जैन धर्माच्या विज्ञानवादी अभ्यासाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:23 AM2019-04-17T05:23:04+5:302019-04-17T05:23:14+5:30

प्रत्येकालाच सुख व शांतीची गरज असते. त्यामुळे ज्याच्या पालनाने सुख व शांती मिळेल अशीच शिकवण सर्वच धर्मांनी दिली आहे.

 The need for scientific study of Jainism | जैन धर्माच्या विज्ञानवादी अभ्यासाची गरज

जैन धर्माच्या विज्ञानवादी अभ्यासाची गरज

googlenewsNext

- डॉ. महेंद्रकुमार बैद

प्रत्येकालाच सुख व शांतीची गरज असते. त्यामुळे ज्याच्या पालनाने सुख व शांती मिळेल अशीच शिकवण सर्वच धर्मांनी दिली आहे. जैन धर्मही त्यापैकीच एक आहे. जैन धर्माचे वैशिष्ट्य असे की, त्याने धर्म व तत्त्वज्ञानाएवढेच विज्ञानाला महत्त्व दिले. जैन धर्माने बाह्य जगाचे ज्ञान जेवढे महत्त्वाचे मानले तेवढेच व्यक्तीच्या अंतर्मनाचे ज्ञानही मोलाचे मानले. जैन धर्म असे मानतो की, सृष्टीचा काळ अनादि व अनंत आहे. काळाचे हे अनादी-अनंतत्व थोर वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग्ज यांनीही मान्य केले आहे. आजच्या भगवान महावीर जयंतीनिमित्त हा लेखप्रपंच.
जीवन आणि विश्वाच्या अस्तित्वासंबंधीची गूढ रहस्ये तत्त्वज्ञानाच्या मार्गाने शोधताना ‘असे का?’ या प्रश्नाने सुरुवात होते. पण वैज्ञानिक दृष्टीने हाच शोध ‘म्हणजे काय?’ या प्रश्नाने सुरू होतो. उदाहरणार्थ पदार्थांचे गुणधर्म काय? त्यांच्यात समानता व विषमता काय आहे? वैश्विक रचनेचे सार्वभौम सिद्धांत कोणते? इत्यादी. विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या सान्निध्यामुळे आता विज्ञानही ‘असे का?’ असा प्रश्न विचारू लागले आहे. आज या शोधाचे नेतृत्व विज्ञानाकडे आले आहे. प्रसिद्ध तत्त्वचिंतक विट््जेस्टिन म्हणतात की, आता तत्त्वज्ञांकडे विज्ञान समजून घेणे, एवढेच काम राहिले आहे. विज्ञान प्रयोगसिद्ध पद्धतीने दररोज नवनवीन रहस्यांचा उलगडा करत आहे. जैन साहित्यातही अनेक वैज्ञानिक तथ्यांची चर्चा आढळते. जैन धर्माचे सिद्धांत व विचारसरणी यावर आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने विचार करण्यास नामी मुहूर्त आहे. पूर्वी जे सूक्ष्म सत्य केवळ श्रद्धेच्या आधारे मान्य केले जायचे, ते आता विज्ञानाच्या नजरेतूनही समजून घेण्याची गरज आहे. तमस्काय, लोकाकाश, सूक्ष्म पुद््गल, अनहारक अवस्था आणि पुनर्जन्म, विद्युत, कर्माचे भौतिक स्वरूप हे सर्व जैन विज्ञानाचे विषय आहेत.


जैन धर्म वीतरागतेचा धर्म आहे. जैन तत्त्वज्ञान अनेकांचे तत्त्वज्ञान आहे. जैन विज्ञान हे सृष्टी अनादि-अनंत काळापासून असण्याचे विज्ञान आहे. जैन गणित ना निरपेक्ष शून्यापासून सुरू होत, ना निरपेक्ष उत्कृष्ट अनंतामध्ये समाप्त होत. म्हणूनच सर्व सृष्टीची द्रव्ये सापेक्ष आहेत. कला, चित्रकला, मूर्तिकला, स्थापत्यकला, शिलालेख, लिपी, गणित व लोककल्याणकारी प्रवृत्तींच्या वाढीत जैन धर्माचे मोठे योगदान आहे. वर्तमानात भगवान महावीरांची वाणी ही जैनविद्या आहे व ती जैन आगमांमध्ये सुरक्षित आहे. भगवान महावीरांनी इंद्रिय-वासना, क्रोध व अहंभावावर विजय मिळविला. म्हणूनच त्यांना ‘जिन’ म्हटले जाते व त्यांचे अनुयायी जैन म्हणून ओळखले जातात. जैन नीती अहिंसाप्रणीत आहे, जी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांची शिकवण आहे.

