वैश्विक कार्य करणारे मेहेरबाबा : निर्भेळ प्रेमाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:02 AM2019-02-25T06:02:55+5:302019-02-25T06:03:48+5:30

मेहेराबादमधील विविध प्रकल्प ही तर मेहेरबाबांच्या वैश्विक कार्याची केवळ सुरुवात होती.

Mayherbaab, who works globally: the fertile fountain of love | वैश्विक कार्य करणारे मेहेरबाबा : निर्भेळ प्रेमाचा झरा

वैश्विक कार्य करणारे मेहेरबाबा : निर्भेळ प्रेमाचा झरा

Next

मेहेरबाबा यांची आज १२५ वी जयंती आहे. ती जगभर विखुरलेल्या, लहान-मोठ्या हजारो मेहेर केंद्रांमध्ये साजरी होते. पुण्याचे हजरत बाबाजान, शिर्डीचे साईबाबा, साकोरीचे उपासनी महाराज, केडगावचे नारायण महाराज आणि नागपूरचे ताजजुद्दीन बाबा या पाच सद्गुरूंनी मेहेरबाबांना साक्षात्काराचा अनुभव दिला आणि १९२१-२२ साली मेहेरबाबांनी नगरजवळ आपला ‘मेहेराबाद आश्रम’ स्थापित करून आपल्या अवतारकार्यास सुरुवात केली.


मेहेराबादमध्ये बाबांनी आपल्या निकटच्या मंडळींचे आध्यात्मिक प्रशिक्षण सुरू केले. ‘सेवेतील स्वामित्व’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. लवकरच मेहेराबाद येथे सर्व धर्मांच्या मुलांसाठी शाळा, मनोरुग्णांसाठी आश्रम, धर्मार्थ दवाखाना असे अनेक उपक्र म उभे केले. या सर्व प्रकल्पांत मेहेरबाबा स्वत: अंगमेहनतीची कामे करून आपल्या भक्तांना सेवेची महती सांगत असत. त्यांच्या ‘प्रेमाश्रम’ या शाळेत लहान मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण त्यांनी सुरू केले. आध्यात्मिक संस्कार कुमार वयातच हृदयात कसे खोलवर मूळ धरतात याचे ही शाळा एक सुंदर उदाहरण आहे. थोड्याच अवधीत या मुलांमध्ये विलक्षण आध्यात्मिक प्रगती दिसून आली.


मेहेराबादमधील विविध प्रकल्प ही तर मेहेरबाबांच्या वैश्विक कार्याची केवळ सुरुवात होती. १९३0 च्या दशकात मेहेरबाबांनी विश्वसंचार केला. सात वेळा विश्वप्रदक्षिणा केली. इराण, इजिप्त, चीन, युरोपीय देश, अमेरिका या देशांमध्ये जाऊन हजारो लोकांमध्ये ईश्वरप्रेमाची ज्योत जागृत केली. यात हिंदू, मुस्लीम, झोराष्ट्रीयन, ज्यू, ख्रिस्ती सर्वच धर्माचे लोक होते. ‘मी तुमच्या हृदयात शुद्ध प्रेमाची पेरणी करण्यासाठी आलो आहे’ हे मेहेरबाबांनी आपल्या उदाहरणाने लोकांना दाखवले.


१९३८ ते १९४७ हा दुसऱ्या महायुद्धाचा, भारतीय स्वातंत्र्याचा, फाळणीच्या स्थित्यंतराचा कालखंड! जगाला या काळात आध्यात्मिक ऊर्जेची नितांत गरज होती. ती गरज मेहेरबाबांनी आपल्या अथक परिश्रमाने पूर्ण केली. भारतीय उपखंडात यासाठी त्यांनी एक लाखाहून अधिक किलोमीटर प्रवास केला आणि सुमारे एक हजार मस्तांशी संपर्क केला. हे मस्त म्हणजे आपल्या उच्च आध्यात्मिक अवस्थेत मानवी चेतना हरवून बसलेले, वरपांगी वेडे दिसणारे, फाटक्या कपड्यात अथवा दिगंबर अवस्थेत राहणारे कलंदर! त्यांच्या जवळील संचयित आध्यात्मिक ऊर्जेला मोकळे करून विश्वाच्या उन्नतीसाठी तिचा उपयोग मेहेरबाबांनी करून घेतला. या कार्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.


१६ आॅक्टोबर १९४९ रोजी मेहेरबाबांनी नवजीवनात प्रवेश केला. या जीवनात त्यांनी आपल्या ‘मी ईश्वर आहे’ या जाणिवेचा त्याग करून सर्वसाधारण साधकाची भूमिका स्वीकारली. सर्वच नातेसंबंध, धनसंपत्तीचा त्याग केला. भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच आशा-अपेक्षांना तिलांजली देऊन केवळ ईश्वरावर सर्वस्व बहाल करून साधकाने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा जिवंत वस्तुपाठ जगासमोर ठेवला. माधुकरी मागत भटक्या जीवनात आपल्या २0 सांगातींबरोबर ३ वर्षांचा काळ व्यतीत केला. अंतर्गत अध्यात्म विश्व आणि बाहेरचे मायावी जग यांचा दुवा असणाºया मनाचा नाश म्हणजेच ‘मनोनाश’ संपन्न करून या ‘नवजीवनाची’ सांगता झाली.
‘भावी पिढ्यांत जन्म घेणाºया नवमानवाला अज्ञानाच्या शक्तिशाली विळख्यातून स्वत:ची मुक्तता करून घेता यावी’ म्हणून मेहेरबाबांनी आपल्या जीवनात अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अथक प्रयत्न केले. मेहेरबाबांनी आपल्या जीवनाची अखेरची दहा वर्षे अधिकाधिक तीव्र होणाºया एकांतवासात घालवली. अखंड प्रवास आणि दोन अपघात यामध्ये त्यांचे शरीर अपंग आणि कृश झाले होते, तरीही दर्शन कार्यक्रमांच्या वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून असाधारण ऊर्जा प्रकट होत असे. चेहºयावर विलक्षण तेज येत असे.
मेहेरबाबांनी भावी पिढ्यांसाठी तर कार्य केलेच, पण त्याचबरोबर मानवाच्या वर्तमान समस्यांवरदेखील मार्गदर्शन केले आणि त्यांचे निराकरण केले. याचे एक बोलके उदाहरण देता येईल. १९६0 च्या दशकातील जगातल्या समस्त तरुणाईला हिप्पी चळवळींनी भुरळ घातली होती. कित्येक तरुण गुंगी आणणाºया आणि मनाला मिथ्या अनुभवांच्या गर्तेत भरकटत नेणाºया (सायकेंडेलिक) ड्रग्सच्या व्यसनाला बळी पडत होते. केवळ ‘हे व्यसन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे सर्वच दृष्टीने हानिकारक आहे’ ही चेतावणी देऊनच ते थांबले नाहीत तर अशा व्यसनाधीन तरुणांना आकर्षित करून ड्रगविरोधी मोहिमेत त्यांनी सामील करून घेतले.
मेहेराबादमध्ये एकांतवासात राहून त्यांनी केलेले हे कार्य व त्याचा झालेला व्यापक परिणाम मनाला थक्क करून टाकतो. आज त्यांच्या प्रति होणारी जनजागृती ही कुठल्याही आयोजित प्रसारामुळे नसून, जनमानसात उमटलेला त्यांच्या मौन-प्रेमाचा प्रतिसाद आहे.

मोहन खेर । आध्यत्माचे अभ्यासक

Web Title: Mayherbaab, who works globally: the fertile fountain of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.