पालेकरांचे ‘गोलमाल रिटर्न्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 03:54 AM2019-02-17T03:54:05+5:302019-02-17T03:54:45+5:30

समोर जेसल ठक्कर आणि तिचे टीम मेंबर्स खूप उत्साहात दिसत होते. जेसल ठक्कर आणि बोधना आर्ट अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनबद्दल मी बरंच ऐकून होते.

Palekar's 'Golmaal Returns' | पालेकरांचे ‘गोलमाल रिटर्न्स’

पालेकरांचे ‘गोलमाल रिटर्न्स’

Next

सीएसएमटी स्टेशनवर ट्रेन थांबली. मी घाईने उतरले. बाहेर पडून टॅक्सी पकडली... ‘भय्या, एनजीएमए चलोगे?’ आज मला उशीर करायचा नव्हता. कारण, २४ वर्षांनंतर प्रभाकर बरवे या महान चित्रकाराचं प्रदर्शन पाहायला मिळणार होतं. हा उद्घाटन सोहळा यासाठीही महत्त्वाचा होता की, १० ते १२ वर्षे बरवेंच्या कला साहित्यावर सखोल अभ्यास करणारी यंग क्युरेटर जेसल ठक्कर हिने हा शो क्युरेट केला होता. त्यामुळे गर्दी होणारच होती. मी हॉलमध्ये पोहोचले आणि अपेक्षेप्रमाणे हॉल प्रेक्षकांनी भरलेलाच होता. मीही प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत एका जागी स्थिरावले; पण पाहुणे वेळेत न आल्याने प्रोग्राम सुरू व्हायला वेळ होता.

समोर जेसल ठक्कर आणि तिचे टीम मेंबर्स खूप उत्साहात दिसत होते. जेसल ठक्कर आणि बोधना आर्ट अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनबद्दल मी बरंच ऐकून होते. प्रभाकर बरवे, गायतोंडे, कोलते, पळशीकर अशा आधुनिक काळातील दिग्गज कलाकारांच्या कार्यावर दृष्टी टाकणारी अनेक पुस्तके, जीवनचरित्रे, विश्लेषणात्मक निबंध, मराठी तसेच इंग्रजीमधून तिने प्रकाशित केले आहेत. भारतीय कलेच्या इतिहासातील बरवेंचे स्थान आणि त्यांचे महत्त्व अभ्यासताना त्यांच्या संबंधातील प्रत्येक ऐतिहासिक दस्तऐवज ती निष्ठेने गोळा करत होती.
परदेशस्थित बरवेंच्या फॅमिलीने २००८ साली बरवेंच्या हस्तलिखीत ६२ डायऱ्या जेसलला सुपूर्द केल्या. त्यावरूनच तिची विश्वासार्हता सिद्ध होते. माधव इमारते, हेमंत कर्णिक, दिलीप रानडे हे बरवेंचे मित्र. जेसलच्या कामात त्यांनी तिला मदत केली, ती तिचा अभ्यास आणि बरवेंवरील श्रद्धा पाहून. हंसोज्ञेय तांबे तसेच काही सहकलाकार जेसलबरोबर जवळजवळ दोन वर्षे मदत करत होते, ते याच प्रदर्शनासाठी.
मी सहज आजूबाजूला नजर फिरवली, तर शंभरहून अधिक बरवेंची पेंटिंग्ज होती. ती बघायला मी उत्सुक होते. त्यांची अगदी पूर्वीची कामे, मधल्या तंत्र फेजमधील कामे व नंतर एकदम वेगळी वस्तुविचारविषयक सर्व कामे क्रमवार लावली होती. बरवेंची कामे ही हुसेन, भूपेन, सुधीर पटवर्धन यांच्याप्रमाणे नरेटिव्ह नव्हती किंवा गायतोंडे, नसरीन, जयराम पटेल यांच्याप्रमाणे पूर्णपणे अ‍ॅबस्ट्रॅक्टही नव्हती. या दोन्ही प्रवाहांना जोडणारा महत्त्वाचा सांधा म्हणजे बरवेंची कामे आणि म्हणून त्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन तितकेच महत्त्वाचे आणि अद्वितीय होते.
या प्रदर्शनासाठी बरवेंची ओरिजनल पेंटिंग्ज मिळवणं हा खूप मोठा द्राविडी प्राणायाम होता. जपानमधील एका म्युझियममधून इंग्लंड, न्यूयॉर्क येथील आर्ट कलेक्टर्सकडून बरवेंची पेंटिंग्ज भारतात आणणे, त्यांचे ट्रान्सपोर्टेशन, त्याचा इन्शुरन्स, करोड रुपये किमतीची पेंटिंग्ज त्यांनी तिला देणं, ही तिच्यावरच्या विश्वासाची पावती होती. ती काळजीपूर्वक हाताळण्यापासून पुन्हा त्यांच्याकडे सुस्थितीत पोहोचवण्याचा किती ताण जेसलवर असेल? दिल्ली, बंगळुरू, पुणे, मुंबईमधील विविध आर्ट कलेक्टर्सकडून तिने बरवेंची विविध पेंटिंग्ज मिळवली.
एक शो क्युरेट करायचा, म्हणजे किती कामं असतात. समोरच्या भिंतीवर बरवेंच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचे तपशीलवार वर्णन बघून, हे करायला किती वेळ खर्च झाला असेल, त्यासाठी किती वाचन करावे लागले असेल, हे सहज लक्षात आले. प्रभाकर बरवेंच्या प्रत्येकी २०० ते ३०० पानांच्या ६२ डायºया वाचणे, त्याचे स्कॅनिंग करून डॉक्युमेंटेशन, फोटोग्राफी यासाठी प्रत्येक जण दिवसरात्र कामात गढून गेला असेल.

