पोलीस तणावमुक्त व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:30 AM2018-01-19T03:30:49+5:302018-01-19T03:31:17+5:30

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला

Police must be stress free | पोलीस तणावमुक्त व्हावा

पोलीस तणावमुक्त व्हावा

Next

‘मुंबईतील पोलीस आता आॅन ड्युटी आठ तासच काम करतील.’ आॅन ड्युटी २४ तास कार्यरत असणाºया पोलिसांसाठी ही एक चांगली बातमी आहे. तूर्त मुंबईसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी पुढे राज्यभर त्याचा विस्तार होईल आणि समाजातील या महत्त्वाच्या घटकाला न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. सध्या राज्यातील पोलिसांची अवस्था अतिशय बिकट आहे. कामाचे तास निश्चित नाहीत, साप्ताहिक सुटी मिळेलच याची शाश्वती नाही. वरून कामाचा प्रचंड ताण. आंदोलने, व्हीव्हीआयपींची सुरक्षा, सणावारातील बंदोबस्त, मोर्चे, अधिवेशन काळातील व्यवस्था अशा अनेक कामांमुळे पोलीस सतत तणावात असतात. लेबर कायद्यात आठ तासाच्या ड्युटीची तरतूद असतानाही मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्यातील पोलिसांना रोज १२ ते १४ तास काम करावे लागते. पुरेशी साधने नसतानाही जोखीम पत्करावी लागते. यात कुठे चूक झाली तर वरिष्ठांकडून तंबी मिळते. त्यांची बोलणी खावी लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. बदली, निलंबन, बडतर्फीची टांगती तलवार असतेच. अशा या वातावरणात काम करीत असताना पोलिसांवर प्रचंड मानसिक ताण येतो. या तणावातून काही पोलीस आत्महत्येचे पाऊल उचलतात. महाराष्टÑात एक लाखामागे १७ पोलीस आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. राष्टÑीय स्तरावरील हे प्रमाण १०.५ टक्के एवढे आहे. वरिष्ठांकडून होणारा अपमान आणि छळ हे यामागचे एक कारण असले तरी यातील बहुतांश आत्महत्यांमागे कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. कामाच्या व्यापासोबतच मानसिक पातळीवरही पोलिसाचे स्वत:शीच द्वंद्व चालू असते. ‘शेवटी मीही एक माणूस आहे‘ हे लोक समजून का घेत नाही, हा प्रश्न त्याला वारंवार पडत असावा. समाजातून आपुलकी मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळातच नकारात्मक असतो. कुटुंबाच्या अपेक्षांची पूर्तताही करणेही शक्य होत नाही. अशा या कोंडीतून त्याच्या शारीरिक व मानसिक समस्या सुरू होतात. कामाचे ठिकाण, वेळ, घर किंवा पोलीस कॉलनी याचा कुठेच ताळमेळ नसल्यामुळे आणि साप्ताहिक सुटी किंवा रजा मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे सुटीचे नियोजन करता येत नाही. मुलाबाळांसोबत वेळ घालविता येत नाही. त्यातून मग नात्यातील तणाव निर्माण होतात. घर असतानाही बेघर झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. प्रशासन पातळीवरून वेळोवेळी मांडण्यात आलेल्या अहवालांतही पोलिसांच्या या अवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी महाराष्टÑ शासनाने याची दखल घेऊन काही उपाययोजना हाती घेतल्या हे चांगले झाले. मुंबईतील पोलिसांच्या कामाचे आठ तास केले, हा त्यातलाच एक टप्पा म्हटला पाहिजे. आजमितीला राज्यात एक लाखामागे अवघे १५३ पोलीस आहेत. राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मोर्चे, आंदोलनांचा जोर वाढला आहे. व्हीव्हीआयपींचा सुरक्षा बंदोबस्त वाढत आहे. अशा स्थितीत आहे त्या तुटपुंज्या मनुष्यबळावर त्यांचा सामना करणे अवघड आहे. त्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करावी लागेल. याशिवाय पोलिसांचे इतर अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या योग्य निवासाची सोय, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या बढत्या, बदल्यात पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पोलीस कुटुंबीयांसाठी नियमितपणे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेता आले तर कौटुंबिक ताणतणाव निवळण्यास मदत होऊ शकेल. या सर्व आघाड्यांवर त्यांना मानसिक स्वास्थ्य देता आले तरच इतर कोणत्याही आघाड्यांवर ते सक्षमपणे लढू शकतील हे लक्षात घेतले पाहिजे.

Web Title: Police must be stress free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस