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळू लागल्या म्हणून पुणेकरांनी खूष होण्याचे कारण नाही. तर, एकंदर गेल्या काही वर्षांत पुण्यामध्ये रोजगाराच्या निर्मितीत घट होत आहे. यंदाच्या वर्षी हे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. २०१५मध्ये तर तब्बल १५ टक्के घट होती, असाही एक अहवाल आला आहे. रोजगारनिर्मिती कमी होण्यामागचे मुख्य कारण कार्यालयांसाठी पुण्यात पुरेशा जागा उपलब्ध होत नाहीत, हे आहे. वास्तविक, मुंबईपाठोपाठ राज्यात पुण्याचा विकास झाला, याचे मुख्य कारण म्हणजे पुण्यातील जागेची उपलब्धता. मुंबईच्या चारही बाजूंना समुद्र असल्याने वाढीला मर्यादा होत्या. त्यामुळेच औद्योगिक पातळीवरही मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्णत्रिकोण साकारला. टेल्को, बजाजसारख्या मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली. त्यापाठोपाठ औद्योगिक वसाहतींच्या म्ध्यमातून उद्योग उभारले जाऊ लागले. गेल्या तीन दशकांत येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढले. चाकण परिसरातील ऑटो उद्योगाच्या वाढीमुळे त्याला भारताचे ‘डेट्रॉईट’ म्हटले जाऊ लागले. शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे पंचतारांकित एमआयडीसी आली. हे सगळे होत असताना परिसरातील सर्व कंपन्यांची कार्यालयेही पुण्यामध्ये येणे स्वाभाविक होते. जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांनी पुण्याला पसंती दिली. त्यामुळे इन्फोसिस, विप्रो, टीसीएससारख्या कंपन्यांबरोबरच शेकडो आयटी कंपन्या पुण्यात विस्तारल्या. त्यातून सेवाक्षेत्राचीही वाढ झाली. बांधकाम क्षेत्र वाढले. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. मात्र, या सगळ्या विकासाचा गाभा असणाऱ्या पुणे शहराच्या विकासाला गती मिळाली नाही. सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. पायाभूत सुविधा आवश्यक प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. विकासाची बेटे तयार झाली. एका बाजूला लष्कराचे केंद्र म्हणून हजारो एकर जागा विनावापर राहिली. पुण्याचे एकंदर क्षेत्रफळ पाहिले, तर वाढीला मोठी संधी असतानाही केवळ नागरी सुविधांअभावी अनेक भागांत जाण्यास उद्योग धजावत नाहीत. रिंगरोडसारखे प्रकल्प अनेक वर्षे रखडले असल्याने नवीन विकासठाणी निर्माण होत नाहीत. वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाने पुण्याच्या वाढीचा श्वास कोंडला आहे. मेट्रो होईल, आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल आणि आपोआप विकास होईल, या भरवशावर बसून चालणार नाही, हेच या अहवालांनी दाखवून दिले आहे. पुण्यापुढील सर्व प्रश्नांचा एकात्मिक आढावा घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले तरच भविष्यातील धोका टळेल; अन्यथा विकासाच्या शिखरावरून पुण्याची वाटचाल 'डाइंग सिटी'कडे होण्यास वेळ लागणार नाही!
 

Web Title: Pune there job poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.