मनाचिये गुंथी - डराव डराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:26 AM2017-09-13T00:26:40+5:302017-09-13T00:26:40+5:30

Manchaiye Gunthi - Scary Horror | मनाचिये गुंथी - डराव डराव

मनाचिये गुंथी - डराव डराव

Next

- डॉ. गोविंद काळे
उन्हाने त्रासलेल्या जीवाला पावसाचे वेध लागतात़ आकाशातील काळ्या मेघांची दाटी पाहून बळीराज सुखावतो़ यंदाचे वर्ष पाऊस वेळेवर आणि चांगला होऊ दे, शेते हिरवी होऊ दे म्हणून आशा बाळगतो़ हवामान खात्याचे अंदाज चुकतात़ काळे ढग वारा पळवून लावतो़ कुठे तरी पाऊस खूपच पडतो़ नद्या नाले तुडुंब भरून वाहतात. पूर येतो़ कोठे थेंबही पडत नाही़ मग येतो दुष्काऴ वृत्तपत्रे, दूरदर्शन, विविध वाहिन्या पावसावरच चर्चा करतात़ दृश्ये दाखवितात़ मला मात्र गेल्या चार-पाच वर्षात वेगळीच रुखरुख लागून राहिली आहे़ पहिल्या - दुस-या पावसात सुरू होणारे डराव - डराव आताशा कानीच पडत नाही़ शालेय जीवनातील कविता आठवून आपणच डराव- डराव करायचे. 
‘डराव डराव / काहो ओरडता बेडूकराव
पत्ता नव्हता तुमचा काल
कोठुनी आला सांगा राव’
बेडूकच नाहीत तर पत्ता तरी कुणाला आणि कसा म्हणून विचारायचा? बेडकांचे डराव डराव संपले़ पावसात भिजण्याचा आनंदही गेला, कारण घरोघरी रेनकोट आले़ पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदी नावा करून सोडण्याचा आनंदही गमावला़
केव्हा तरी मंडूक (बेडूक) सूक्त घेऊन म्हणत बसतो़ ऋग्वेदाच्या सातव्या मंडळातील हे दहा ऋ चांचे सूक्त, केव्हातरी ऋषींनाही विनोदी लिहावेसे वाटते याचे द्योतक आहे़ डराव डराव करणाºया बेडकांना चक्क वेदविद्याप्रवीण ब्राह्मणाची उपमा देण्यात आली आहे़
संवत्सरं श शयना ब्राह्मणा व्रतचारिण:
वाचं पर्जन्यजिन्वितां प्रमण्डुका अवादिषु:’
वर्षभर मौन बाळगणारे मंडूक वर्षाकालारंभी व्रतस्थ विप्राप्रमाणे पर्जन्यकारी शब्द करू लागले़ यज्ञातील सोमयागी विप्रांप्रमाणे बेडूक शब्द करीत आहेत म्हणजे एका अर्थाने वेदघोष करीत आहेत़ वर्षाकाळाच्या प्रारंभी सृष्टीमध्ये उत्पन्न होणारे असंख्य बेडूक आणि त्यांचे डराव डराव म्हणजे मंत्रपठण़ सुसाट वेगाने धावत सुटणा-या कालौघात यज्ञसंस्था लोप पावली तसे मंत्रपठणही आवरते झाले़ आता तर बेडूकराव नाहीसे झाले आणि त्यांचे डराव डरावही संपले़
लहानपणी बेडूकरावांची भीती वाटायची़ दंगा करणा-या द्वाड मुलांना घराघरातील ज्येष्ठ मंडळी रागावायची, प्रसंगी थप्पडही द्यायची़ मुलांना या गोष्टींची भीती फ ारशी वाटत नसे़ परंतु थांब, तुझ्या गळयात बेडूकच बांधतो असे शब्द कानी आले की मुले घाबरायची़ बेडकाचे नाव घेतले की मुलांचे चाळे आपोआप आवरते घेतले जायचे़ हा होता डराव डराववाल्या बेडकांचा मुलांवर धाक़ सात-आठ वर्षे वयाची ब्राह्मणांची मुले तर खूपच घाबरायची़ मौंजीबंधनात मुंजामुलाची उजवी मांडी कापून त्यामध्ये पुरणपोळी भजे, चटणी असे जेवणातील पदार्थ व त्यावर एक बेडूक ठेवून मांडी शिवून टाकायची, असे सांगितले जाई़ परवा दोन्ही नातवांना ही गोष्ट सांगितली गंमत म्हणूऩ आता तुमचे मुंजीचे वय झाले़ मुंज करावी लागणाऱ दोघेही तत्परतेने उत्तरली़ आबा! तेवढे सोडून दुसरे काहीही आमचे करा पण मुंज मात्र नको़ कारण मांडीत बेडूक ठेवायचा म्हणजे आम्हालाही आयुष्यभर करत बसावे लागेल डराव! डराव!

Web Title: Manchaiye Gunthi - Scary Horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.