जैन धर्म आशावादी आहे. कर्मवादीही आहे. जैन धर्म आत्मा व कर्म यांचा संयोग मान्य करतो. या संयोगातून कर्म आत्म्याचे गुण प्रदर्शित करते. म्हणून कर्म गौण आहे, कर्मापासून मुक्ती मिळविण्यातच आत्म्याचा पुरुषार्थ आहे. जैन तत्त्वज्ञानाने सूक्ष्म पुद््गलला-पदार्थाला भारहीन मानले आहे. जसे मन, वाणी, श्वास यांचे पुद््गल सूक्ष्म आहे. गतीच्या तीव्रतेचा विषयही भारहीनतेशी निगडित आहे. या सूक्ष्म पदार्थांमध्ये अगुरुलघु गुण असतात. विज्ञानाला अद्याप भारहीन पदार्थाची उकल झालेली नाही. जैन साहित्यात सूक्ष्म कणांची गती प्रकाशाच्या गतीहून अधिक असल्याचे मानले गेले आहे. कारण भारहीन कणांना अन्य कोणत्याही कणांच्या गतीची बाधा होत नाही.
गेल्या शतकाच्या अखेरीस वैज्ञानिकांनी बाह्य अंतराळातील आकाशगंगांच्याही मागे कृष्णविवरांचा शोध लावला. ब्रह्मांडाची रचना समजून घेण्यासाठी हा शोध एक महत्त्वाची कडी मानली गेली. जैन आगम भगवती सूत्रात ‘तमस्काय’चे वर्णन केले गेले आहे. ‘तमस्काय’चे ते वर्णन वाचले तर असे वाटते की जणू कृष्णविवरांचेच वर्णन वाचत आहोत.
जैन आगमांमध्ये या सृष्टीचे आठ मध्यबिंदू सांगितलेले आहेत. आठ मध्यबिंदू असणे हेच एक आश्चर्य आहे. याचा अर्थ असा की, तो एक घन आहे व त्याचे ते आठ बिंदू आहेत. तो घन त्रीआयामी आहे. जैन आगमांमध्ये लिहिले आहे की, या मध्यबिंदूंपासून मृदुंगाकार सहा दिशांचे स्वरूप प्रकट होते. यावरून जैन धर्मात भूमितीही खूप प्रगत होती, याची प्रचिती येते.
जैन आगमांमधील अशा विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांचे अध्ययन होणे गरजेचे आहे. विज्ञानाचेही स्वत:चे तत्त्वज्ञान आहे, जे प्रयोगसिद्ध आहे. जैन विज्ञान व भौतिक विज्ञान यांच्यात समानता अशी की, दोघांचेही तंत्र, तर्कशक्ती आणि कार्यपद्धती सारखी आहे. जैन विद्येचे महत्त्वाचे सत्य असे की, प्रत्येक पदार्थाचे ज्ञान अनेक दृष्टीने करून घ्यायला हवे. यालाच अनेकांत/ स्यादवाद सिद्धांत म्हटले जाते. आइन्स्टाइनचा सापेक्षवादाचा सिद्धांत व जैनांचे अनेकांत तत्त्वज्ञान यात कमालीचे साम्य दिसते. स्यादवादानुसार वस्तूचे सर्व गुण एकाच वेळी सांगता येत नाहीत. मात्र एक गुण सांगत असताना अन्य गुण दिसण्याचीही शक्यता असते.
अखेरीस हे जरूर सांगावेसे वाटते की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू व वनस्पती या सर्वांमध्ये मनुष्याप्रमाणेच चेतना असल्याचे मानणारा जैन हा एकमेव धर्म आहे. जैन धर्माच्या सिद्धांतांनाही विज्ञानाची जोड देणे ही आजची गरज आहे. धर्म, समाज व विज्ञान या तिन्हींच्या समन्वयातून एक नव्या संस्कृतीचा उदय होणे आवश्यक आहे.
(अध्यात्म अभ्यासक, उद्योगपती)

Web Title:  The need for scientific study of Jainism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.