डोमच्या छतावर लावलेले बरवे यांचे फेमस पेंटिंग ‘दी क्लॉक’ आणि प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण डिस्प्ले, प्रत्येक चित्राला त्याची स्पेस देणं, मध्ये बरवेंच्या डायरीतील पाने डिस्प्ले करून प्रत्यक्ष बरवेंच्या विचारांशी वाचकमनाचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न, यातून बरवेंच्या चित्रांविषयीची तिची समज दिसून येते. प्रदर्शनात येताना मी कोपºयात एक अ‍ॅक्टिव्हिटी कॉर्नर बघितला. हंसोज्ञेय तांबेंनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली होती. बरवेंच्या चित्रातील घटकांचे पेपर कटआउट्स घेऊन त्याला मॅग्नेट लावले व प्रेक्षकांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे विविध कम्पोझिशन तयार करावीत, असा इंटरअ‍ॅक्टिव्ह पेंटिंग्जचा प्रयोग अनोखा आहे.

बरवेंच्या १० ते १२ डायºयांची एक्झिबिशन कॉपीज काढून प्रेक्षकांना प्रत्यक्ष बरवेंची डायरी हाताळायला मिळणार, वाचायला मिळणार, ही कल्पनाही भन्नाट होती. ही इतक्या वेगवेगळ्या पातळीवरची कामं तीच माणसं करू शकतात, ज्यांना बरवेंबद्दल पराकोटीची श्रद्धा आहे.
अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माझी विचारांची साखळी तुटली. पाहुण्यांचे आगमन झाले. स्वागत समारंभ आणि बहुलकरसर, जेसल ठक्कर यांचे प्रारंभिक भाषण झाले. त्यांनी याप्रसंगी बरवेंबद्दल गौरवोद्गार काढले आणि क्षणात वातावरण बरवेमय झाले. त्यानंतर, दिलीप रानडे यांनी बरवेंच्या आणि त्यांच्या मैत्रीतील विविध प्रसंगांच्या स्मृती जागृत करून त्यांच्या कलेविषयक आणि जीवनविषयक दृष्टिकोनाची ओळख करून दिली. ललीता लाजमी यांचे भाषणही बरवे यांच्याविषयी आदर व्यक्त करणारे होते.
सर्वात शेवटी अमोल पालेकरांचे भाषण होते. बरवे हे मित्रस्थानी असल्यामुळे आणि दोघांच्यात मैत्रीपूर्ण संवाद, तसेच चर्चा होत असल्यामुळे आयोजकांनी अमोल पालेकरांना बोलावले असावे. भाषणाला सुरुवात झाली आणि बरवेंबद्दल तयार झालेल्या वातावरणास तडा गेला. त्यांच्या भाषणात बरवे कुठेच नव्हते. ‘एनजीएमए’मधील गोंधळ, सांस्कृतिक खात्याचे निर्णय, सरकारवरील टीका अशा वेगळ्याच रुळांवर गाडी धावू लागली. बरवे यांच्याविषयी काहीच संदर्भ येत नव्हता, म्हणून मग नाइलाजाने बहुलकरसर व इतर मान्यवरांनी त्यांना विनंती केली की, आपण कृपया बरवेंबद्दल बोलावे. तरीही, त्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नयनतारा सहगल यांच्यावर झालेल्या अन्यायाशी स्वत:ला जोडून घेऊन आयोजकांची कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
