On the occasion of the National Convention of Transfers ... | किन्नरांच्या राष्ट्रीय संमेलनाच्या निमित्ताने...

- राजेश शेगोकार
किन्नरांचे अ.भा. मंगलामुखी किन्नर संमेलन १ फेब्रुवारीपासून अकोल्यात सुरू झाले आहे. या संमेलनामध्ये किन्नरांचे प्रश्न व समस्यांवरील चर्चेसोबतच, नव्या नात्यांचीही गुंफण होत आहे. संमेलन सुरू असतानाच महाराष्ट्र सरकारने किन्नर कल्याण बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे किन्नर आनंदले आहेत.
अकोल्यात देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या अ. भा. मंगलामुखी राष्ट्रीय संमेलनामध्ये देशभरातील ६००पेक्षा जास्त किन्नर सहभागी झाले आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, देहबोली वेगळी आहे; पण ‘आम्ही सारे किन्नर आहोत’ हा अभिमान व किन्नर पंरपरेशी निष्ठा, हे समान सूत्र त्या सगळ्यांना एकत्र जोडते. किन्नर हा शब्द उच्चारला तरी तोंडावर बोट व डोक्यात प्रश्नांचा भुंगा, अशी सर्वसामान्यांची स्थिती होते. महिला व पुरुष या दोन विश्वांसोबतच किन्नर हे सुद्धा एक स्वतंत्र विश्व आहे. आपण ही वस्तुस्थिती समजून घेणार आहोत का, हा प्रश्न या संमेलनाच्या निमित्ताने प्रकर्षाने उपस्थित आला आहे.
एखादे शुभकार्य असो, वा घरात अपत्य जन्माला येवो, अशा अनेक शुभप्रसंगी किन्नरांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येणारा समाज एरव्ही मात्र किन्नरांपासून फटकून राहतो. रेल्वेस्थानकावर, गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही किन्नर दिसले, त्यांच्यावर पडणारी नजर तिरस्काराची, हेटाळणीचीच असते. असे का? स्त्री, पुरुषांना समाजात जो मानसन्मान मिळतो तो आम्हाला का नाही? आम्हाला भावना नाहीत का? माणूस म्हणून आम्हाला काहीच दर्जा नाही का? किन्नरांद्वारा उपस्थित केल्या जाणारे हे प्रश्न कोणत्याही सुजाण मनुष्यास निरुत्तर होण्यास भाग पाडतात. भुतदयेला अनन्यसाधारण महत्त्व देणाºया आपल्या समाजामध्ये, किन्नर या मनुष्य जातीतीलच मोठ्या घटकाचा मात्र विचार केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गत काही काळापासून किन्नर त्यांच्या हक्कांसाठी एकवटू लागले आहेत. अकोल्यात २०१४ मध्ये पहिल्यांदा किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन झाले. त्यानंतर चार वर्षांनी होत असलेल्या संमेलनामध्ये, हक्कांसाठी लढा ही भावना तीव्र झाल्याचे प्रत्यंतर येत आहे. योगायोगाने याच आठवड्यात किन्नरांसाठी ‘किन्नर कल्याण मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. त्याचीही चर्चा संमेलनात होत आहे. अलीकडे किन्नरांची संघटित शक्ती वाढली आहे. अनेक युवा किन्नर चांगले शिकलेले आहेत. कमलाबुवा, हिराबाई या किन्नरांनी महापौर, उपमहापौर अशा पदापर्यंत मजल मारली. शबनम मावशी तर आमदारही झाली; मात्र ही बोटावर मोजता येण्याएवढी उदाहरणे वगळली, तर इतरांची स्थिती हलाखीचीच आहे. त्यांना स्त्रियांच्या विशेष योजनांचा लाभ तर मिळू शकत नाहीच; पण त्यांच्या लैंगिकतेच्या निकषांवर कोणत्याही सामान्य योजनांचाही लाभ त्यांना दिल्या जात नाही. शिक्षण, नोकरी, घर आणि आरोग्य योजनांचा लाभ मिळावा, ही त्यांची अपेक्षा आहे. किन्नर कल्याण मंडळांच्या निमित्ताने त्या अपेक्षेची पूर्तता होईल, अशी त्यांना आशा आहे. किन्नर कल्याण मंडळ स्थापन करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत हे मंडळ स्थापन होणार असून, सामाजिक न्याय विभाग या मंडळाच्या योजनांची अंमलजबजावणी करणार आहे. पहिल्या टप्यात पाच कोटींचा निधी मंडळासाठी देण्यात आला आहे. किन्नरांची संख्या व प्रश्नांचे स्वरूप पाहता, तो अपुराच आहे; मात्र किन्नरांना स्वतंत्र ओळख देण्याचा व त्यांच्या कल्याणाचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे याचे समाधान आहेच! आता किन्नर कल्याण मंडळाच्या कामास चालना देऊन, नवा आदर्श राज्य शासनाने देशापुढे ठेवला पाहिजे.


Web Title: On the occasion of the National Convention of Transfers ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.