शेवटी, जेसल ठक्करने त्यांना सांगितले, बरवेंविषयी आस्थेने वर्षानुवर्षे काम करणारी जेसल आणि या प्रदर्शनाच्या निमित्ताने जोडले गेलेले तिचे सर्व सहकारी यांच्यासाठी आजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा क्षण विशेष होता. त्यांनी बरवेंबद्दल केलेला अभ्यास, त्यांच्यावरील निष्ठा, आदर, प्रेम आणि हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांतून बरवेंना आदरांजली वाहण्याचा तो क्षण होता. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांनाच बरवेंबद्दल ऐकायचं होतं. ते काही बोलत नसले तरी, श्रद्धांजलीच्या वेळी कोणी बेण्जो वाजवला, तर आयोजकांनी तो का खपवून घ्यावा? भरसभेत अतिशय सक्षमपणे आणि संयत भाषेत अमोल पालेकरांना, आपण कृपया बरवेंवर बोला, हे सांगणाºया जेसलचे सामर्थ्य यातून दिसले. कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर केवळ आणि केवळ अमोल पालेकरांनीच आवाज उठवलेला नाही. सिनीअर आर्टिस्ट संबंधितांकडे या विषयाचा पाठपुरावा करत असून, यासाठी त्यांनी अनेकदा चर्चाही केल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालयातले निर्णय एका विशिष्ट प्रक्रियेअंतर्गत घेतले जातात, कोणा एका व्यक्तीच्या भाषणाला घाबरून नाही.
अंतत: एक वाटते की, ‘एनजीएमए‘मध्ये जे काही झालं, ते चूक की बरोबर, याच्या खोलात गेलो तर असंख्य कंगोरे दिसतील. पण, एक नक्की, अमोल पालेकरांना संधी दिली होती, ती बरवेंबद्दल बोलण्याची. त्यांनी बरवेंबद्दल आणि जेसल ठक्करसारख्या यंगेस्ट क्युरेटरने केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तिचे कौतुक करण्याचे सोडून ‘मौके पे चौका’ मारण्याचा प्रयत्न केला. मिळालेली संधी ओरबाडून, मीडियासमोर सर्व हार स्वत:च्या गळ्यात घालून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न अमोल पालेकरांनी केला. या कृतीचे कुणी सुज्ञ माणूस नक्कीच समर्थन करणार नाही. प्रत्यक्षदर्शी

बरवे हे मित्रस्थानी असल्यामुळे आणि दोघांच्यात मैत्रीपूर्ण संवाद असल्यामुळे आयोजकांनी अमोल पालेकरांना बोलावले असावे. पालेकरांच्या भाषणाला सुरुवात झाली. मात्र, त्यांच्या भाषणात बरवे कुठेच नव्हते. ‘एनजीएमए’मधील गोंधळ, सांस्कृतिक खात्याचे निर्णय, सरकारवरील टीका अशा वेगळ्याच रुळांवर गाडी धावू लागली. म्हणून, मग नाइलाजाने त्यांना थांबवावे लागले. नयनतारा सहगल यांच्यावर झालेल्या अन्यायाशी स्वत:ला जोडून घेऊन आयोजकांची कोंडी करण्याचा प्रयत्न पालेकर यांनी केला.

- मेधा जोशी (थळे)
(लेखिका प्रसिद्ध फाइन आर्टिस्ट आहेत.)

Web Title: Palekar's 'Golmaal Returns'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.